“ही सुविधा बंद झाली तर मी कुठे जाईन?” असे 30 वर्षीय खातून तिच्या सहा महिन्यांच्या बाळाच्या संदर्भात म्हणाली. या पुनर्वसन केंद्रात तिच्या मुलाला – ज्याचे लहान पाय ऑर्थोपेडिक ब्रेसमध्ये बांधले गेले होते – क्लबफूटसाठी फिजिओथेरपी ट्रीटमेंट मिळते.
शेजारच्या म्यानमारमधील यादवी युद्धामुळे पळून बांगलादेशात आलेल्या 10 लाखांहून अधिक रोहिंग्यांना – जगातील सर्वात मोठ्या राज्यविहीन लोकसंख्येच्या सदस्यांना-कॉक्स बाजार जिल्ह्यातील शिबिरांमध्ये आश्रय देत आहे, जिथे त्यांना नोकऱ्या किंवा शिक्षणाची मर्यादित उपलब्धता आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या बहुतांश ठिकाणची परदेशी मदत थांबवण्याच्या आणि यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) नष्ट करण्याच्या निर्णयामुळे जागतिक स्तरावर मानवतावादी क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. त्यातच यूएनने इशारा दिला आहे की यामुळे निर्वासितांसमोर भयानक परिस्थिती निर्माण होईल.
बांगलादेशच्या छावण्यांमध्ये, रोहिंग्या निर्वासितांना भीती वाटते की या कपातीमुळे अन्न आणि आरोग्याच्या समस्या वाढतील, त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होईल.
“आता डॉक्टरांची संख्या कमी आहे. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या रोहिंग्या स्वयंसेवकांना बडतर्फ करण्यात आले आहे. लोकांना त्रास होत आहे कारण त्यांना आवश्यक ते उपचार मिळत नाहीत,” असे 24 वर्षीय रोहिंग्या मोहम्मद सादेक म्हणाला.
अमेरिकेच्या मदत कपातीमुळे आरोग्य सेवा विस्कळीत
परराष्ट्र खात्याच्या संकेतस्थळानुसार, अमेरिका हा रोहिंग्या निर्वासितांना मदत करणारा सर्वात मोठा देश आहे, ज्याने 2017 पासून सुमारे 2.4 अब्ज डॉलर्सचे योगदान दिले आहे.
निधीवरील स्थगितीमुळे अमेरिकेच्या अनुदानावर चालणाऱ्या पाच रुग्णालयांना आपल्या सेवेत कपात करावी लागली आहे, असे निर्वासित शिबिरांची देखरेख करणारे बांगलादेशचे वरिष्ठ अधिकारी मोहम्मद मिझानूर रहमान यांनी गेल्या महिन्यात सांगितले.
11 प्राथमिक काळजी केंद्रांसह सुमारे 48 आरोग्य सुविधा देखील प्रभावित झाल्या आहेत, ज्यामुळे अनेक निर्वासितांना आवश्यक सेवा मिळू शकली नाही, असे आंतरराष्ट्रीय बचाव समितीच्या बांगलादेशच्या संचालक हसीना रहमान यांनी सांगितले.
“आमचे प्राधान्य (आता) सर्वात असुरक्षित लोकांचे, विशेषतः महिला, मुली आणि मुलांचे संरक्षण करणे हे आहे,” असे त्या म्हणाल्या.
कॉक्स बाजार येथील स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवणाऱ्या इंटर-सेक्टर कोऑर्डिनेशन ग्रुपचे मुख्य समन्वयक डेव्हिड बगडेन म्हणाले की, आरोग्य सेवांमधील अडथळ्यांमुळे सुमारे 3 लाख निर्वासित प्रभावित झाले आहेत.
बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि अमेरिकी दूतावासाने यावर प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला कोणताही प्रतिसाद दिला नाही.
गुल बहार यांची चार वर्षांची मुलगी मुकरमा, सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त आहे. गेल्या तीन वर्षांपासून तिच्यावर उपचार सुरू आहेत, ज्यामुळे तिची प्रकृती सुधारण्यास मदत झाली आहे.
“जर हे केंद्र बंद झाले तर तिच्यात दिसून आलेली प्रगती फारशी उपयोगी पडणार नाही. मी सर्व काही गमवेन. मी परत पहिल्या पायरीवर येईन जिथून सुरूवात केली होती,” थरथरत्या आवाजात 32 वर्षीय बहार म्हणाली.
भूक आणि गुन्हेगारी
अमेरिका आणि काही युरोपीय देशांनी केलेली कपात यामुळे निर्वासितांसमोर आणखी गंभीर परिस्थिती निर्माण करेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिला.
यूएन वर्ल्ड फूड प्रोग्रामने (डब्ल्यूएफपी) म्हटले आहे की निधीच्या कमतरतेमुळे एप्रिलपासून अन्नधान्य शिध्याची रक्कम कमी करणे भाग पडू शकते, जी आता दिवसाला 6 डॉलर्स इतकी आहे ती कदाचित 20 सेंट इतकीच असेल.
संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की, 2023 मध्ये शिधा कपातीच्या पहिल्या फेरीने ही रक्कम दरमहा 8 डॉलरपर्यंत कमी करण्यात आली होती, ज्यामुळे उपासमार आणि कुपोषणात तीव्र वाढ झाली. ही कपात नंतर उलट करण्यात आली.
“आम्ही छावणीबाहेर काम करू शकत नाही आणि आम्हाला मिळणारे शिधा क्वचितच पुरेल असा मिळतो. जर त्यांनी ते आणखी कमी केले तर गुन्हेगारी वाढेल, लोक जगण्यासाठी काहीही करतील,” असे 2017 मध्ये म्यानमारमधून बांगलादेशात पळून गेलेल्या पाच मुलांचे वडील नोजीर अहमद म्हणाले.
पोलिसांच्या आकडेवारीनुसार, अलिकडच्या वर्षांत रोहिंग्या छावण्यांमधील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी म्यानमारमधील सुमारे 70 हजार रोहिंग्यांनी बांगलादेशात पलायन केले, ज्यामागे काही प्रमाणात त्यांच्या राखीन या मूळ राज्यात वाढत असलेल्या उपासमारीचे कारण होते.
मदतीमध्ये करण्यात आलेल्या कपातीमुळे निर्वासितांना तस्करी, कट्टरतावाद आणि शोषणासाठी अधिक उद्युक्त करू शकते, असे बांगलादेशच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ज्याला माध्यमांशी बोलण्याचा अधिकार नसल्यामुळे नाव न सांगण्याची इच्छा होती.
रोहिंग्या समुदायाचे एक प्रमुख नेते मोहम्मद जुबैर म्हणाले, “आपली अन्न, आरोग्य सेवा आणि शिक्षण व्यवस्था ढासळली आहे. “जर हे हाताबाहेर गेले तर ही केवळ बांगलादेशाचीच समस्या राहणार नाही-ती एक जागतिक समस्या बनेल.”
35 वर्षीय शोफिउल इस्लाम पाच वर्षांपूर्वी झाडावरून पडल्याने आता अंथरुणाला खिळलेला आहे. पुनर्वसन केंद्राने त्याच्यावर उपचार सुरू करेपर्यंत त्याचे जग त्याच्या झोपडीच्या चार भिंतींपुरते संकुचित झाले.
“मी उभा राहू शकत नव्हतो किंवा अंथरुणात कुशीवर वळू शकत नव्हतो. त्यांच्यामुळे, मी पुन्हा हालचाल करू शकत आहे,” असे तो म्हणाला.
“जर ते बंद झाले तर माझी सर्व स्वप्ने उद्ध्वस्त होतील. माझ्यासारख्या लोकांना मग कुठेही फिरता येणार नाही.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुटसह)