रण संवाद 2025: भारतीय लष्कराच्या सर्वांगीण परिवर्तनाला चालना देणारा मंच

0

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी हे, 26 आणि 27 ऑगस्ट रोजी, महू येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये होणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी त्रि-सेवा परिषदेत (tri-services seminar) सहभागी होणार आहेत, अशी माहिती बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

‘रण संवाद 2025’ या दोन दिवसीय परिषदेमध्ये, “युद्धावरील तंत्रज्ञानाचा प्रभाव” हा विषय केंद्रस्थानी असणार आहे. या परिषदेत भारतातील सर्वोच्च लष्करी नेतृत्व, निवृत्त सैनिक (veterans), संरक्षण तज्ञ आणि उद्योगांचे प्रतिनिधी एकत्र येणार आहेत. ही परिषद मुख्यालय ARTRAC (Army Training Command) द्वारे मुख्यालय एकात्मिक संरक्षण कर्मचारी (IDS) च्या नेतृत्वाखाली आयोजित केली जात आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, चर्चासत्रात सहभागी अधिकारी भारतीय सैन्याचा सीमेवरील अनुभव, विशेषतः ऑपरेशन सिंदूर दरम्यान, “कठीण शिकवणुकीतून मिळालेले धडे”, उपस्थितांसोबत शेअर करतील आणि भारतीय लष्कराच्या तीनही दलांमध्ये संयुक्ततेची ताकद वाढवण्याच्या उपायांवर विचारविनिमय होईल. तसेच यावेळी तीन नवे संयुक्त सिद्धांत (Joint Doctrines) प्रकाशित होणार असून, त्यामधील एक ‘हेलिबोर्न ऑपरेशन्स’वर आधारित असेल.

दिल्लीमध्ये कर्टन-रेझर कार्यक्रम

बुधवारी, दिल्ली कँटोन्मेंट येथील मानेशॉ सेंटर येथे, एका कर्टन-रेझर कार्यक्रमाचे (curtain-raiser briefing) आयोजन करण्यात आले होते. लेफ्टनंट जनरल विपुल शिंगल, एकात्मिक संरक्षण कर्मचारी (सिद्धांत, संघटना आणि प्रशिक्षण) चे उपप्रमुख यांनी सांगितले की, ‘ही परिषद- धोरण, नवकल्पना आणि राष्ट्रीय सुरक्षा यावरील एकत्रीकरणाची तपासणी करेल.’ यामधील दोन उप-विषय (sub-themes) आहेत:

  • उभरते तंत्रज्ञान आणि भविष्यातील युद्धावर होणारा त्याचा परिणाम
  • तंत्रज्ञानाला गती देण्यासाठी संस्थात्मक प्रशिक्षणातील सुधारणा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे समारोपाच्या दिवशी, म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’ वर लक्ष केंद्रित

ही परिषद, भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर साडेतीन महिन्यांनी होत आहे. या ऑपरेशनचा परिषदेच्या नियोजनावर काही प्रभाव पडला आहे का? असे विचारले असता, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, ‘रण संवाद 2025’ ची तयारी आधीच सुरू झाली होती, परंतु यामध्ये ‘सिंदूर’ चा अनुभव चर्चेचा एक महत्त्वाचा भाग असेल.

“भारताला भविष्यातील युद्धावरील धोरणात्मक चर्चेचे नेतृत्व करणे आवश्यक आहे. आपण कधीकाळी ‘विश्वगुरू’ होतो; आपण ती जागा परत मिळवली पाहिजे आणि उद्याच्या युद्धांसाठी अधिक कुशल असले पाहिजे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

धोरणात्मक संवाद

सोशल मिडीया प्लॅटफॉर्म X वर, प्रसारित केलेल्या एका व्हिडिओ संदेशात, एकात्मिक संरक्षण कर्मचारी (CISC) चे प्रमुख एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी, ‘रण संवाद’ ला केवळ एक परिषद न म्हणता “एक धोरणात्मक संवाद” असे वर्णन केले.

“ज्या युगात निर्णयाचा वेग हेच एक शस्त्र आहे, तिथे आपण एकच शक्ती म्हणून विचार, प्रशिक्षण आणि लढायला शिकले पाहिजे,” असे ते म्हणाले.

“वादग्रस्त सीमांपासून ते सायबर रणांगणांपर्यंत, भारताचे सुरक्षा वातावरण बहुआयामी आणि गतिशील आहे. समन्वय (jointness) आता ऐच्छिक नाही; ते मिशनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ चे यश याची साक्ष देते.”

दीक्षित यांनी यावर भर दिला की, भारताचे सशस्त्र दल त्रि-सेवा संरचना (tri-service structures), संरक्षण-सायबर-अवकाश संस्था, आणि ए.आय., स्वायत्त आणि क्वांटम प्रणालींसह नियोजनात झपाट्याने एकात्मिक होत आहेत. ‘रण संवाद’, हे या बदलांना ऑपरेशनल वास्तवाशी जोडते, असे ते म्हणाले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleDigital Jihad: पाकिस्तानच्या दहशतवादी यंत्रणेने FATF ला कशी मात दिली?
Next articleपाकिस्तानचे आर्थिक केंद्र कराचीला, पाऊस आणि पुराचा जोरदार फटका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here