‘रेड फ्लॅग-२४’साठी भारतीय हवाईदलाची तुकडी अमेरिकेत

0
Red Flag-24-Indian Ari Force:
‘रेड फ्लॅग-२४’ या बहुपक्षीय हवाई युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाईदलाची तुकडी गुरुवारी अमेरिकी हवाईदलाच्या अलास्का येथील हवाईतळावर दाखल झाली.

बहुपक्षीय हवाई सराव: भारताकडून राफेल करणार प्रतिनिधित्व

Red Flag-24-Indian Ari Force: दि. ३० मे: अमेरिकेच्या हवाईदलाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रेड फ्लॅग-२४’ या बहुपक्षीय हवाई युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाईदलाची तुकडी गुरुवारी अमेरिकी हवाईदलाच्या अलास्का येथील एइल्सन हवाईतळावर दाखल झाली. या सरावात भारतीय हवाईदलातील राफेल ही फ्रेंच बनावटीची लढाऊ विमाने (एमएमआरसीए) सहभागी होणार आहेत. भारतीय हवाईदलाची विमाने आणि वैमानिकांची क्षमता या सरावामुळे जगाला दिसणार आहे.

‘रेड फ्लॅग-२४’मध्ये सहभागी होण्यासाठी राफेल विमानांनी अटलांटिक महासागर ओलांडून अमेरिकेत प्रवेश केला. त्यांना यासाठी हवाईदलाची सी-१७ ही मालवाहू विमाने आणि आयएल-७८ या हवेत विमानात इंधन भरणाऱ्या विमानाची बहुमूल्य साथ मिळाली. या प्रवासादरम्यान या विमानांनी ग्रीस आणि पोर्तुगाल येथे काही काळ थांबा घेतला, असे हवाईदलाच्यावतीने ‘एक्स’ या संकेतस्थळावर म्हटले आहे. ‘रेड फ्लॅग’ हा बहुपक्षीय हवाई युद्धसराव अमेरिकी हवाईदलाकडून आयोजित करण्यात येतो. दहा दिवस चालणारा हा सराव वर्षातून चार वेळा आयोजित केला जातो. हा सराव अलास्कातील इएल्सन या अमेरिकी हवाईदलाच्या तळावर आणि एल्मेंडोर्फ हवाईतळावर आयोजित करण्यात येतो. या सरावात हवाईदलाबरोबरच सैन्याचे इतर विभागही सहभागी होत असतात. विविध प्रकारची लढाऊ विमाने,त्यांचा समन्वय, लढाऊ विमानांचा प्रत्यक्ष मोहिमेतील सहभागाचा सराव, सहभागी हवाईदलांची कार्यक्षमता वृद्धी, बहुक्षेत्रीय युद्धसराव आदी बाबी या सरावात प्रात्यक्षिक स्वरुपात करण्यात येतात. या सरावात सहभागी होणाऱ्या हवाईदलांचे ‘मिशन’ वेगवेगळे असले तरी, एकत्रित समन्वयातून ते पूर्ण करण्यावर भर देण्यात येतो. अमेरिकी हवाईदलाकडून १९७५ मध्ये या सरावाची सुरुवात करण्यात आली होती.

‘रेड फ्लॅग’ची सुरुवात झाल्यापासून सुमारे तीस देशांच्या हवाईदलांनी या सरावात सहभाग नोंदविला आहे. भारतानेही २००८ आणि २०१६ असे दोन वेळा या सरावत भाग घेतला होता. यंदाही अमेरिकी हवाईदलाच्या निमंत्रणावरून भारतीय हवाईदलाची तुकडी या सरावात सहभागी होत आहे, असे हवाईदलाच्यावतीने सांगण्यात आले. या सरावामुळे विविध देशांतील हवाईदलांना एकत्र सराव करून जागतिक स्तरावर आपली क्षमता पारखण्याची आणि आव्हानात्मक परिस्थितीत काम करण्याची संधी मिळते. हा सराव १९७५ प्रथम कोप थंडर या नावाने फिलिपिन्सच्या क्लार्क हवाईतळावर सुरु करण्यात आला होता. ‘सुमारे दोन आठवडे चालणाऱ्या या सरावात सहभागी होऊन भारतीय हवाईदलाने आपल्या जागतिक भागीदारांशी संरक्षण सहकार्याबाबत असलेली वचनबद्धता सिद्ध केली आहे,’ असेही हवाईदलाने म्हटले आहे.

विनय चाटी

(वृत्तसंस्था इनपुट्ससह)

 


Spread the love
Previous article“All Eyes On Rafah” वर इस्रायलचा पलटवार “त्यावेळी तुमचे डोळे कुठे होते?”
Next articleMyanmar’s Ethnic Armies Progress As Junta Weakens

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here