अरुणाचल प्रदेशातील अलॉन्ग-यिंकिओंग रोडवरील सियोम पूलासह, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) लडाख ते अरुणाचल प्रदेशातील, प्रामुख्याने चीनच्या सीमेवर पूर्ण केलेल्या अन्य 27 पायाभूत सुविधा प्रकल्प संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 3 जानेवारी 2023 रोजी एका कार्यक्रमात राष्ट्राला समर्पित केले. 724 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांमुळे भारताच्या सीमावर्ती भागांमधील पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
या प्रकल्पात सियोम पूलासह 22 पुलांचा समावेश आहे. याशिवाय तीन रस्ते तसेच उत्तर आणि ईशान्येकडील सात सीमावर्ती राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील तीन इतर प्रकल्पांवरही काम सुरू आहे. या 28 प्रकल्पांपैकी आठ प्रकल्प लडाखमध्ये आहेत; पाच अरुणाचल प्रदेशात; जम्मू-काश्मीरमध्ये चार; सिक्कीम, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी तीन आणि राजस्थानमध्ये दोन प्रकल्प आहेत. याशिवाय, लडाखमधील दोन आणि मिझोराममधील एक अशा एकूण तीन टेलिमेडिसीन नोड्सचे (केंद्रांचे) उद्घाटन करण्यात आले.
अलॉन्ग-यिंगकिओंग रोड येथील कार्यक्रमात अत्यंत मोक्याच्या जागी असणाऱ्या सियोम पुलाचे उद्घाटन करण्यासाठी संरक्षणमंत्री उपस्थित होते, तर इतर प्रकल्प आभासी पद्धतीने (व्हर्च्युअल) राष्ट्राला समर्पित करण्यात आले. 100 मीटर लांबीच्या, ‘क्लास 70’ स्टील आर्च सुपरस्ट्रक्चरने बनलेल्या सियोम पुलामुळे चीनसोबतच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सैन्य तसेच साधनसामग्रीचे दळणवळण सुलभपणे आणि अधिक जलदपणे करणे शक्य होणार आहे.
सशस्त्र दलांची कार्यसज्जता वाढवण्यासाठी आणि दुर्गम भागातील सामाजिक-आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी, सीमावर्ती भागाच्या विकासाकरिता सरकार आणि बीआरओच्या एकत्रित प्रयत्नांचे हे प्रकल्प निदर्शक असल्याचे संरक्षणमंत्री म्हणाले. सीमावर्ती भागांना जोडणे आणि तेथील रहिवाशांचा विकास सुनिश्चित करणे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
युद्धावर आमचा विश्वास नाही, पण ते लादले गेले तर त्यासाठी तयार आहोत
सतत बदलणाऱ्या भूराजकीय जागतिक परिस्थितीमुळे भविष्यातील आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सशक्त आणि स्वावलंबी ‘नवभारताची’ उभारणी हे सरकारचे उद्दिष्ट आहे, यावर राजनाथ सिंह यांनी भर दिला. “जगभरात आज अनेक ठिकाणी संघर्ष सुरू आहे. भारताची भूमिका नेहमीच युद्धाच्या विरोधात राहिली आहे. ते आपले धोरण आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हे युद्धाचे युग नाही’ असे सांगत, या संकल्पाकडे जगाचे लक्ष वेधले. आमचा युद्धावर विश्वास नाही, पण आमच्यावर ते लादले गेलेच तर त्याचा प्रखर सामना करू. राष्ट्राचे सर्व धोक्यांपासून संरक्षण केले जाईल, याची आम्ही ग्वाही देतो. आमची सशस्त्र सेना सज्ज आहे आणि बीआरओ त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, हे पाहून आनंद झाला,” असे ते म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनी सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे देशाची सुरक्षा बळकट करण्यामध्ये सीमा रस्ते संघटनेने (BRO) बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा विशेष उल्लेख केला. “अलीकडेच, आपल्या सुरक्षा दलाने उत्तर क्षेत्रात शत्रूचा प्रभावीपणे सामना केला आणि धैर्याने व तत्परतेने परिस्थिती हाताळली. या प्रदेशातील पुरेशा पायाभूत सुविधांच्या विकासामुळे हे शक्य झाले. हे आम्हाला दुर्गम भागांच्या प्रगतीसाठी आणखी प्रेरित करते,” असेही राजनाथ सिंह म्हणाले.
पायाभूत सुविधांचा विकास गेम चेंजर ठरेल
सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी पायाभूत सुविधांचा विकास हा गेम चेंजर असल्याचे सांगत राजनाथ सिंह यांनी दूरदूरच्या प्रदेशांमधील सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लावल्याबद्दल बीआरओचे कौतुक केले. सरकार ईशान्य क्षेत्राच्या विकासावर विशेष लक्ष देत आहे, ज्यामुळे देशाची सुरक्षाव्यवस्था मजबूत झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सशस्त्र दल आणि स्थानिक लोकांना पाठिंबा देण्यासाठी सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) अथक प्रयत्नांमुळे, राजनाथ सिंह यांनी “BRO हा राष्ट्राचा भाऊ (Brother) आहे” असा नवा शब्दप्रयोग केला. It’s not the destination, it’s the journey (‘हे गंतव्यस्थान नाही, तर प्रवास आहे’) या प्रसिद्ध वाक्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, सीमावर्ती भागात रस्ते बांधणीसारख्या पायाभूत सुविधांची उभारणी, हा बीआरओचा ‘प्रवास’ आहे. सशक्त आणि समृद्ध भारत हे त्याचे ‘गंतव्यस्थान’ असले पाहिजे, असे ते म्हणाले.
2022मध्ये पूर्ण झालेल्या या 28 प्रकल्पांच्या उद्घाटनासह, वर्षभरात बीआरओच्या 2,897 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 103 पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाखमधील श्योक गावातून संरक्षण मंत्र्यांनी 2,173 कोटी रुपये खर्चाच्या 75 प्रकल्पांचे उद्घाटन केले होते. 2021मध्ये, बीआरओच्या 2,229 कोटी रुपये खर्चाच्या अशा 102 प्रकल्पांचे लोकार्पण झाले.
(अनुवाद : आराधना जोशी)