नेतान्याहू आणि ट्रम्प यांची भेट; इस्रायल-हमास शस्त्रीसंधीबाबत चर्चा

0

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सोमवारी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, “अमेरिका आणि इराण यांच्यात इस्रायल-हमास शस्त्रीसंधीबाबत लवकरच चर्चा होणार आहे.” याशिवाय गाझा पट्टीमधील पॅलेस्टिनी लोकांचे स्थलांतर करण्याच्या वादग्रस्त प्रस्तावातही काही प्रगती झाल्याचे संकेतही ट्रम्प यांनी दिले.

अमेरिका आणि इस्रायली अधिकाऱ्यांमधील चर्चेच्या प्रारंभी नेतान्याहू म्हणाले की, “अमेरिका आणि इस्रायल अशा देशांना सहकार्य करत आहेत, जे पॅलेस्टिनी लोकांना “उज्ज्वल भविष्य” देऊ इच्छितात.” त्यांनी सूचित केले की, गाझा येथील रहिवासी शेजारील देशांत स्थलांतर करू शकतात.

“जर लोक इथे राहू इच्छित असतील, तर राहू शकतात, पण जर त्यांना निघून जायचं असेल, तर त्यांना जायची मुभा असावी,” असे नेतान्याहू म्हणाले.

“आम्ही अमेरिका सरकारसोबत खूप जवळून काम करत आहोत, अशा देशांचा शोध घेत आहोत जे असे म्हणत आले आहेत की ते पॅलेस्टिनी लोकांसाठी चांगले भविष्य निर्माण करू इच्छितात. मला वाटतं आम्ही काही देशांच्या जवळ पोहोचलो आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नेतान्याहू यांच्या स्थलांतर प्रस्तावाबाबत विचारले असता, ट्रम्प यांनी सुरुवातीला थोडी सावध भूमिका घेतली, मात्र नंतर ते म्हणाले की, “इस्रायलच्या आजूबाजूच्या देशांनी खूप चांगले सहकार्य केले आहे. प्रत्येक देशाकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे काहीतरी चांगले घडेल.”

याचवर्षी ट्रम्प यांनी, गाझा पट्टीवर ताबा मिळवून तिला “मध्य पूर्वेतील रिव्हिएरा” बनवण्याचा प्रस्ताव दिला होता. गाझातील नागरिकांनी या प्रस्तावाचा तीव्र निषेध केला आणि आपल्या मातृभूमीपासून कधीही दूर न जाण्याचा निर्धार व्यक्त केला. मानवाधिकार संघटनांनी याला जातीय निर्मूलन (ethnic cleansing) असे म्हटले.

ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात वॉशिंग्टनमध्ये काही तासांपर्यंत चर्चा झाली. याचवेळी इस्रायली अधिकारी आणि हमास यांच्यात अमेरिका मध्यस्थ असलेल्या शस्त्रसंधी आणि बंदीमुक्ती कराराबाबत अप्रत्यक्ष चर्चा सुरु होती. नेटन्याहू सोमवारी उशिरा ब्लेअर हाऊस गेस्ट हाऊसला परतले, जिथे ते मंगळवारी सकाळी 9:30 वाजता उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांची भेट घेणार आहेत.

ट्रम्प आणि नेतान्याहू यांची ही भेट, ट्रम्प यांनी जानेवारीत पुन्हा पदग्रहण केल्यापासूनची तिसरी भेट होती. याआधी, ट्रम्प यांनी इराणच्या अणुस्थळांवर बॉम्बफेक करण्याचे आदेश दिले होते, जे इस्रायली हवाई हल्ल्यांना पाठिंबा देण्यासाठी होते. त्यानंतर त्यांनी 12 दिवसांच्या इस्रायल-इराण युद्धात शस्त्रसंधी घडवून आणली.

ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांच्या प्रशासनाने इराणसोबत चर्चा करण्याचे निश्चीत केले आहे. “आम्ही इराणसोबत चर्चेसाठी वेळ ठरवली आहे आणि तेही चर्चेसाठी तयार आहेत, कारण त्यांना मोठा फटका बसला आहे,” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांचे मध्यपूर्वेतील विशेष दूत- स्टीव्ह विटकॉफ यांनी सांगितले की, “ही बैठक पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.”

ट्रम्प यांनी असेही सांगितले की, “योग्य वेळ आली की ते इराणवरील निर्बंध हटवू इच्छितात. मला योग्य वेळी हे निर्बंध उठवायचे आहेत.”

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी, एका मुलाखतीत सांगितले की, “त्यांना विश्वास आहे की इराण आणि अमेरिका संवादाच्या माध्यमातून आपले मतभेद दूर करू शकतात.”

ट्रम्प आणि त्यांचे सल्लागार इराणच्या दुर्बल स्थितीचा फायदा घेत, दोन्ही बाजूंना गाझा युद्धात तोडगा काढण्यासाठी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.

या दोन नेत्यांनी, त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांसह, पारंपरिक ओव्हल ऑफिसऐवजी व्हाईट हाऊसच्या ब्लू रूममध्ये एकत्र जेवणाचा आनंद घेतला.

नेतान्याहू यांनी याआधी विटकॉफ आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचीही भेट घेतली होती. मंगळवारी ते अमेरिकन काँग्रेसमधील नेत्यांची भेट घेणार आहेत.

या भेटीत नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना एक पत्र दिले, ज्यात त्यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामनिर्देशन दिले असल्याचे म्हटले होते. ट्रम्प यांनी हे पत्र मिळाल्यावर आनंद व्यक्त केला आणि त्यांचे आभार मानले.

या भेटीपूर्वी नेतान्याहू यांनी पत्रकारांना सांगितले की, “इस्रायली वाटाघाटी प्रतिनिधी गाझा करारासाठी कतारची राजधानी दोहा येथे वाटाघाटी करत आहेत.”

इस्रायली अधिकारी आशावादी आहेत की इराणबरोबर झालेल्या संघर्षाच्या परिणामी लेबनॉन, सिरिया आणि सौदी अरेबिया यांसारख्या अधिक शेजारी देशांशी संबंध सामान्य होण्याचा मार्ग मोकळा होईल.

“कतारमध्ये सुरु असलेल्या वाटाघाटींच्या केंद्रस्थानी असलेल्या, 60 दिवसांच्या शस्त्रसंधी प्रस्तावाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे विटकॉफ याच आठवड्यात दोहा येथे पोहोचणार आहेत,” असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेव्हिट यांनी सांगितले.

दरम्यान, अजूनही काही मुद्द्यांवर मतभेद कायम असल्याचे दिसते. पॅलेस्टिनी सूत्रांनी सांगितले की, इस्रायल गाझामध्ये मानवीय मदतीचा स्वातंत्र्याने आणि सुरक्षित प्रवेश देण्यास नकार देत असल्यामुळे वाटाघाटींमध्ये अडथळा येत आहे. इस्रायल म्हणते की, ते अन्नपुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, पण शस्त्रधारी गट या पुरवठ्याचा गैरवापर करू नये म्हणून काळजी घेत आहे.

वाटाघाटींच्या दुसऱ्या दिवशी मध्यस्थांनी एक फेरी पार पाडली असून संध्याकाळी पुन्हा चर्चा होणार असल्याची माहिती पॅलेस्टिनी सूत्रांनी रॉयटर्सला दिली.

अमेरिकेच्या मध्यस्थीखालील प्रस्तावात बंदींच्या टप्प्याटप्प्याने सुटका, इस्रायली सैन्याची काही भागांतून माघार आणि पूर्ण युद्धविरामासाठी चर्चा करण्याची योजना आहे.

हमासने कायमच संपूर्ण युद्धविराम झाल्याशिवाय उर्वरित बंदींची सुटका न करण्याची भूमिका घेतली आहे. तर इस्रायलचे म्हणणे आहे की, सर्व बंदींना मुक्त केल्याशिवाय आणि हमासला नष्ट केल्याशिवाय ते युद्ध थांबवणार नाहीत.

ट्रम्प यांनी मागील आठवड्यात पत्रकारांना सांगितले होते की, गाझावर तोडगा लवकर निघावा यासाठी ते नेतान्याहू यांच्यासमोर “अतिशय ठाम भूमिका” घेणार असून, नेतान्याहू देखील युद्ध संपवण्यास इच्छुक आहेत.

नेतान्याहूंच्या सरकारमधील काही कट्टर घटक लष्करी मोहिम थांबवण्याच्या विरोधात आहेत, पण गाझा युद्धामुळे इस्रायली जनता थकली असून, जर नेटन्याहू समाधानकारक अटी मिळवू शकले तर त्यांचे सरकार शस्त्रसंधीला पाठिंबा देईल, अशी शक्यता आहे.

यावर्षाच्या सुरुवातीला झालेली शस्त्रसंधी, मार्चमध्ये तुटली होती आणि ती पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. दरम्यान, इस्रायलने गाझामध्ये लष्करी मोहिमेचा जोर वाढवला आहे आणि अन्न वितरणावर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणले आहेत.

“गाझामधील नागरिक कोणताही प्रगतीचा संकेत मिळतो का, याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मी सर्वशक्तिमान देवाला प्रार्थना करतो की, वाटाघाटी प्रतिनिधीमंडळ किंवा मध्यस्थांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांच्या सर्व शक्तीनिशी दबाव आणावा, कारण आता स्थिती पूर्णपणे असहाय्य झाली आहे,” असे गाझा शहरातील विस्थापित रहिवासी अबू सुलेमान कदूम म्हणाले.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleEU Presses China On Rare Earths And Ukraine War
Next articleतेजस जेटसाठीच्या F404 इंजिन्सचे, ऑगस्टपासून नियमीत वितरण सुरु होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here