फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये यंदा ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या शतकातील अशाप्रकारच्या पहिल्याच भव्य दिव्य कार्यक्रमाच्या सुरक्षा विषयक नियोजनाला अंतिम रूप दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून 46 देशांना 2,000 हून अधिक पोलिस अधिकारी पुरविण्यास तुम्ही तयार आहेत का? अशी विचारणा फ्रान्सकडून करण्यात आली आहे. स्पर्धेत होऊ शकणाऱ्या संभाव्य अतिरेकी हल्ल्यांची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने ही विचारणा करण्यात आली आहे.
यासंदर्भात गृह मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, जानेवारीमध्ये इतर देशांना सुरक्षा पुरवण्याची विनंती करण्यात आली आणि सुमारे 2,185 अतिरिक्त सुरक्षा कुमक मागण्यात आली होती. पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेबरोबरच “प्रेक्षकांना याचा आनंद घेता यावा” आणि “आंतरराष्ट्रीय सहकार्य बळकट व्हावे” या हेतूने अधिकाऱ्यांना मदत करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
“प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनासाठी अशा प्रकारचा पुढाकार घेण्यामागे यजमान देशाचा असणारा हा दृष्टीकोन अतिशय उत्तम आहे,” असे मंत्रालयाने म्हटले आहे. फ्रान्सने याआली 2022 मध्ये कतारमध्ये झालेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी 200 सुरक्षा कर्मचारी पाठवले होते. गेल्या वर्षी फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या रग्बी विश्वचषक स्पर्धेसाठी इतर युरोपियन सुरक्षा दलांचे 160 अधिकारी तिथे दाखल झाले होते.
याशिवाय फ्रेंच संरक्षण मंत्रालयाने स्वतंत्रपणे इतर देशांकडे लष्करी कर्मचाऱ्यांच्या अशा एक लहान गटाची मागणी केली आहे जे स्निफर डॉगच्या गटांसोबत खेळांमधील “अत्यंत विशिष्ट” सुरक्षाविषयक कामांमध्ये मदत करू शकतील, असे आर्मी जनरल स्टाफचे प्रवक्ते कर्नल पियरे गौडिलीरे यांनी सांगितले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आमच्याकडून सैनिक पाठवले जाणार असल्याचे पोलंडच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. पोलंडच्या या सशस्त्र दलांच्या टीममध्ये कुत्रा हाताळणाऱ्यांचा समावेश असेल आणि “स्फोटके शोधणे तसेच दहशतवादी घटनांचा प्रतिकार करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असेल”, असे पोलंडचे मंत्री व्लाडिस्लाव कोसिनियाक-कामिस्ज यांनी एक्स वरील पोस्टमध्ये सांगितले आहे.
इस्लामिक अतिरेक्यांकडून वारंवार होणाऱ्या प्राणघातक हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या स्पर्धा आणि त्यानंतर होणाऱ्या पॅरालिम्पिकसाठी 15 दशलक्ष पाहुण्यांचे पॅरिसमध्ये आगमन होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आयोजकांसाठी सुरक्षाव्यवस्था हे सर्वात मोठे आव्हान आहे. उद्घाटन सोहळा नीट पार पडावा यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था ठेवणे हे अतिशय अवघड काम आहे कारण मैदानासोबतच सीन नदीच्या काठावरील नौका आणि तटबंदीवरून या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला प्रचंड गर्दी असेल.
रशियन कॉन्सर्ट हॉलमध्ये नुकताच झालेला प्राणघातक हल्ला आणि इस्लामिक स्टेटने त्याची जबाबदारी स्वीकारल्याच्या पार्श्वभूमीवर फ्रान्स सरकारने सुरक्षा विषयक सतर्कतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. फ्रान्सचे पंतप्रधान गॅब्रिएल अट्टल यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “(मॉस्को) हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारल्याच्या घटनेकडे आमचे अधिकारी अधिक सतर्कतेचा बघत असून आमच्या देशाच्या संदर्भात असलेल्या धोक्यांचा विचार करत आहेत.”
सुब्रत नंदा
(एपीकडून आलेल्या इनपुट्सह)