सरकारच्या कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीनए) दिलेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार देशाच्या पश्चिम भागातील तळांवर लष्करी कवायती सुरू झाल्याचे मानले जात आहे.
या कवायतींमध्ये सैन्य आणि हेलिकॉप्टर्सचा वापर करून सीमा चौक्यांवर हल्ला कसा करायचा याचा समावेश आहे. केसीएनएने सीमावर्ती भागातील ज्या चौकीची छायाचित्रे प्रसारित केली आहेत ती दक्षिण कोरियाच्या बाजूला असलेल्या चौकीसारखी दिसत आहे.
किम जोंग उनने आपल्या सैन्याला “सध्याची परिस्थिती लक्षात घेता युद्धाची तयारी तीव्र करण्याचे” आवाहन केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
दक्षिण कोरियाने मात्र या घडामोडींवर लगेचच कोणतेही भाष्य केलेले नाही.
उत्तर कोरियाने त्याच्या शेजाऱ्यांबद्दलचे धोरण बदलले असल्याचे उनने अलीकडेच स्पष्ट केले होते. जानेवारीमध्ये केलेल्या एका भाषणात त्याने आपल्या देशाचे दीर्घकाळापासून सुरू असणारे शांतता एकीकरणाचे धोरण संपुष्टात आले असून दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाचा “प्रमुख शत्रू” म्हणून घोषित केले.
4 मार्चपासून दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या फ्रीडम शील्ड कवायती सुरू झाल्या असून त्या 14 मार्चपर्यंत चालणार आहेत. एपीच्या वृत्तानुसार या कवायतींमध्ये थेट गोळीबार, बॉम्बस्फोट, हवाई हल्ला आणि क्षेपणास्त्रांचा मारा भेदणे यांचा समावेश आहे.
हा वार्षिक सराव 2018 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवला होता कारण त्यावेळी अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात अणु करारावर वाटाघाटी सुरू होत्या. मात्र अपयश आल्याने या वाटाघाटी 2019 मध्ये संपुष्टात आल्या.
2018 मध्ये स्वाक्षरी केलेला आंतर-लष्करी करार 2023 मध्ये रद्द करण्यात आल्याने उत्तर आणि दक्षिण कोरियाचे संबंध अधिकच बिघडले आहेत. डिप्लोमॅटच्या एका संपादकीय लेखानुसार, या करारामुळे दोन्ही देश एकमेकांच्या विरोधातील सर्व कारवाया संपविण्याच्या दृष्टीने, सीमेजवळ लष्करी कवायती थांबविणे, लाइव्ह फायरिंगचा सराव मर्यादित ठेवणे, नो-फ्लाय झोन लागू करणे आणि हॉटलाइन राखणे यासारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते.
अश्विन अहमद