उत्तराखंड: ढगफुटी आणि भूस्खलनामुळे बचावकार्यात अडथळा, 5 जणांचा मृत्यू

0

बुधवारी, उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तिथल्या बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवारी, ढगफुटीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान 5 जणांचा मृत्यू झाला असून, डझनहून अधिक लोक बेपत्ता आहेत.

बचाव पथकांचे प्रयत्न सुरू

स्थानिक प्रसारमाध्यमे आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे प्रमुख महामार्ग बंद झाले असून, अजूनही त्या भागात जोरदार पाऊस सुरूच आहे, ज्यामुळे लष्कर आणि आपत्कालीन दलाचे बचाव पथक उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात पोहोचण्यासाठी धडपड करत आहेत. हे गाव गंगोत्री या तीर्थक्षेत्राकडे जाण्यापूर्वीचे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

भारतीय लष्कराने ‘X’ वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, बचावकार्याचे नेतृत्व करणारे लष्कराचे कर्नल हर्षवर्धन म्हणाले, “बेपत्ता लोकांची नेमकी संख्या अजूनही अज्ञात आहे, पण रात्रभर मदतकार्य सुरू आहे. आम्ही लोकांना वाचवून सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

उत्तरकाशी येथील स्थानिक अधिकारी प्रशांत आर्य यांनी रॉयटर्सला सांगितले की, “बाधित भागांकडे जाणारे रस्ते एकतर खचले आहेत किंवा मोठ्या दगडांमुळे बंद झाले आहेत, त्यामुळे तिथे पोहोचणे खूप कठीण झाले आहे. याव्यतिरिक्त, पुराच्या पाण्यात मोबाईल आणि वीज टॉवर्सही वाहून गेल्याने संपर्क साधणे अवघड झाले आहे. त्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांना सॅटेलाइट फोन देण्यात आले आहेत.”

लष्करी छावणीलाही फटका

एनडीटीव्ही वृत्तवाहिनीनुसार, पुरामुळे धराली गावापासून 4 किलोमीटर दूर असलेल्या हर्षिलमधील लष्करी छावणीला देखील फटका बसला असून, ११ लष्करी जवान बेपत्ता आहेत.

लष्कराच्या मध्य कमांडने ‘X’वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “बचावकार्य जलदगतीने करण्यासाठी, अतिरिक्त लष्करी तुकड्या, स्निफर डॉग्स (tracker dogs), ड्रोन, लॉजिस्टिक ड्रोन आणि अर्थमूव्हिंग उपकरणे हर्षिलकडे पाठवण्यात आली आहेत.”

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, यांनी वृत्तसंस्था ‘ANI’ला सांगितले की, “मंगळवारी रात्रीपर्यंत सुमारे 130 लोकांना वाचवण्यात आले आहे. बाधित ठिकाणी अडकलेल्या लोकांना मदत पोहोचवण्यासाठी लष्कराची हेलिकॉप्टर सज्ज ठेवण्यात आली आहेत.”

मोठे नुकसान

टीव्ही वृत्तवाहिन्यांवरून मिळालेल्या माहितीनुसार, डोंगरावरून वेगाने खाली येणारे पावसाचे पाणी आणि चिखल थेट धराली गावावर आल्यामुळे, घरे आणि रस्ते वाहून गेले आहेत. लोकांची स्वतःला वाचवण्यासाठी पळापळ झाली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, या चिखलाच्या प्रवाहाने धराली गावात काही घरे पूर्णपणे जमीनदोस्त आहेत.

उत्तराखंडमध्ये पूर आणि भूस्खलनासारख्या घटना नेहमीच घडतात, ज्यासाठी काही तज्ज्ञ हवामान बदलाला जबाबदार मानतात.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स आणि आयबीएनएसच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articlePost-Operation Sindoor: Drones Become Frontline Assets as India Accelerates Drone-Centric Warfare
Next article3 Months Since Sindoor: India-Pakistan Arms Race Heats Up with China in the Middle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here