रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांची नेतान्याहू घेणार भेट

0
रिपब्लिकन
22 मे 2017 रोजी जेरुसलेमच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांच्यासोबत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचा फाईल फोटो. (छायाचित्रः व्हाईट हाऊस आर्काइव्ह्ज)

रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प बुधवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे फ्लोरिडाच्या पाम बीच येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये स्वागत करतील, असे ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले.

“फ्लोरिडाच्या पाम बीच येथील मार-ए-लागो येथे बिबी नेतान्याहू यांचे स्वागत करण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी नेतान्याहू यांचे टोपणनाव वापरून ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्रम्प अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरची ही त्यांची पहिलीच बैठक असेल, ज्या दरम्यान दोन्ही पक्षांकडून घनिष्ठ संबंध निर्माण केले जातील अशी अपेक्षा आहे. याउलट गाझामधील हमास अतिरेक्यांविरुद्ध इस्रायलने पुकारलेल्या युद्धावरून नेतान्याहू आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे.

2020 च्या निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव केल्याबद्दल नेतान्याहू यांनी बायडेन यांचे अभिनंदन केले होते. त्यामुळे ट्रम्प अत्यंत संतप्त झाले होते. मतदारांच्या फसवणुकीमुळे निवडणूक त्यांच्याकडून चोरली गेली असा खोटा दावा ट्रम्प यांनी त्यावेळी केला होता.

नेतान्याहू या आठवड्यात त्यांच्या वॉशिंग्टन दौऱ्यावर असून ट्रम्प यांना प्रत्यक्ष भेटण्याची विनंती त्यांच्याकडून करण्यात आली होती, असे पोलिटिकोने सोमवारी सांगितले.

बुधवारी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना नेतान्याहू पॅलेस्टाईन एन्क्लेव्हमधील इस्रायलच्या लष्करी कारवायांसाठी काँग्रेसचा नव्याने पाठिंबा मागतील. या आठवड्यात ते बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस या दोघांनाही भेटतील. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर रविवारी 2024च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत कमला हॅरिस यांचा प्रवेश झाला आहे.

इस्रायली नेते  नेतान्याहू नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या निवडणुकीबाबत आपले मत नेमके कोणाच्या बाजूने द्यायचे यावर विचार करत असावेत. ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे जनमत चाचण्यांवरून दिसून येत आहे. बहुतेक विश्लेषकांच्या मते, दुसरे ट्रम्प प्रशासन नेतान्याहू यांना हमासशी लढण्यासाठी अधिक मोकळीक देईल.
ट्रम्प यांच्या कार्यकाळात नेतान्याहू आणि ट्रम्प हे मुख्यतः वैचारिक आणि धोरण दृष्टीने उत्तम समन्वय साधून होते. अमेरिकेने आपला दूतावास त्यानंतर तेल अवीव येथून जेरुसलेमला हलवला. त्यामुळे इस्रायली आनंदी तर पॅलेस्टिनी संतप्त झाले.

7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर सुरक्षाविषयक अपयशाबद्दल ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्यावर टीका केली होती. इस्रायलने हमासने ताब्यात घेतलेल्या ओलिसांची त्वरित सुटका करून गाझामधील युद्ध संपवले पाहिजे अशी ट्रम्प यांनी म्हटले आहे.

आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, ट्रम्प यांनी अब्राहम करारातील नेतान्याहू यांच्या भूमिकेचे कौतुक केले, ट्रम्प यांच्या काळात स्वाक्षऱ्या झालेल्या महत्त्वाच्या करारांमुळे बहरीन तसेच संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांशी इस्रायलचे द्विपक्षीय संबंध सामान्य झाले.

“माझ्या पहिल्या कार्यकाळात, आम्ही या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य राखले, अगदी ऐतिहासिक अब्राहम करारावरही स्वाक्षऱ्या केल्या-आणि आम्ही ते पुन्हा मिळवू”, असे ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल पोस्टमध्ये म्हटले आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार म्हणून हॅरिस या जागतिक संघर्ष “कोणत्याही प्रकारे थांबविण्यास सक्षम नाहीत,” असे ते म्हणाले.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleBudget 2024 : संरक्षण विभागासाठी 6.2 लाख कोटी रूपयांची तरतूद
Next articleHarris Leads Trump 44% To 42% In Presidential Race, Poll Finds

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here