गाझामध्ये उपासमारीचे वाढते संकट, मानवतावादी संस्थांद्वारे कारवाईची मागणी

0

बुधवारी, 100 हून अधिक मानवतावादी आणि मानवाधिकार संस्थांनी एकत्रित निवेदनाद्वारे, तत्काळ आणि कायमस्वरूपी युद्धविराम, तसेच मदत पोहोचवण्यावरील सर्व अडथळे हटवण्याची मागणी सरकारकडे केली. गाझामधील उपासमारीचे संकट अधिक तीव्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली.

Mercy Corps, Norwegian Refugee Council आणि Refugees International यांसह 111 अन्य संस्थांनी स्वाक्षरी केलेल्या या निवेदनात, मदत गटांनी नमूद केले आहे की “संपूर्ण गाझामध्ये सामूहिक उपासमारीचे सावट पसरते आहे, तर दुसऱ्या बाजूला शेकडो टन अन्न, स्वच्छ पाणी, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू गाझाच्या बाहेर तशाच पडून आहेत, कारण मानवी मदत संघटनांना त्या वस्तू गाझामध्ये नेण्याची परवानगी दिली जात नाहीये.”

“इस्रायली सरकारच्या वेढ्यामुळे गाझामधील लोक उपाशी मरत आहेत. आता सामान्य लोकांसोबतच मदत करणारे कर्मचारीही अन्नासाठी रांगेत उभे राहू लागले आहेत, जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबाला अन्न देत आहेत. आता तर अन्नाचा पुरवठा पूर्णतः संपल्यामुळे, मानवतावादी संस्थांचे कर्मचारी आणि सहकारी देखील उपासमारीचे शिकार होत आहे,” असेही या संस्थांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

इस्रायली मर्यादा, पुरवठ्यास विलंब आणि विभागणीच्या धोरणांमुळे गाझामध्ये गोंधळ, उपासमार आणि मृत्यूचे वातावरण निर्माण झाले आहे.

सर्व अडथळे दूर करण्याची मागणी

या संस्थांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “सर्व देशांनी एकत्र येत, प्रशासकीय अडथळे दूर करणे, सर्व भू-मार्ग खुले करणे, गाझामधील सर्व लोकांपर्यंत मदत पोहोचण्याची हमी मिळवणे, तसेच लष्करी-नियंत्रित वितरण नाकारून, युनायटेड नेशन्सच्या नेतृत्वाखालील तत्त्वाधारित मदत यंत्रणा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. हा वेढा संपवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, जसे की शस्त्रास्त्रे आणि गोळ्या-बारुदाच्या पुरवठ्यावर बंदी घालणे.”

गाझामध्ये येणाऱ्या सर्व वस्तू इस्रायलच्या नियंत्रणाखाली असूनही, इस्रायलने अन्नाच्या कमतरतेसाठी स्वतःला जबाबदार मानण्यास नकार दिला आहे.

गेल्या काही आठवड्यांत, अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यातील बरेचजण इस्रायली लष्कराने केलेल्या गोळीबारात मारले गेले, जे गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशनच्या वितरण केंद्रांजवळ मदतीसाठी जमले होते. ही संस्था अमेरिकेच्या पाठिंब्याने कार्यरत असून, तिच्या तटस्थतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत, संयुक्त राष्ट्रांसारख्या संस्थांनीही या फाउंडेशनवर टीका केली आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये, हमासने इज्रायलवर हल्ला करून 1,200 लोकांना ठार मारले आणि 251 जणांना बंदी बनवले, त्याच्या प्रत्युत्तरात इज्रायलने गाझावर हल्ला सुरू केला.

तेव्हापासून आतापर्यंत इज्रायली हल्ल्यांमध्ये सुमारे 60,000 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत, यामध्ये हवाई बॉम्बहल्ले, तोफगोळ्यांचा मारा आणि थेट गोळीबार यांचा समावेश आहे.

पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युद्ध सुरू झाल्यापासून आता प्रथमच उपासमारीमुळे मृत्यू होऊ लागले आहेत.

मार्चमध्ये, इस्रायलने गाझाकडे जाणारा सर्व पुरवठा बंद केला होता आणि नंतर मे महिन्यात तो काही अटींसह पुन्हा सुरू केला गेला. या अटींचे समर्थन करताना इस्रायलने सांगितले की, “मदत दहशतवादी गटांपर्यंत जाऊ नये यासाठी ही पावले उचलली गेली.”

Norwegian Refugee Council ने मंगळवारी सांगितले की, “गाझामधील त्यांच्या जवळचा सगळा मदत साठा संपला आहे, आणि त्यांचे काही कर्मचारी देखील उपाशी राहिले आहेत.” त्यांनी इस्रायलवर त्यांच्या मदत कार्याला पूर्णत: पांगळे केल्याचा आरोप केला आहे.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleNyoma, Third Fighter Base in Ladakh to Be Operational by October to Bolster India-China Air Power Balance
Next articleलडाखमधील तिसरा लढाऊ तळ न्योमा ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here