PoK बनले युद्धभूमी: आंदोलक पाकिस्तानी सुरक्षा दलांना भिडले,15 जण ठार

0

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK), गेल्या काही वर्षांतील सर्वात तीव्र जनांदोलन पाहायला मिळाले. या आंदोलनांदरम्यान, पाकिस्तानी सुरक्षादलाच्या सैनिकांनी संतप्त जमावावर गोळीबार केला, ज्यामध्ये किमान 15 जण ठार झाले तर, तीन पोलीस हवालदारांचा देखील मृत्यू झाला.

स्थानिक सरकारला 38 प्रमुख मागण्या पूर्ण करण्यात अपयश आल्यामुळे, या आंदोलनाला सुरुवात झाली होती, मात्र आता आंदोलकांनी लष्करी अत्याचारांविरोधात बंड पुकारले असून, आंदोलनाला तीव्र स्वरुप प्राप्त झाल्यामुळे संपूर्ण प्रदेश ठप्प झाला आहे. 

जीवघेणे संघर्ष

गुरुवारी, आंदोलनाच्या सलग तिसऱ्या दिवशी दडयाल भागात आंदोलक आणि पाकिस्तानी सुरक्षा दलामध्ये मोठ्या प्रमाणावर झटापट झाली. सरकारने इथली परिस्थिती हाताळण्यासाठी हजारो अतिरिक्त जवान तैनात केले. सदर हिंसाचार केवळ मुझफ्फराबादपुरता मर्यादित न राहता, तो हळूहळू रावळकोट, नीलम व्हॅली आणि कोटलीपर्यंत पसरत गेला.

मुझफ्फराबादमध्ये 5 आंदोलकांचा मृत्यू झाला, तर धीरकोटमध्येही 5 जण मारले गेले. दडयाल भागात 2 आंदोलक आणि किमान 3 पोलीस कर्मचारी ठार झाले. आतापर्यंत अंदाजे 200 हून अधिक लोक जखमी झाले असून, त्यापैकी अनेकांना गोळ्या लागल्याचे समजते.

जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती (JKJAAC) ने, या आंदोलनांचे आयोजन केले होते, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशातील जनजीवन ठप्प झाले असून, सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या: पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेल्या काश्मिरी निर्वासितांसाठी राखीव ठेवलेल्या विधानसभेच्या 12 जागा रद्द कराव्यात, करात सवलती द्याव्यात, पीठ आणि वीजसेवेवर अनुदान दिले जावे आणि दीर्घकालीन प्रलंबित विकास प्रकल्प तात्काळ पूर्ण करावेत.

29 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनांमुळे, स्थानिक दुकाने, बाजारपेठा, व्यवसाय पूर्णत: बंद आहेत. सरकारने मोबाईल, इंटरनेट आणि लँडलाइन सेवा बंद केल्यामुळे, जनतेचा संताप अधिकच वाढला आहे.

‘कश्मीर आमचेच आहे’

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये, आंदोलक मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर उतरलेले दिसत आहेत. मुझफ्फराबादमध्ये आंदोलकांना रोखण्यासाठी लावण्यात आलेले कंटेनर हटवून, त्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केल्याचेही पाहायला मिळत आहे.

इतर शहरांमध्ये कर्फ्यू असतानाही आंदोलक रस्त्यावर उतरुन, विविध घोषणा देत आहेत: “शासकांनो, सावध व्हा, तुमचा अंत जवळ आलाय”, “कश्मीर आमचेच आहे, त्याचा निर्णय आम्हीच घेऊ.”

विश्लेषकांच्या मते, पाक-व्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांनी इतक्या उघडपणे इस्लामाबाद आणि लष्कराविरोधात आवाज उठवणे, हे गेल्या अनेक दशकांतील एक दुर्मिळ उदाहरण आहे.

शहबाज शरीफ सरकारवर वाढता दबाव

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी, PoK मधील विस्कळीत झालेल्या कायदा-सुव्यवस्थेवर “गंभीर चिंता” व्यक्त केली आहे आणि यासंबंधी चर्चा करण्यासाठी, नियुक्त समितीचा विस्तार केला आहे.

आंदोलनादरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेची पारदर्शक चौकशी करणार असल्याचे, त्यांनी जाहीर केले असून, सुरक्षादलांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सध्या शरीफ लंडनमध्ये असून त्यांनी तिथूनच सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे आणि आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.

दरम्यान, युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे (UKPNP) प्रवक्ते- नासिर अजीज खान यांनी, संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

UN मानवाधिकार परिषदेत बोलताना त्यांनी, PoK मध्ये मानवी संकट वाढण्याची शक्यता वर्तवली असून, सदस्य राष्ट्रांना त्यांच्या करारानुसार जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

पत्रकारांवर पाक पोलिसांचा लाठीचार्ज

पाकिस्तानी पोलिसांनी, इस्लामाबादच्या नॅशनल प्रेस क्लबवर धाड टाकत, आंदोलक आणि पत्रकारांवर लाठीचार्ज केला. PoK मधील हिंसाचार आणि इंटरनेट बंदीविरोधात आंदोलन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी निशाणा साधला.

पत्रकारांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गृहमंत्री मोसिन नक्वी यांनी याप्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.

समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये, पोलीस पत्रकारांना लाठ्या-काठ्यांनी मारताना, त्यांचे कॅमेरे फोडताना दिसत आहेत. JKJAACचे वकील प्रेस क्लबमध्ये शांततेत आंदोलन करत असताना, हा प्रकार घडला.

सरकारचा दावा आहे की, आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्यानंतरच पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र अनेक व्हिडिओंमध्ये, पोलीस आंदोलकांना क्लबमधून खेचून बाहेर टाकतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसते आहे.

वाटाघाटीची पहिली फेरी

गुरुवारी, पाक सरकारच्या प्रतिनिधीमंडळाने आंदोलकांशी पहिल्या टप्प्यातील चर्चा केली.

त्यानंतर केंद्रीय मंत्री अहसन इक्बाल यांनी, माध्यमांशी बोलताना आंदोलकांना आवाहन केले की, “पाकिस्तानचे शत्रू आपल्या कारवायांचा फायदा घेऊ शकतात. देशाची प्रतिमा, शांतता आणि लोकांचे जीव जपणे हे आपले कर्तव्य आहे.”

भारताची तीव्र प्रतिक्रिया

शुक्रवारी, भारताने या आंदोलनांवर प्रतिक्रिया देत सांगितले की, “पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर उसळलेली आंदोलने, ही पाकिस्तानच्या दडपशाही आणि त्या भागातील संसाधनांच्या शोषणाचे परिणाम आहेत.”

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की: “PoK मधील अनेक भागांत आंदोलने तीव्र होत आहेत आणि पाक सैन्य क्रूरपणे तिथल्या नागरिकांवर कारवाया करत आहेत. ही अस्थिरता म्हणजे पाकिस्तानच्या अनैतिक आणि अन्यायकारक राजवटीचा थेट परिणाम आहे.”

भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत, जयस्वास यांनी सांगितले की: “जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग होते, आहेत, आणि कायम राहतील. हे भाग सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असले, तरी ते भारताचेच अंग आहेत.”

टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleचिनी लोकांना भारतातून थेट विमानसेवा खरोखरंच हवी आहे का?
Next articleIAF Chief Lifts Lid on Operation Sindoor: From Pakistan’s Dozen Jets Destroyed to “Manohar Kahaniyan”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here