संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी, 27 जून 2022 रोजी मलेशियाचे वरिष्ठ संरक्षणमंत्री वाय. बी. दातो सेरी हिशामुद्दीन तुन हुसेन यांच्याबरोबर दूरदृष्य प्रणालीद्वारे परिषद घेतली. या बैठकीत द्विपक्षीय, प्रादेशिक आणि संरक्षण औद्योगिक सहकार्यासंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
ऑगस्ट 2021मध्ये वरिष्ठ संरक्षण मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल दातो सेरी हिशामुद्दीन तुन हुसेन यांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अभिनंदन केले. दोन्ही मंत्र्यांनी भारत-मलेशिया संरक्षण सहकार्याला आणखी चालना देण्याची इच्छा व्यक्त केली.
विद्यमान संरक्षण सहकार्य उपक्रम आणि योजना तसेच विद्यमान मलेशिया भारत संरक्षण सहकार्य बैठक आराखडा (MIDCOM) अंतर्गत सहकार्य आणखी वृद्धिंगत करण्याच्या उपाययोजनांवर उभय मंत्र्यांनी चर्चा केली. पुढील बैठक जुलै 2022मध्ये होणार आहे आणि संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी या मंचाचा वापर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
भारतीय संरक्षण उद्योग मलेशियाला कोणत्या क्षेत्रात मदत करू शकतात, हे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले. भारतीय संरक्षण उद्योगातील सुविधा आणि उत्पादनांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्यांनी मलेशियातील वरिष्ठ अधिकार्यांना भारत दौऱ्यावर येण्याची सूचना केली.
मलेशियाच्या वरिष्ठ संरक्षण मंत्र्यांनी शांतता मोहिमांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्याची गरज व्यक्त केली. दोन्ही मंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर एकमेकांशी संपर्क साधण्याबाबत सहमती दर्शवली. मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्यासाठी क्षमता विकसित करण्यावरही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मलेशियाच्या वरिष्ठ संरक्षणमंत्र्यांना धोरणात्मक संरक्षण संबंधांवर चर्चा करण्यासाठी पुन्हा भारत दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले.
संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्याचा भारत आणि मलेशियाचा निर्णय
![संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्याचा भारत आणि मलेशियाचा निर्णय](https://bharatshakti.in/wp-content/uploads/2022/06/DM.png)