हॉंगकॉंगमध्ये नुकत्याच लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या – ज्याला “कलम 23” म्हणूनही ओळखले जाते- पार्श्वभूमीवर आपले पत्रकार आणि इतर कर्मचारी यांच्या सुरक्षिततेबद्दल आपल्याला चिंता वाटत असल्याचे सांगत रेडिओ फ्री एशियाने (RFA) आपले हाँगकाँग कार्यालय बंद करत असल्याची घोषणा केली आहे.
RFA चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी बे फँग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की यापुढे हाँगकाँगमध्ये आपल्या संस्थेचे पूर्ण-वेळ कर्मचारी नसतील, पण शहरातील अधिकृत मीडिया म्हणून असणारी आपली नोंदणी कायम असेल. हाँगकाँगमधील घटनांचा कँटोनीज आणि मंदारिनमध्ये वृत्तांकन करणाऱ्या शेवटच्या स्वतंत्र वृत्तसंस्थांपैकी एक म्हणून फँगने RFA ची ओळख कायम असेल हे मान्य केले.
“हाँगकाँग आणि मेन लॅण्ड चायनामधील आमचे प्रेक्षक, जे आरएफएच्या अचूक वेळ साधणाऱ्या आणि सेन्सॉर न केलेल्या पत्रकारितेवर अवलंबून आहेत त्यांनी खात्री बाळगा की आमचे कार्यक्रम आणि आशय यानंतरही व्यत्यय न आणता सुरू राहतील”, असे आश्वासन त्यांनी दिले.
एकेकाळी आशियातील मुक्त माध्यम आणि अभिव्यक्तीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या हाँगकाँगमध्ये अलिकडच्या वर्षांत लक्षणीय बदल झालेले बघायला मिळाले आहेत. 2019 मधील लोकशाही समर्थकांच्या निदर्शनांमुळे 2020 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर झाला, ज्याने विरोधी मते दाबली गेली. या पार्श्वभूमीवर, न्यूयॉर्क टाइम्ससारख्या प्रमुख मीडिया आउटलेटने त्यांच्या डिजिटल बातम्यांचे कामकाज सेऊलमध्ये हलवण्याचे जाहीर केले.
2020 च्या कायद्यांतर्गत 2021मध्ये करण्यात आलेल्या तपासादरम्यान लोकशाहीचे समर्थक असणारे वृत्तपत्र ऍपल डेली बंद करण्यास भाग पाडले गेले.
अलीकडेच लागू करण्यात आणलेल्या राष्ट्रीय सुरक्षा संरक्षण अध्यादेशामुळे – ज्याला हाँगकाँगच्या लघु-संविधानातील मूलभूत कायद्यातील कलम 23 असेही संबोधले जाते- हाँगकाँगच्या पत्रकारांमधील अनिश्चितता आणखी वाढली आहे. या कायद्याने गुन्हेगारांसाठीच्या शिक्षेत वाढ केली आहे आणि सर्व प्रकारच्या असहमतीवर कारवाई करण्याचे नवीन अधिकार सरकारला दिले आहेत.
कायद्यात “बाह्य धोक्यांचा” जो संदर्भ समाविष्ट आहे आणि चीनची “राष्ट्रीय सुरक्षा” याची जी विस्तृत व्याख्या वापरली आहे, ती अस्पष्ट असल्याचा युक्तीवाद पत्रकार आणि टीकाकारांनी केला आहे. हा नवीन कायदा माध्यम संस्थांना लक्ष्य करेल अशा “खोट्या” बातम्यांचे वार्तांकन आरएफएने केल्याचा आरोप फेब्रुवारीमध्ये हाँगकाँगचे सुरक्षा प्रमुख ख्रिस टॅंग यांनी केला आणि हाँगकाँगच्या लोकांची दिशाभूल करणाऱ्या या माध्यम संस्थेच्या मागे “परदेशी शक्ती” असल्याचे म्हटले.
आरएफएला ‘परदेशी शक्ती’ असे संबोधल्यानंतर हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी कलम 23 लागू केल्यामुळे तटस्थपणे काम करण्याच्या आमच्या क्षमतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात, असे फांग यांनी शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आरएफएने 1996 मध्ये त्याचे पहिले परदेशी कार्यालय हाँगकाँग येथे सुरू केले. अमेरिकन कॉंग्रेसद्वारे याला अर्थपुरवठा होत असला तरी संपादकीयदृष्ट्या स्वतंत्र खाजगी वृत्तसंस्था म्हणून कार्यरत असलेल्या या संस्थेचे उद्दिष्ट अशा भाषा आणि प्रदेशांमध्ये बातम्या प्रदान करणे आहे जिथे अधिकारी बातम्या सेन्सॉर करतात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांसमोर अडथळे निर्माण करतात.
हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटीचे रँकिंग डेमोक्रॅटिक सदस्य ग्रेगरी मीक्स यांनी या निर्णयावर तीव्र चिंता व्यक्त केली आणि आरएफएला हाँगकाँगमधील “दीर्घकाळापासून स्वतंत्र पत्रकारितेचा दीपस्तंभ” म्हटले. ते म्हणाले, “28 वर्षांनंतर हाँगकाँगमधील आरएफएचे कार्यालय बंद करणे हे बीजिंगने हाँगकाँगची स्वायत्तता किती निर्लज्जपणे संपवली आहे याची स्पष्ट आठवण करून देते”
आरएफएची आता पुनर्रचना करण्यात येणार असून हाँगकाँगमधील कार्यालय बंद झाल्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांना अमेरिका, तैवान आणि इतरत्र स्थलांतरित केले जाणार आहे. हे कठीण संक्रमण शक्य केल्याबद्दल संस्थेच्या पत्रकार आणि कर्मचाऱ्यांची प्रशंसा करताना फांग म्हणाले, “आरएफए यानंतर क्लोज मीडिया एन्व्हायर्नमेंट (इंटरनेटद्वारे उपलब्ध नसलेली) करता राखीव असलेल्या वेगळ्या पत्रकारितेचा वापर करण्याकडे वळेल.”
रामानंद सेनगुप्ता