संरक्षण क्षेत्रातील नवोन्मेषाचा सन्मान करण्यासाठी आयोजित स्पर्धा – iDEX (इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स) प्राइमचा प्रारंभ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाला. तसेच सहाव्या डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंजचाही (संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप उद्योगांसाठीची स्पर्धा) त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. नवी दिल्ली येथे डेफकनेक्ट 2.0 कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी (दि. 22 एप्रिल 2022) या दोन्ही उपक्रमांचा प्रारंभ केला. संरक्षण क्षेत्रातील प्रगतिशील स्टार्टअप उद्योगांच्या विकासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, 1.5 कोटी ते 10 कोटी रुपयांपर्यंतचे पाठबळ देण्याचे iDEXचे उद्दिष्ट आहे.
तसेच, संरक्षणमंत्र्यांनी 38 समस्या मांडणाऱ्या DISC-6चा प्रारंभही केला. पूर्वी सहभागी झालेली तिन्ही सशस्त्र दले आणि संरक्षण क्षेत्रातील काही सार्वजनिक कंपन्यांसह, DISC-6मध्ये संरक्षण क्षेत्रातील सात नवीन कंपन्या, भारतीय तटरक्षक दल आणि केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत कार्यरत संस्थांनी यावर्षी प्रथमच सहभाग घेतला आहे.
DISC-5 आणि ओपन चॅलेंजच्या (OC 2 आणि 3) विजेत्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. तसेच या उद्योगक्षेत्रातील दिग्गजांसह दोन सत्रेही या कार्यक्रमात घेण्यात आली. त्याखेरीज, उदयोन्मुख उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी iDEX, DIO (संरक्षण नवोन्मेषी संस्था)च्या माध्यमातून एक प्रदर्शनही येथे भरवण्यात आले होते.
यावेळी राजनाथ सिंह यांनी, “डेफकनेक्ट हा कार्यक्रम म्हणजे भारताच्या वाढत्या तंत्रसमृद्धीचे प्रतीक होय” असे उद्गार काढले. तसेच, संरक्षण क्षेत्रातील स्टार्टअप उद्योगांना पोषक वातावरणात सतत वाढ होत असल्याचेच यावरून दिसून येते, असेही ते म्हणाले. अनेक नवीन आणि एतद्देशीय तंत्रज्ञानांच्या विकासामध्ये iDEX उपक्रमाचा हातभार असणे हे त्या उपक्रमाचे यशच आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार; खासगी क्षेत्र, नवोन्मेषी व्यक्ती, स्टार्टअप आणि सूक्ष्म, लघु तथा मध्यम उद्योग (एमएसएमई) हे सर्व ‘आत्मनिर्भर भारताचे’ बळकट स्तंभ आहेत, यावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भर दिला. कल्पना लढवा, अभिनव संकल्पना मांडा आणि संरक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान विकसित करा व प्रत्येक बाबतीत एकमेवाद्वितीय होण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले.
(संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकावर आधारित हा लेख आहे)
Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.
https://youtube.com/channel/UCPZPza3BQr6nt1Tp8EntiGg