युक्रेन संदर्भातील स्विस शांतता परिषदेला चीनची अनुपस्थिती

0
युक्रेन

युक्रेन शांतता परिषद पुढील महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे. चीनने मात्र या परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला असल्याचे या संपूर्ण घडामोडींशी निगडीत असणाऱ्या चार स्त्रोतांनी सांगितले आहे. रशिया आणि युक्रेन या दोघांचाही या परिषदेत सहभाग असावी अशी अट चीनने घातली होती. मात्र ती पूर्ण होत नसल्याने चीन अनुपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

या युद्धाबाबत तटस्थ भूमिका घेतलेल्या स्विस सरकारने 15-16 जून रोजी होणाऱ्या शिखर परिषदेसाठी जगाच्या विविध भागांतून व्यापक मतदानाची मागणी केली आहे. यामुळे युक्रेनमध्ये शांतता प्रक्रियेचा मार्ग मोकळा होईल अशी स्वित्झर्लंडला आशा आहे. मात्र या परिषदेसाठी रशियाला आमंत्रित करण्यात आलेले नाही.

चीनने या आठवड्यात डिप्लोमॅट्सना यासंदर्भात माहिती देताना सांगितले की ज्या अटींची पूर्तता करण्यात आलेली नाही त्यामध्ये रशिया आणि युक्रेन या दोघांनीही परिषदेला मान्यता दिली पाहिजे, सर्व पक्षांचा यात समान सहभाग असावा आणि सर्व प्रस्तावांवर निष्पक्ष चर्चा झाली पाहिजे यांचा समावेश असल्याचे असे एका सूत्राने सांगितले.

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी मान्यता दिलेल्या आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेसाठी चीनच्या मागण्या “न्याय्य” आणि “निःपक्षपाती” आहेत आणि कोणत्याही पक्षाकडे झुकणाऱ्या नाहीत, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले.

पुढील महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये होणाऱ्या युक्रेन शांतता परिषदेला चीन उपस्थित राहणार नाही, असे वृत्त रॉयटर्सने दिल्यानंतर मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी पत्रकार परिषदेत ही टिप्पणी केली.

“पहिल्या युक्रेन शांतता शिखर परिषदेचे स्वित्झर्लंडमध्ये आयोजन व्हावे यासाठी हे चीनसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून स्वित्झर्लंड आणि त्यात सहभागी असलेल्या सर्व पक्षांसोबत आम्ही काम करत आहोत,” असे माओ म्हणाले.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितले की, सर्व पक्षांच्या समान सहभागाबरोबरच दोन्ही बाजूंनी मान्यता दिलेल्या शांतता परिषदेचे चीन समर्थन करतो.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी सुचवले की चीन अशा शांतता परिषदेची व्यवस्था करू शकतो ज्यामध्ये रशिया आणि युक्रेन दोघेही सहभागी होऊ शकतात.

जानेवारीमध्ये, युक्रेनने स्वित्झर्लंडमधील जागतिक नेत्यांच्या आगामी शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना निमंत्रण दिले. अगदी अलीकडे, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र अमेरिकेने अद्याप शिखर परिषदेसाठी आपल्या प्रतिनिधीच्या उपस्थितीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

चीनचे रशियाशी जवळचे संबंध आहेत आणि त्याने युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियावर टीका करणे टाळले आहे. खरेतर चीनने या संघर्षात मध्यस्थी करण्यास मदत करण्याची याआधीच तयारी दर्शविली आहे.

युक्रेनियन, रशियन आणि स्विस दूतावासांनी चीनच्या अनुपस्थितीबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

या परिषदेला चीनसह अधिकाधिक ग्लोबल साऊथ देश उपस्थित राहावेत यासाठी स्वित्झर्लंड त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे.

रेशम
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleचिनी, अमेरिकी संरक्षणमंत्र्यांत तैवानवरून शाब्दिक चकमक
Next articleबलजीत या २५ टनी ‘बोलार्ड पूल टग’चे नौदलाकडे हस्तांतर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here