भारत चीन संरक्षणमंत्र्यांची लाओसला भेट होण्याची शक्यता

0
भारत
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 व्या आसियन संरक्षण मंत्र्यांच्या मीटिंग प्लस (एडीएमएम-प्लस) मध्ये सहभागी होण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसांच्या लाओस दौऱ्यावर जाणार आहेत. एडीएमएम-प्लस हे आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या 10 सदस्यांची संघटना (आसियन) आणि त्याचे आठ संवाद भागीदारः भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, कोरिया प्रजासत्ताक, रशिया आणि अमेरिका यांच्यातील संवाद आणि सहकार्यासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करते.
एडीएमएम-प्लसच्या यंदाच्या बैठकीचे आयोजन लाओस येथे करण्यात आले असून त्याचा उद्देश विकसित होत असलेल्या प्रादेशिक सुरक्षा आव्हानांचा सामना करणे आणि संरक्षण सहकार्य वाढवणे हा आहे.
आसियन संरक्षण मंत्र्यांच्या मीटिंग प्लस (एडीएमएम-प्लस) दरम्यान प्रमुख प्रादेशिक सुरक्षा आव्हानांबाबत संरक्षणमंत्री भारताची भूमिका मांडतील, असे सूत्रांनी सांगितले. सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री एडमिरल डोंग जून यांच्यातही बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डेपसांग आणि डेमचोक येथे अलीकडे झालेली सैन्यमाघार आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) गस्त पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच दोनही देशांचे संरक्षणमंत्री एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये चीनचे तत्कालीन संरक्षणमंत्री ली शांगफू यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेसाठी दिल्लीला भेट दिल्यानंतर उभय देशांच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये पहिलीच बैठक होण्याची शक्यता आहे. सैन्याच्या माघारीबाबत नुकत्याच झालेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर संभाव्य भेटीकडे दोनही देशांचा आत्मविश्वास वाढवण्याचा एक महत्त्वपूर्ण उपाय म्हणून पाहिले जात आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, भारत आणि चीनने डेमचोक आणि डेपसांग येथील फ्रिक्शन पॉइंट्सवर संयुक्त गस्त घातली, ज्यामुळे 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या कराराच्या यशाला बळकटी मिळाली. 2020 सालच्या गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर निर्माण झालेल्या तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी दोन्ही देशांनी साप्ताहिक समन्वित गस्त घालण्यास सहमती दर्शवली आहे. चार वर्षांहून अधिक काळापासून द्वैपाक्षिक संबंधांबाबत निर्माण झालेला लष्करी पेच सोडवण्याच्या दिशेने हा करार एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.
सीमा विवाद आणि गुंतागुंतीचे राजनैतिक संबंध यामुळे भारत आणि चीन यांच्यातील तणावपूर्ण संबंध मार्गी लागत असताना, सिंह आणि डोंग जून यांच्यात होणारी संभाव्य बैठक उभय देशांमधील संवादाला चालना देण्यात आणि परस्पर विश्वास बळकट करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
भारत 1992 मध्ये आसियानमध्ये संवाद भागीदार म्हणून सामील झाला, ज्यामुळे प्रादेशिक गटांसोबत महत्त्वपूर्ण भागीदारीची सुरुवात झाली. संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य व्यासपीठाची स्थापना करण्यासाठी ऑक्टोबर 2010 मध्ये हनोई येथे उद्घाटन झालेल्या आसियान संरक्षणमंत्र्यांच्या बैठक प्लसचे (एडीएमएम-प्लस) आयोजन करण्यात आले होते. 2017 पासून, एडीएमएम-प्लसची वार्षिक बैठक आयोजित केली जाते, ज्यात प्रादेशिक सुरक्षा सहकार्य बळकट करण्यासाठी आणि सदस्य देश तसेच संवाद भागीदारांमधील संवाद वाढवण्यासाठी त्याची वचनबद्धता अधोरेखित केली जाते.
रवी शंकर


Spread the love
Previous articleStrengthening Military Diplomacy: General Dwivedi’s Strategic Visit to Nepal
Next articleRussia Strikes Ukraine’s Energy Infra, As War Torn Nation Grapples With Power Shortage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here