अमेरिकेकडून प्रशंसा
दि. ०५ मार्च : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या पक्षाचे प्रमुख नवाझ शरीफ यांची कन्या मरियम नवाझ यांची पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ हे मरियम यांचे काका आहेत. अमेरिकेकडून या नियुक्तीचे स्वागत करण्यात आले असून, ‘देशाच्या राजकीय व्यवस्थेत महिलांना सामावून घेण्याचा पाकिस्तानचा हा निर्णय प्रशंसनीय आहे,’ असे अमेरिकेने म्हटले आहे.
पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत लष्कराच्या पाठबळावर पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या पक्षाने बहुमत मिळविले होते. त्यानंतर पक्षाचे नेते व नवाझ शरीफ यांचे कनिष्ठ बंधू शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी वर्णी लागली होती. शाहबाज हे पूर्वी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. ते पंतप्रधान झाल्याने रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदावर ५० वर्षीय मरियम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंजाब हा पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला व राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक प्रांत मानला जातो. मरियम या पंजाबच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री आहेत.
मरियम या आपले वडील व पाकिस्तानचे चार वेळा पंतप्रधानपद भूषविलेले नवाझ शरीफ यांच्या राजकीय वारस मानल्या जातात. पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतके बहुमत मिळाले नाही. त्यामुळे पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) व पाकिस्तान पीपल्स पार्टीने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली होती. सत्ता स्थापन करण्यापूर्वी या दोन पक्षात झालेल्या समझोत्यानुसार मरियम यांना मुख्यमंत्रीपद दिल्याची चर्चा आहे.
मरियम यांच्या नियुक्तीचे अमेरिकेने स्वागत केले आहे. ‘पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी मरियम यांची नियुक्ती होणे, ही घटना पाकिस्तानच्या राजकारणातील एक मैलाचा दगड आहे. राजकारणात महिलांना अधिक स्थान मिळावे व त्यांची देशाच्या राजकारणातील टक्केवारी वाढावी म्हणून आम्ही पाकिस्तान बरोबर विस्तृत सहकार्य करण्यास तयार आहोत,’ असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
(अनुवाद : विनय चाटी)