सदैव युद्धसज्ज: नव्या नौदलप्रमुखांचे सामरिक ‘व्हिजन’

0
Navy Chief-Strategic vision
नौदलप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर ॲडमिरल डी. के. त्रिपाठी यांनी प्रथमच नौदल मुख्यालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

नियुक्तीनंतर प्रथमच नौदल मुख्यालयात अधिकाऱ्यांशी संवाद

दि. २२ मे: देशाच्या सागरी हितसंबंधांच्या रक्षणासाठी सदैव युद्धसज्ज असणे हे भारतीय नौदलाचे मुलभूत ‘मिशन’ आहे. त्यासाठी कधीही, कोठेही आणि कशाही परिस्थितीत आम्ही तयार आहोत, अशा शब्दांत नवनियुक्त नौदलप्रमुख ॲडमिरल डी. के. त्रिपाठी यांनी आपले सामरिक ‘व्हिजन’ नौदल अधिकाऱ्यांसमोर मांडले. नौदलप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सागरी मोहिमांमध्ये अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल विचार मांडले आणि त्यांचे समर्पण व वचनबद्धता हीच नौदलाची ताकद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नौदल अधिकाऱ्यांशी बोलताना ॲडमिरल त्रिपाठी यांनी सुरक्षा विषयक विद्यमान परिस्थिती आणि नौदलाने घ्यावयाची भूमिका या बद्दलही आपले विचार मांडले. सरकारच्या आत्मनिर्भर भारत धोरणाशी नौदल वचनबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी या प्रसंगी दिली. देशांतर्गत प्रश्नांवर देशांतर्गत उपाय, नावोन्मेश आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या त्रिसूत्रीवर त्यांनी भर दिला. सरकार व नौदलाने हा दृष्टीकोन केवळ सामरिक उद्देशाने घेतला नसून, सागरी क्षेत्राच्या भवितव्याबद्दलचे सक्रीय आणि लवचिक धोरण म्हणून त्याकडे पाहावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यदर्शी, एकसंध, विश्वासार्ह आणि युद्धसज्ज नौदल म्हणून भारतीय नौदलाची ओळख निर्माण व्हावी या करीता नौदल मुख्यालयात काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांनी आणि विशेषतः मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्राथमिकता ठरवाव्यात आणि प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधणारे बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Navy Chief-Strategic vision नौदलाचे २६ वे प्रमुख म्हणून ॲडमिरल त्रिपाठी यांनी ३० एप्रिल रोजी सूत्रे स्वीकारली होती. कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स युद्धतंत्रातील तज्ज्ञ मानले जाणाऱ्या ॲडमिरल त्रिपाठी यांनी नौदलात ३९ वर्षे सेवा बजाविली आहे. नौदलप्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते नौदलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी नौदलाच्या कार्मिक विभागाचे प्रमुख आणि नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून काम पहिले होते. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे लष्करातील सुमारे चार दशकाहून अधिकच्या सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणार असून, त्यांच्या जागी विद्यमान लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी लष्करातील विद्यमान अधिकाऱ्यांपैकी सर्वांत सेवाज्येष्ठ अधिकारी आहेत. जनरल पांडे यांच्या निवृत्तीमुळे भारतीय सैन्यदलांमध्ये नेतृत्त्वाची नवी फळी येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या बदलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विनय चाटी


Spread the love
Previous articleरशियाचे आता बाल्टिक समुद्रात विस्तारवादी धोरण
Next articleALH Dhruv To Fly Over The Pacific In Filipino Colours Soon?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here