युक्रेनच्या हवाईदल व संरक्षण मंत्रालयाचा दावा
दि. २९ मे: पायाभूत सुविधांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने रशियाकडून सोडण्यात आलेली तेरा ड्रोन पाडल्याचा दावा युक्रेनच्या हवाईदलाने ‘टेलेग्राम’ या ‘मेसेजिंग ॲप’वर केला आहे. रशियाकडून मंगळवारी रात्री युक्रेनमधील तीन विभागांना लक्ष्य करून एकूण १४ ड्रोन डागण्यात आली होती, त्यापैकी १३ ड्रोन हवाईदलाने पाडली आहेत, असा दावा युक्रेनच्या हवाईदलाने केला आहे.
युक्रेनच्या उर्जा प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर रशियाने ड्रोन हल्ला केला. मात्र, त्यांनी सोडलेल्या १४ पैकी १३ ड्रोनना पाडण्यात आमच्या हवाईदलाला यश आले आहे. पाडलेल्या ड्रोनचे अवशेष रीव्ने विभागातील वायव्य भागात असलेल्या उर्जा प्रकल्पावर पडले. काही भागातील वीजनिर्मिती प्रकल्प ठप्प करणे आणि युक्रेनच्या संरक्षण यंत्रणेवर दबाव आणणे या उद्देशाने हे हल्ले करण्यात आले होते. मात्र, त्याचा फारसा परिणाम झाला नाही. वीज पुरवठाही तातडीने सुरु करण्यात आला, असे युक्रेनकडून सांगण्यात आले आहे. एका ड्रोनचे अवशेष किरोवोह्रड येथील वीज पुरवठा करण्याऱ्या वाहिनीवर पडले, त्यामुळे वीज पुरवठा बंद पडला. मात्र, दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून, ते प्रगतीपथावर आहे, असे युक्रेनकडून सांगण्यात आले. तर, रशियाने सोडलेली ११ ड्रोन मयकॉलयीव येथे पाडण्यात आली असून, अद्याप हानीचे कोणतेही वृत्त नाही, असे या प्रांताच्या गव्हर्नरकडून सांगण्यात आले आहे.
स्वीडनकडून १.३ अब्ज डॉलरची मदत
दरम्यान, रशियाच्या आक्रमणाविरुद्ध झुंजत असलेल्या युक्रेनला स्वीडनने १.३ अब्ज अमेरिकी डॉलरची मदत जाहीर केली आहे. स्वीडिश चलनात ही रक्कम १३.३ अब्ज क्रोन (स्वीडिश) इतकी होते. स्वीडनकडून युक्रेनला करण्यात आलेली ही आत्तापर्यंत सर्वांत मोठी आर्थिक मदत आहे, अशी माहिती स्वीडनच्या सरकारकडून देण्यात आली. या मदतीबरोबरच स्वीडनने साबची हवाई टेहेळणी आणि नियंत्रण विमान-८९० हे विमानही युक्रेनला दिले आहे. त्यामुळे युक्रेनची हवी संरक्षण यंत्रणा मजबूत होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती स्वीडनचे संरक्षणमंत्री पाल जॉन्सन यांनी दिली आहे. युक्रेनला ७.१ अब्ज डॉलरची (७५ अब्ज स्वीडिश क्रोन्स) अतिरिक्त लष्करी मदत युक्रेनला देणार असल्याचे गेल्या आठवड्यात म्हटले होते. अमेरिकेनेही गेल्या महिन्यात युक्रेनला सहा अब्ज डॉलरची मदत दिली आहे. त्याचबरोबर शस्त्रे आणि हवाई प्रणालीही अमेरिकेकडून युक्रेनला देण्यात आली आहे. ‘पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या मदतीचा वापर युक्रेन रशियाविरोधात करीत आहे. याचे परिणाम चंगले होणार नाहीत, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आहे.
विनय चाटी
(रॉयटर्स ‘इनपुट्स’सह)