अमेरिकेतील 80व्या UNGA सभेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार नाहीत

0

यावर्षी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) वार्षिक उच्च-स्तरीय जनरल डिबेट सत्रामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताकडून भाषण करणार नाहीत, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सुधारित तात्पुरत्या यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेचे 80वे सत्र, 9 सप्टेंबरपासून अमेरिकेत सुरू होणार असून, उच्च-स्तरीय जनरल डिबेट 23 ते 29 सप्टेंबरदरम्यान पार पडणार आहे. दीर्घकालीन प्रथेनुसार, ब्राझील या चर्चेची सुरुवात करेल आणि त्यानंतर लगेचच अमेरिका आपले भाषण देईल.

23 सप्टेंबर रोजी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, UNGA च्या ऐतिहासिक व्यासपीठावरून जागतिक नेत्यांना संबोधित करतील. त्यांच्या दुसऱ्या अध्यक्षीय कार्यकाळातले हे पहिले महासभेतील भाषण असेल.

शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अद्ययावत तात्पुरत्या यादीत नमूद केल्यानुसार, भारताकडून पंतप्रधान मोदींऐवजी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 27 सप्टेंबर रोजी सभेला संबोधित करणार आहेत.

याआधी जुलैमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या मसुदा यादीत, पंतप्रधान मोदी यांचे भाषण 26 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे नमूद केले होते. याच दिवशी इस्रायल, चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे प्रतिनिधीही महासभेला संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान मोदींनी यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेला भेट दिली होती, जिथे त्यांनी व्हाइट हाऊस येथे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली होती.

ही भेट अशा काळात झाली होती, जेव्हा अमेरिकेने भारतावर एकूण 50% टॅरिफ्स आकारले होते, ज्यात भारताच्या रशियन तेलाच्या आयातीवर 25% विशेष दंडात्मक शुल्क लागू करण्यात आले होते.

‘सर्वात व्यस्त राजनैतिक हंगाम’

दरम्यान अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “UNGA मध्ये भाषण देणाऱ्या वक्त्यांची यादी ही तात्पुरती असते. उच्च-स्तरीय आठवड्याच्या बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी त्यात अनेक वेळा बदल होऊ शकतात. यंदाच्या यादीतही अजून काही सुधारणा होण्याची शक्यता असून, डिबेटच्या पूर्वसंध्येला यादी अद्ययावत होणार आहे.”

दरवर्षी सप्टेंबरमध्ये, संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आयोजित केले जाणारे हे उच्च-स्तरीय सत्र, ‘सर्वात व्यस्त राजनैतिक हंगाम’ म्हणून ओळखले जाते.

यावर्षीचे 80वे UNGA सत्र, इस्रायल-हामास संघर्ष आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पार पडणार आहे. या सत्राचे अधिकृत घोषवाक्य आहे: “Better together: 80 years and more for peace, development and human rights.” (“एकतेत प्रगती: शांतता, विकास आणि मानवी हक्कांसाठी 80 वर्षे आणि त्याहीपुढे”)

22 सप्टेंबर रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त एक स्मरण सभा होऊन सत्राची सुरुवात होईल.

उच्च-स्तरीय संयुक्त राष्ट्र सभा

याशिवाय, यंदा महिलांच्या चौथ्या जागतिक परिषदेला 30 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक उच्च-स्तरीय सभा आयोजित केली जाणार आहे. यामध्ये “Beijing Declaration and Platform for Action” या 1995 च्या ऐतिहासिक घोषणापत्राच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा वचनबद्ध होणे, त्यासाठी संसाधने उभी करणे आणि स्त्रिया व मुलींना सबलीकरण देण्याच्या प्रक्रियेला गती देणे यावर चर्चा होणार आहे.

या बैठकीत, 1995 नंतर स्त्रियांच्या हक्कांसाठी झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल आणि यशस्वी टप्पे, अडचणी आणि उर्वरित आव्हानांवर चर्चा केली जाईल.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस 24 सप्टेंबर रोजी, एक हवामान परिषद (Climate Summit) आयोजित करणार आहेत, जिथे जागतिक नेत्यांना त्यांच्या देशांचे अद्ययावत हवामान कृती आराखडे सादर करण्याची संधी मिळेल, आणि स्वच्छ ऊर्जेकडे होत असलेल्या संक्रमणाचे फायदे अधोरेखित केले जातील.

आठवडाभर चालणाऱ्या इतर प्रमुख उच्च-स्तरीय बैठकांमध्ये- टिकाऊ, सर्वसमावेशक आणि लवचिक जागतिक अर्थव्यवस्थेसाठी शिखर परिषद, असांसर्गिक रोग तसेच मानसिक आरोग्य आणि कल्याणावरील विशेष सत्र, युवकांसाठीच्या जागतिक कृती कार्यक्रमाचा 30वा वर्धापनदिन, AI प्रशासनावरील जागतिक संवादाची सुरुवात, अणुशस्त्रांच्या पूर्ण निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवसाचे पालन आणि म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक गटांच्या परिस्थितीवर चर्चा करणारे सत्र, इत्यादी कार्यक्रमांचा समावेश आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleIndia at SCO 2025: Balancing Between US, Russia & China
Next articleअमेरिकेसोबतचे संबंध काही महिन्यांत पूर्ववत होऊ शकतात का? तज्ज्ञांचे मत…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here