लष्कराच्या कमांडर्स कॉन्फरन्स या सर्वोच्च स्तरावरील द्विवार्षिक कार्यक्रमात महत्त्वपूर्ण सुरक्षा मुद्यांवर चर्चा आणि सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली. 28 मार्च रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि त्यानंतर 1 आणि 2 एप्रिल 2024 रोजी प्रत्यक्ष उपस्थितीत ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेदरम्यान भारतीय सैन्याच्या सर्वोच्च नेतृत्वाने विद्यमान सुरक्षा स्थिती आणि सुरक्षा यंत्रणेसमोरची सध्याची आव्हाने अशा पैलूंवर व्यापक चर्चा करण्यात आली.
सध्याची सुरक्षा परिस्थिती, सीमा परिस्थिती, अंतर्गत आव्हाने, संघटनात्मक पुनर्रचना, दळणवळण, प्रशासन, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे आधुनिकीकरण यासह राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक विषयांवरही या परिषदेत चर्चा झाली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केलेले मार्गदर्शन हे परिषदेच्या तिसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण होते. तत्पूर्वी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, लष्करप्रमुख, नौदलप्रमुख, हवाईदल प्रमुखांची भाषणे झाली.
“भारतीय सैन्यासाठी तंत्रज्ञानाचा समावेश आणि वापर” याबरोबरच ‘स्वदेशीकरणाद्वारे आधुनिकीकरण’ किंवा ‘आत्मनिर्भरता’ या उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती करण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांचीही माहिती यावेळी देण्यात आली.
संरक्षण मंत्र्यांनी भारतीय सैन्यावर भारतीय नागरिकांचा विश्वास असलेली प्रेरणादायी संस्था म्हणून उल्लेख केला. गरजेच्या प्रत्येक क्षणी नागरी प्रशासनाला मदत करण्याबरोबरच आपल्या सीमेचे रक्षण आणि दहशतवादाविरुद्ध लढताना सैन्याने बजावलेली उत्कृष्ट भूमिका त्यांनी अधोरेखित केली. सुरक्षा, एचएडीआर, वैद्यकीय सहाय्य पासून ते देशातील अंतर्गत परिस्थिती स्थिर राखण्यापर्यंतच्या प्रत्येक क्षेत्रात लष्कराचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. “राष्ट्र उभारणीत तसेच सर्वांगीण राष्ट्रीय विकासात भारतीय लष्कराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे” असे संरक्षण मंत्री म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी सध्याच्या जटिल जागतिक परिस्थितीचा प्रामुख्याने उल्लेख केला, ज्याचा जागतिक स्तरावर प्रत्येकावर परिणाम होतो. “संमिश्र युद्धासह अपारंपरिक आणि विषम युद्ध हे भविष्यातील पारंपरिक युद्धांचा भाग असेल. सायबर, माहिती, दळणवळण, व्यापार आणि वित्त हे सर्व भविष्यातील संघर्षांचा अविभाज्य भाग बनले आहेत. त्यामुळे सशस्त्र दलांनी रणनीती आखताना हे सर्व पैलू विचारात घेण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीवर भर दिला आणि सशस्त्र दलांनी योग्यरित्या ते आत्मसात केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
उत्तर सीमेवरील सद्य परिस्थितीवर भाष्य करताना, कोणतीही आकस्मिक परिस्थिती लष्कर योग्य पद्धतीने हाताळू शकेल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला. तरीही शांततापूर्ण मार्गाने प्रश्न सोडविण्यासाठी सुरू असलेली चर्चा यापुढेही सुरूच राहील. मागे हटणे आणि तणाव कमी करणे हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्र्यांनी सीमा रस्ते संघटनेच्या प्रयत्नांची प्रशंसा केली, त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत काम केल्यामुळे पश्चिम आणि उत्तरेकडील सीमेवरील रस्ते दळणवळणात लक्षणीय सुधारणा झाली आहे असे त्यांनी नमूद केले.
पश्चिम सीमेवरील परिस्थितीसंदर्भात बोलताना त्यांनी सीमेपलीकडील दहशतवादाला भारतीय लष्कराने दिलेल्या प्रतिसादाचे कौतुक केले, मात्र शत्रूकडून छुपे युद्ध सुरूच आहे. संरक्षण मंत्री म्हणाले, “जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाचा सामना करण्यासाठी सीएपीएफ /पोलीस दल आणि लष्कर यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाची मी प्रशंसा करतो. जम्मू आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील समन्वयित कारवाया या प्रदेशात स्थैर्य आणि शांतता वाढवण्यास हातभार लावत आहेत आणि हे प्रयत्न सुरूच राहिले पाहिजेत.”
भाषणाच्या शेवटी, लष्कराच्या आधुनिकीकरण आणि सुधारणांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या सरकारच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार संरक्षणमंत्री यांनी केला.युद्धात शहीद झालेल्या सर्व श्रेणीतील माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असून शूर सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या बलिदानासाठी हा देश कायम ऋणी आहे, असे ते म्हणाले.
ही परिषद धोरणात्मक चर्चेसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ असून बदलत्या सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्या संरक्षण क्षमतांना बळकटी देण्याच्या देशाच्या सामूहिक संकल्पाला पाठिंबा देते.
टीम भारतशक्ती