गाझासाठी अमेरिकेच्या युद्धबंदी योजनेशी नेतन्याहू सहमत: ट्रम्प

0
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी वॉशिंग्टनने तयार केलेल्या गाझा शांतता प्रस्तावाला पाठिंबा देण्यास सहमती दर्शविली असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले. या प्रस्तावात युद्धबंदी आणि हमासने बंदी बनवलेल्यांची सुटका यांचा समावेश आहे. यामुळे पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये जवळजवळ दोन वर्षांपासून सुरू असणारा संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

नेतन्याहू यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की ते अशा एका शांतता करार करण्याच्या “खूप जवळ” आहेत जो साध्य करणे अवघड आहे. मात्र त्यांना आशा आहे की हमासचे अतिरेकी देखील तो स्वीकारतील.

ट्रम्प यांचा 20 कलमी आराखडा

व्हाईट हाऊसने ट्रम्प यांचा 20 कलमी आराखडा प्रसिद्ध केला ज्यामध्ये युद्धबंदी, इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांसाठी हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांची अदलाबदल, पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमधून इस्रायलची टप्प्याटप्प्याने माघार, हमासचे नि:शस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय संस्थेच्या नेतृत्वाखालील संक्रमणकालीन सरकारची स्थापना अशा मुद्द्यांचा समावेश आहे.

“मी पंतप्रधान नेतन्याहू यांचेही या योजनेला सहमती दिल्याबद्दल आणि जर आपण एकत्र काम केले तर आपण इतक्या वर्षांपासून, दशकांपासून, अगदी शतकांपासून पाहिलेल्या मृत्यू आणि विनाशाचा अंत करू शकतो तसेच संपूर्ण प्रदेशासाठी सुरक्षा, शांती आणि समृद्धीचा एक नवीन अध्याय सुरू करू शकतो यावर विश्वास ठेवल्याबद्दल आभार मानू इच्छितो,” असे ट्रम्प म्हणाले.

राजनैतिक प्रयत्नांना चालना

जानेवारीमध्ये ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर नेतन्याहू यांच्या व्हाईट हाऊसच्या चौथ्या भेटीत, गेल्या आठवड्यात अनेक पाश्चात्य नेत्यांनी अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात औपचारिकपणे वेगळ्या पॅलेस्टिनी राज्याला पाठिंबा दिल्यानंतर उजव्या विचारसरणीच्या इस्रायली नेत्यांनी त्यांच्या देशाचे सर्वात महत्वाचे संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

पाश्चिमात्य देशांचा हा निर्णय म्हणजे हमाससाठी बक्षीस आहे असे म्हणत या निर्णयावर तीव्र टीका करणारे ट्रम्प, स्वतःच्या योजनेतील काही भागांवर इस्रायलच्या शंका असूनही नेतान्याहू यांच्याकडून कराराला मान्यता मिळावी यासाठी मागणी करत होते.

अमेरिकन अध्यक्षांकडून वाढलेले हे राजनैतिक प्रयत्न असल्याचे दिसून येते, ज्यांनी 2024 च्या अध्यक्षीय मोहिमेदरम्यान संघर्ष लवकर संपवण्याचे वचन दिले होते आणि तेव्हापासून ते वारंवार दावा करत आहेत की शांतता करार जवळ आला आहे. मात्र तो प्रत्यक्षात अद्याप येऊ शकलेला नाही.

मात्र या वाटाघाटींच्या वेळी असणारी हमासच्या स्पष्ट अनुपस्थिती यामुळे या नवीन उपक्रमाच्या शक्यतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गाझा शहराच्या आतपर्यंत रणगाडे पोहोचले

गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या निमित्ताने वॉशिंग्टनने अरब आणि मुस्लिम राष्ट्रांना आपला शांतता आराखडा सादर केला. त्यानंतर सोमवारी ट्रम्प यांचे मुख्य उद्दिष्ट नेतन्याहू यांच्यासोबत उरलेले अंतर भरून काढण्याचा प्रयत्न करणे हे होते.

सोमवारी इस्रायली रणगाडे गाझा शहराच्या मध्यभागी अगदी आतपर्यंत घुसले तेव्हा व्हाईट हाऊसमध्ये चर्चा सुरू झाली. इस्रायलने या महिन्यातील युद्धातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक हल्ला केला आहे त्यावेळी आपले ध्येय शेवटच्या टप्प्यात हमासचा नाश करणे हे आहे असे नेतन्याहू म्हणाले होते. युद्धामुळे गाझाचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला आहे आणि एक मोठे मानवीय संकट निर्माण झाले आहे.

लिमोझिनने पोहोचल्यावर, नेतन्याहू यांचे व्हाईट हाऊसच्या दाराबाहेर ट्रम्प यांनी हस्तांदोलन करून स्वागत केले, जे शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर भाषण करताना इस्रायली पंतप्रधानांच्या झालेल्या थंड स्वागताच्या अगदी उलट होते. या भाषणाच्या निषेधार्थ अनेक प्रतिनिधी बाहेर पडले होते.

इस्रायल आणि हमासमधील दरी कमी करण्यात अपयशी ठरल्यामुळे अमेरिकेने पाठिंबा दिलेले मागील युद्धबंदीचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. तर दुसरीकडे नेतन्याहू यांनी हमास पूर्णपणे नष्ट होईपर्यंत लढाई सुरू ठेवण्याची शपथ घेतली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleमहत्त्वाची खनिजे, ऊर्जेसाठी भारताचे आता मंगोलियाकडे लक्ष
Next articleअमेरिकेच्या H-1B फीवाढीच्या पार्श्वभूमीवर चीनकडून नवीन K व्हिसाची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here