भारतासोबतचे रणनीतिक, आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची पनामाची मागणी

0

पनामाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये (UNSC), भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी प्रयत्नांना पुन्हा एकदा पाठिंबा दिला आणि भारतासोबतचे रणनीतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा बोलून दाखवली. यासोबतच त्यांनी भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्याचे खुले समर्थन केले आणि पनामा कालव्याच्या कायमस्वरूपी तटस्थता व संचालनाशी संबंधित कराराच्या प्रोटोकॉलमध्ये सहभागी होण्याचे नवी दिल्लीला आमंत्रण दिले.

StratNews Global शी बोलताना, पनामाचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री कार्लोस ए. होयोस यांनी, जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या अलीकडील दहशतवादी हल्ल्यांबाबत, भारताप्रती सहानभूती व्यक्त केली आणि “आपल्या जीवनाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना मारणे हे निंदनीय कृत्य आहे,” अशा शब्दांत आपला निषेध व्यक्त आहे.

“दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्यात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत. आमच्या प्रदेशातही संघटित गुन्हेगारीमुळे अडचणी आल्या आहेत, त्यामुळे आम्हाला दहशतवादाच्या जागतिक परिणामांची जाणीव आहे आणि त्यामुळे आम्ही अशा देशांना पाठिंबा देण्यास नेहमीच वचनबद्ध आहोत,” असे होयोस म्हणाले. अलीकडेच, शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खासदारांचे एक शिष्टमंडळ पनामाला गेले होते, जिथे या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली.

डिजिटल सहकार्य आणि UPI

दोन्ही देशांतील परस्पर सहकार्याचे एक नवे आशादायक क्षेत्र म्हणजे- डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, विशेषतः डिजिटल पेमेंट्स क्षेत्रातीला सेवा. उपमंत्री होयोस यांनी, भारताच्या यशस्वी Unified Payments Interface (UPI) मॉडेलमध्ये पनामा अधिक रूची दाखवत असल्याचे नमूद केले.

“डिजिटल पेमेंट्स परिवर्तनकारी ठरू शकतात, विशेषतः लहान व्यवसायांसाठी आणि दुर्लक्षित समुदायांसाठी,” असे ते म्हणाले. “भारताच्या UPI अनुभवाकडे आम्ही बारकाईने पाहत आहोत आणि असे नवोपक्रम पनामामध्ये आणि संपूर्ण प्रदेशात लागू करण्याची मोठी शक्यता आहे.”

पनामा आधीच डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर तपासत आहे, जसे की क्रिप्टोकरन्सीद्वारे नगरपालिका कर भरणे, सोबतच ते फिनटेक तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापरासाठी व्यापक नियामक ढांचा विकसित करत आहे. “आमच्यासाठी वित्तीय समावेशन हा प्राधान्यक्रम आहे आणि आमचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की बँक खाते असणे हा मानवाधिकार मानला गेला पाहिजे,” अशा भावना होयोस यांनी व्यक्त केल्या.

UNSC सुधारणा आवश्यक

UNSC च्या सुधारणांसंदर्भात उपमंत्र्यांनी जागतिक संस्थेचे पुनर्रचनेचे तातडीचे महत्त्व अधोरेखित केले. “UN ला जवळपास 80 वर्षे पूर्ण होत आली आहेत. बरेच काही बदलले आहे, आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश व उदयोन्मुख जागतिक शक्ती म्हणून भारताला कायम सदस्यत्वाचा पूर्णपणे योग्य हक्क आहे. आम्ही भारताच्या मागणीला पूर्ण पाठिंबा देतो,” असे ते म्हणाले.

त्यांनी भारताला पनामा कालव्याच्या कायमस्वरूपी तटस्थतेवरील कराराच्या प्रोटोकॉलमध्ये सामील होण्यासाठीही आवाहन केले. “कालवा हा जागतिक शांतता आणि मुक्त व्यापारासाठी पनामाच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. भारताचा सहभाग आंतरराष्ट्रीय तटस्थतेसाठी आणि स्थैर्यासाठी एक ठोस संदेश पाठवेल,” असे त्यांनी नमूद केले.

धोरणात्मक मुत्सद्देगिरी आणि द्विपक्षीय प्रगती

त्याचदिवशी, उपमंत्री होयोस यांनी परराष्ट्र राज्य मंत्री पबित्रा मार्गारिटा यांची भेट घेतली. दोन्ही देशांनी भारत-पनामा संबंधांतील प्रगतीचा आढावा घेतला आणि तंत्रज्ञान, शिक्षण, अक्षय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. भारतानेही पनामाच्या आगामी UNSC अध्यक्षतेसाठी शुभेच्छा व पूर्ण पाठिंबा दिला.

अमेरिकेमध्ये भारतासाठी एक केंद्र

उपमंत्री होयोस यांनी, पनामाच्या लॉजिस्टिक्स आणि फायनान्शियल हब म्हणून असलेल्या अनोख्या स्थानाची माहिती दिली, जे मध्य, दक्षिण आणि उत्तर अमेरिकेमध्ये 800 मिलीयन लोकसंख्येच्या बाजारात भारताला प्रवेश देते. त्यांनी भारतीय कंपन्यांना SEM आणि EMMA स्पेशल इकॉनॉमिक झोनचा फायदा घेण्याचे आवाहन केले. EU च्या निर्बंधात्मक यादीमधून पनामाची वगळणी ही मजबूत नियामक प्रगतीचे लक्षण असल्याचे ते म्हणाले.

“आम्हाला भारतीय कंपन्यांनी पनामामध्ये त्यांचे प्रादेशिक मुख्यालय स्थापन करावे अशी इच्छा आहे. हे पनामाच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि लॅटिन अमेरिकन बाजारपेठांमध्ये प्रवेश शोधणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी फायदेशीर ठरेल,” असे ते म्हणाले.

फार्मास्युटिकल्स, शिक्षण, डिजिटल पेमेंट्स, स्वच्छ ऊर्जा आणि सेमिकंडक्टर्स ही सहकार्याची प्रमुख क्षेत्रे आहेत. पनामा आधीच Haleon सारख्या कंपन्यांसाठी लॉजिस्टिक ऑपरेशन्सचे यजमानपद बजावत असल्याने, होयोस यांनी उत्पादन आणि R&D क्षेत्रातही प्रगतीची इच्छा व्यक्त केली.

पनामाला IIT ची आवश्यकता

द्विपक्षीय चर्चेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, पनामामध्ये Indian Institute of Technology (IIT) चे कॅम्पस स्थापन करणे. होयोस म्हणाले की, ‘असा कॅम्पस संपूर्ण अमेरिकेसाठी एक टॅलेंट मॅग्नेट ठरू शकतो आणि पनामाला ज्ञान व नवप्रवर्तन केंद्र म्हणून स्थापित करण्यात मदत करेल.’

“बौद्धिक टॅलेंटसाठी चाललेल्या जागतिक स्पर्धेमध्ये IIT कॅम्पसचा पनामामध्ये असलेला उपस्थिती परिवर्तन घडवून आणू शकतो, केवळ पनामासाठी नव्हे तर संपूर्ण प्रदेशासाठी,” असे ते म्हणाले. त्यांनी पनामाच्या थेट कनेक्टिव्हिटीवर भर दिला, ज्या अंतर्गत अमेरिकेतील जवळपास प्रत्येक राजधानीशी थेट उड्डाणे उपलब्ध आहेत.

अक्षय ऊर्जा आणि सौर भागीदारी

जगातील मोजक्या कार्बन-निगेटिव्ह देशांपैकी एक असलेला पनामा देश, International Solar Alliance (ISA) च्या माध्यमातून भारताशी सखोल सहकार्य करू इच्छितो. त्याच्या 84% ऊर्जा ग्रीडचा स्रोत अक्षय ऊर्जा आहे (बहुतेक जलविद्युत), आणि सौर ऊर्जा भविष्यातील महत्त्वपूर्ण घटक आहे. होयोस यांनी, भारतासोबत सौर भागीदारी पुढे नेण्याचा आपला हेतू स्पष्ट केला आणि त्यांच्या देशात आधीच अस्तित्वात असलेल्या कायदेशीर व आर्थिक प्रोत्साहनांची माहिती दिली.

पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक

पनामाच्या पाच वर्षांच्या महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक योजनेचा उल्लेख करताना, होयोस यांनी भारतीय कंपन्यांना सार्वजनिक निविदा व खासगी गुंतवणूक संधींमध्ये भाग घेण्याचे आमंत्रण दिले. मुख्य प्रकल्पांमध्ये $2 बिलियन चा पनामा कालव्याच्या साठवण जलाशय, पनामा सिटीला Costa Rica शी जोडणारी रेल्वे लाईन आणि मोठ्या महामार्ग व बंदर विस्तार प्रकल्पांचा समावेश आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर होयोस यांनी जाहीर केले की, पनामा यावर्षीच्या यशस्वी पदार्पणानंतर, जानेवारी 2026 मध्ये पुन्हा एकदा World Economic Forum for Latin America and the Caribbean (LAC) चे आयोजन करेल. यावेळी त्यांनी भारताकडून उच्चस्तरीय शिष्टमंडळाची, शक्य झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त केली.

“मोदींचा LAC मधील सहभाग आमच्यासाठी स्वप्न साकार झाल्याप्रमाणे असेल,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचे “स्थिर, गंभीर आणि किमयागार नेता” असे वर्णन केले.

पुढे काय?

व्यावसायिक राजनैतिकतेपासून ते तंत्रज्ञान हस्तांतरण आणि बहुपक्षीय सहकार्यापर्यंत, परस्पर संधी आणि प्रादेशिक प्रभावाच्या आधारे भारत आणि पनामा यांच्यात संबंधांची सकारात्मक पुर्नरचना होते आहे. “आम्ही येथे फक्त व्यापारासाठी भेटलो नसून, दोन्ही देशांमधील विश्वास, नावीन्यता आणि सामायिक मूल्यांवर आधारित व्यापक भागीदारी बळकट करण्यासाठी भेटलो आहोत,” अशा भावना होयोस यांनी व्यक्त केल्या.

– हुमा सिद्दकी

+ posts
Previous articleनासा भारत सहकार्याने हवामान रडार उपग्रहाचे प्रक्षेपण
Next articleतांबे, ब्राझील, दक्षिण कोरियासह लहान आयातींवर ट्रम्प यांचे नवे टॅरिफ जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here