‘परिवर्तन चिंतन’मध्ये सशस्त्रदलांमधील परिवर्तनाबाबत चर्चा
दि. ११ मे: भारतीय सशस्त्रदलांमधील परिवर्तनाची प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी त्यांच्या संयुक्त आणि एकात्मिकरणाच्या प्रक्रियेला अधिक विस्तारीत करावे लागेल, ज्या योगे भविष्यातील आव्हानांचा सक्षमपणे सामना करण्यासाठी बहुक्षेत्रीय प्रतिसादक्षम (मल्टी डॉमेन रिस्पॉन्स केपेबल) सशस्त्रदलांची उभारणी करता येईल, असे मत संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले. सशस्त्रदलांच्या एकात्मिक संरक्षण मुख्यालयाच्यावतीने आयोजित ‘परिवर्तन चिंतन’ या दोन दिवसीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
भारतीय सशस्त्रदले सध्या परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहेत. ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुसंगत करण्यासाठी एकात्मिक संरक्षण मुख्यालयाच्यावतीने ‘परिवर्तन चिंतन’ या चिंतनात्मक परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेत ‘चिफ ऑफ स्टाफ कमिटी’च्या सर्व उपसमित्यांचे सदस्य, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि संबंधित सैन्यदल मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी, लष्करी व्यवहार विषयक विभागाचे प्रतिनिधी, एकात्मिक संरक्षण मुख्यालयातील अधिकारी उपस्थित होते. अशा प्रकारची पहिली परिषद याच वर्षी (२०२४) एप्रिल महिन्यात घेण्यात आली होती.
‘परिवर्तन चिंतन’मध्ये ‘चिफ ऑफ स्टाफ कमिटी’च्या सर्व उपसमित्यांनी सशस्त्रदलांच्या संयुक्त आणि एकात्मिकरणाच्या प्रक्रियेला पुढे घेऊन जाण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न आणि उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर या विषयावर तपशीलवार चर्चा करण्यात आली आणि या प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध उपाय सुचविण्यात आले. सशस्त्रदलांच्या परिवर्तनाची प्रक्रिया फलदायी होण्यासाठी या दलांच्या संयुक्त आणि एकात्मिकरणाच्या प्रक्रियेला गती द्यावी लागेल, असे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दोन्ही दिवस परिषदेत विविध उपसमिती सदस्यांशी चर्चा केली. सशस्त्रदलांमधील परिवर्तन अधिक विस्तारीत आणि गतिमान होण्यासाठी त्यांच्या एकजिनसी व एकात्मिकरणावर अधिक भर द्यावा लागेल, जेणेकरून ही प्रक्रिया भारताच्या सशस्त्रदलांच्या विद्यमान रचनेला अधिक सक्षम बनवून भारतीय सशस्त्रदलांचे एका बहुक्षेत्रीय प्रतिसादक्षम (मल्टी डॉमेन रिस्पॉन्स केपेबल) सशस्त्रदलांमध्ये रुपांतर करू शकेल, असे जनरल चौहान यांनी नमूद केले. अशा प्रकारची चिंतन परिषद सैन्यदलांच्या विचारप्रक्रियेला गती देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या परिषदेचे सातत्याने आयोजन होणे गरजेचे आहे. या विचारमंथनातून भारताची सशस्त्रदले देशाची अखंडता आणि सार्वोभौमत्त्वाचे रक्षण करण्यासाठी एक ‘थिएटराइज्ड फोर्स’ म्हणून समोर येतील व बहुक्षेत्रीय मोहिमा (मल्टी डोमेन ऑपरेशन) हाती घेण्यास सक्षम होतील, असा विश्वासही संरक्षणदलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केला.
विनय चाटी
(पीआयबी ‘इनपुट्स’सह)