स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहून नौका (IAC-1) आर 11 म्हणजेच आयएनएस विक्रांत शुक्रवारी भारतीय नौसेनेच्या ताफ्यात समाविष्ट झाली. याद्वारे भारताने संरक्षण क्षेत्रातील स्वदेशीकरणाचा एक मैलाचा दगड गाठला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोची येथील कोचिन शिपयार्ड लिमिटेड येथे हा सोहळा झाला. भारताच्या गौरवशाली सागरी वारशाची साक्ष देणाऱ्या नौदलाच्या नवीन ध्वजाचे देखील पंतप्रधानांनी अनावरण केले.
आएनएस विक्रांतने देशाला नवा आत्मविश्वास दिला आहे, देशात नवीन आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. 21व्या शतकातील भारताची मेहनत, कौशल्य, प्रभाव आणि कटिबद्धता याचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी संबोधित करताना सांगितले. आता नौदलाच्या सर्व शाखांमध्ये महिलांना प्रवेश देण्याची दारे खुली करण्यात आली आहेत, असेही मोदी यांनी सांगितले. आता त्यांच्यावर कुठलीही बंधने नाहीत. सक्षम, शक्तिमान लाटांना जसे रोखता येत नाही, तसेच, आता भारताच्या कन्या देखील निर्बंधमुक्त, बंधनविरहित काम करु शकतील, असे त्यांनी सांगितले.
आजच्या भारतासाठी कुठलेही आव्हान कठीण नाही. विक्रांत हे स्वदेशी क्षमता, स्वदेशी स्रोत आणि स्वदेशी कौशल्य याचे अद्वितीय प्रतीक आहे. ते आपल्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पतेचे एक उत्तम उदाहरण आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी वसाहतवादी गुलामीच्या खुणा पुसून टाकणाऱ्या आणि भारताच्या गौरवशाली सागरी वारशाची साक्ष देणाऱ्या नौदलाच्या नवीन ध्वजाचे देखील अनावरण केले. हा ध्वज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला. हा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक ठरला असून, भारताने, गुलामीच्या खुणा, गुलामीचे ओझे काढून फेकून दिले आहे. आतापर्यंत, भारतीय नौदलाच्या ध्वजावर, गुलामीची खूण कायम होती. मात्र, आजपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन, तयार करण्यात आलेला हा नौदलाचा नवा ध्वज, भारताच्या समुद्रात आणि आकाशात दिमाखाने फडकेल, असे पंतप्रधान म्हणाले.
भारतीय नौदलाच्या अखत्यारीत येणाऱ्या युद्धनौका संरचना विभागाने (WDB) आयएनएस विक्रांतची संरचना तयार केली असून, जहाजबांधणी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तिची निर्मिती केली आहे. भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी युद्धनौका आहे. भारताची पहिली विमानवाहू युद्धनौका विक्रांतच्या स्मरणार्थ या नव्या युद्धनौकेचे नावही विक्रांत ठेवण्यात आले आहे. आपल्या आधीच्या विक्रांत युद्धनौकेने 1971च्या युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. 35 वर्षांच्या सेवेनंतर 1997ला ही नौका भारतीय नौदलाच्या सेवतून निवृत्त करण्यात आली. विक्रांत हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ साहसी असा आहे.
या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू जहाजाच्या डिझाइन आणि निर्मितीला केंद्र सरकारने जानेवारी 2003ला मंजुरी दिली. फेब्रुवारी 2009मध्ये या बोटीची चौकट तयार करण्यात आली तर, 13 ऑगस्ट 2013 रोजी हे जहाज पाण्यात उतरवण्यात आले. नोव्हेंबर 2020मध्ये या जहाजातील मशीन तसेच इतर उपकरणांची चाचणी घेण्यात आली. तर, 4 ऑगस्ट 2021 ते 10 जुलै 2022 यादरम्यान त्याची सागरी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 28 जुलै 2022 रोजी ती नौदलाच्या सुपूर्द करण्यात आली.
आयएनएस विक्रांत, हे आकांक्षी आणि आत्मनिर्भर अशा ‘नव्या भारताचे’ शानदार प्रतीक आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. देशाच्या या ‘अमृतकाळात’आयएनएस, विक्रांत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणे, हे येत्या 25 वर्षांत, भारताची सुरक्षा आणि संरक्षणव्यवस्था मजबूत करण्याच्या सरकारच्या संकल्पाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.
या कार्यक्रमाला माजी नौदल प्रमुख, विद्यमान तसेच निवृत्त नौदल कमांडर, फ्लॅग ऑफिसर्स आणि राजदूत, केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि केरळ सरकारमधील उच्चपदस्थ यांच्यासह अनेक लष्करी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.