राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांची फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा

0
राष्ट्रीय
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी पॅरिसमध्ये फ्रान्सचे संरक्षणमंत्री लेकोर्नू यांची भेट घेतली

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पॅरिसमध्ये फ्रान्सचे संरक्षणमंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू यांची भेट घेऊन द्विपक्षीय संरक्षण संबंध वाढवणे, अंतराळ सहकार्य वाढवणे आणि बदलत्या जागतिक परिस्थितीवर चर्चा केली.
“भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी दौऱ्यावर असताना फ्रान्सचे संरक्षणमंत्री सेबॅस्टियन लेकोर्नू यांच्याशी व्यापक चर्चा केली”, असे फ्रान्समधील भारतीय दूतावासाने मंगळवारी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
“या संवादाचा उद्देश, विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय भू-राजकीय परिदृश्यावर अंतर्दृष्टी सामायिक करतानाच, द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक दृढ करणे आणि अंतराळ सहकार्य वाढवणे असा होता,” असेही त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या बैठकीनंतर लेकोर्नू यांनी देखील एक्सवर एक पोस्ट टाकली. त्यात ते म्हणतात, “राफेल मरीन, स्कॉर्पीन पाणबुड्या, अंतराळ अशा अनेक विषयांवरील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य यासोबतच आंतरराष्ट्रीय परिस्थिती, विशेषतः युक्रेनमधील परिस्थितीवर आम्ही चर्चा केली.”

फ्रेंच सरकारने अलीकडेच 26 राफेल सागरी विमानांच्या करारासाठी भारताला अंतिम किंमतीचा प्रस्ताव सादर केला आहे. सूत्रांनी सांगितले की फ्रान्सने भारतीय अधिकाऱ्यांना सर्वोत्तम आणि अंतिम किंमतीचा प्रस्ताव दिला आहे, ज्यात प्रस्तावावर चिकाटीने करण्यात आलेल्या वाटाघाटींनंतर किंमतीत लक्षणीय कपात करण्यात आली आहे.

भारत 26 राफेल-मरीन विमाने, राफेलचे मरीन प्रकार खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. भारतीय नौदल आपल्या जुन्या ताफ्यातील जहाजांवरील विमाने, विशेषतः मिग-29के, बदलण्याचा विचार करत आहे. राफेल-एम विमाने भारताच्या आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य यांसारख्या विमानवाहू जहाजांवर कार्यरत असतील. राफेल-एम विमानांसाठीचा संभाव्य करार हा भारताच्या सध्या सुरू असलेल्या नौदल आधुनिकीकरण कार्यक्रमाचा एक भाग असून गेल्या आठवड्यात, दोन्ही बाजूंनी या कराराला अंतिम रूप देण्यासाठी प्रदीर्घ वाटाघाटी करण्यात आल्या.

डोवाल यांनी फ्रेंच डिफेन्स प्रोक्योरमेंट एजन्सीचे (डीजीए) महासंचालक इमॅन्युएल चिवा यांची देखील भेट घेतली. या भेटीत त्यांनी फ्रान्सच्या संरक्षण नियोजन आणि खरेदी प्रणाली, संरक्षण सहकार्य आणि भविष्यातील संरक्षण तंत्रज्ञान आणि नवकल्पनांमध्ये नवउद्योजक आणि तंत्रज्ञानाच्या संधींवर सर्वसमावेशक चर्चा केली.

भारत-फ्रान्स धोरणात्मक संवादाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान, डोवाल यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोन यांच्याशीही चर्चा केली. या चर्चेत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करणे, द्विपक्षीय सहकार्य आणि धोरणात्मक महत्त्व या प्रमुख विषयांचा समावेश होता.

भारतीय दूतावासाने एका वेगळ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की हा संवाद “इंडो-पॅसिफिक आणि त्यापलीकडे तसेच सायबरपासून अंतराळापर्यंतच्या क्षेत्रांसाठी मोठ्याप्रमाणात विश्वास आणि सोयीची धोरणात्मक भागीदारी तसेच उच्च महत्वाकांक्षा आणि जबाबदाऱ्या अधोरेखित करतो.”

दरम्यान, डोवाल यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या.

टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleNSA Ajit Doval Holds Talks With French Armed Forces Minister
Next articleTerror: Instrument Of State Policy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here