पाकिस्तानः बलुचिस्तानमध्ये बीएलए बंडखोरांकडून प्रवासी रेल्वेचे अपहरण

0
बीएलए
बलुचिस्तानमध्ये बंडखोर गटांनी पाकिस्तानी रेल्वेगाडीवर हल्ला केला. (छायाचित्र सौजन्यः एक्स पेज व्हिडिओ ग्रॅब)

बलुचिस्तानला पाकिस्तानपासून मुक्त करू इच्छिणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) सदस्यांनी मंगळवारी माच भागात जाफर एक्स्प्रेसवर हल्ला करत रेल्वेचे अपहरण केल्याचा दावा केला.

रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पेशावर-क्वेटा जाफर एक्स्प्रेसवर गोळीबार केला, ज्यात चालक गंभीर जखमी झाला. तर या हल्ल्यात चालकाचा मृत्यू झाल्याचा दावा काही स्थानिक माध्यमांनी केला आहे.

सिब्बी जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली असल्याचे वृत्त एआरआय न्यूजने दिले आहे.

डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंड यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘क्वेटाहून पेशावर जात असलेल्या जाफर एक्स्प्रेसवर पेहरा कुनरी आणि गदलार दरम्यान जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.’

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये 500 प्रवासी प्रवास करत होते.

“बोगदा क्रमांक 8 मध्ये सशस्त्र लोकांनी ट्रेन थांबवली आहे. या ट्रेनमधील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे,”  असे रेल्वे नियंत्रक मुहम्मद कासिफ यांनी पाकिस्तानी वृत्तपत्राला सांगितले.

सूत्रांनी जिओ न्यूजला सांगितले की हल्लेखोरांनी रेल्वे रुळ उडवले आणि नंतर ट्रेनवर गोळीबार केला.

ट्रेनमध्ये सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते आणि हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावरही गोळीबार केला.

अनेक रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, बीएलएने प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांनी 182 जणांना ओलीस ठेवले असून 11 पाकिस्तानी लष्करी जवानांना ठार केले आहे. त्यांनी एक ड्रोन पाडल्याचाही दावा केला. हे ओलिस लष्कर, पोलीस आयएसआय आणि एटीएफचे कर्मचारी आहेत, असा दावा त्यांनी केला.

बीएलएने सांगितले की त्यांनी नागरी प्रवासी, महिला, मुले आणि बलुच रहिवाशांना सुरक्षितपणे सोडले आहे.

बीएलए आणि बलुचिस्तान

अनेक बंडखोर गट, मुख्यतः बीएलए, अनेकदा या प्रदेशातील पाकिस्तानी सरकार, सैन्य आणि चिनी हितसंबंधांना लक्ष्य करतात. पाकिस्तान सरकार या प्रदेशातील समृद्ध खनिज आणि वायू संसाधनांचा अन्यायकारक वापर करत असल्याचा त्यांचा दावा आहे. या प्रदेशात ग्वादर हे जगातील सर्वात मोठ्या खोल समुद्रातील बंदरांपैकी एक आहे. देशाच्या प्रादेशिक आणि जागतिक व्यापार मार्गांसाठी हे महत्त्वपूर्ण मानले जाते.

बलुचिस्तानमध्ये गेल्या वर्षभरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, नोव्हेंबर 2024 मध्ये क्वेटा रेल्वे स्थानकावर झालेल्या आत्मघातकी स्फोटात किमान 26 लोक ठार आणि 62 जखमी झाले होते.

पश्चिमेला इराण आणि उत्तरेला अफगाणिस्तानशी आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक केल्यामुळे बलुचिस्तानला धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleआपला उत्तराधिकारी चीनबाहेर जन्माला येईल – दलाई लामा
Next articlePakistan Train Hijack: 30 सैनिक ठार, 214 प्रवासी अजूनही ओलीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here