कोसळलेल्या सोन्याच्या खाणीत अति खोल भागात अडकलेल्या 13 कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी रशियामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असणारे बचावकार्य थांबवण्यात आले असून या कामगारांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. रशियाच्या पूर्वेला अतिदुर्गम भागातील खाणीत ही दुर्घटना घडली होती. खाणीत पूर आल्याने पाण्याचा उपसा करण्याचे अथक प्रयत्न सुरू होते. मात्र बचावकार्य अधिकाधिक धोकादायक बनत गेल्याने काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मॉस्कोच्या पूर्वेस सुमारे 5 हजार किलोमीटर (3 हजार मैल) अंतरावर असलेल्या अमूर प्रदेशातील झेस्क जिल्ह्यात 18 मार्च रोजी खाणीचा एक भाग कोसळल्यामुळे तिथे काम करत असलेले खाण कामगार अंदाजे 125 मीटर (400 फूट) खोल अडकले. सुमारे 200 बचावकर्ते आणि शक्तिशाली पंप तैनात करूनही, खाणीतील पाण्याची पातळी कमी झाली नाही. त्यामुळे खाण आणखी कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्याने आपत्कालीन बचावकार्य करणाऱ्या टीमला मोठा धोका निर्माण झाला.
प्रादेशिक अधिकारी आणि खाण चालकांनी सोमवारी बचावकार्य थांबवण्यात आल्याचे घोषित केले. परिस्थिती आणखी गंभीर बनली असून खाणीत आणखी काही भाग कोसळण्याची शक्यता असल्याचे त्यांनी मान्य केले. रशियाच्या सर्वात मोठ्या खाणींपैकी एक असलेल्या या खाणीचे संचालन करणाऱ्या कंपनीने पीडितांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे वचन दिले आहे.
या अपघाताचे कारण अद्याप निश्चित झाले नसले तरी, याआधी रशियातील खाणींमध्ये अशाप्रकारे घडलेल्या बहुतांश घटनांमध्ये सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. या घटनेमागील विशिष्ट कारणे अधिकाऱ्यांनी अद्याप उघड केलेली नाहीत.
सोमवारी घडलेल्या दुसऱ्या एका घटनेमध्ये रशियाच्या मध्य स्वेर्डलोव्स्क प्रदेशातील लोखंडी खाणीत स्फोटामुळे Jldi कोसळून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला असून इतर पाचजण तिथे अडकले आहेत. अंदाजे 338 मीटर (1,080 फूट) खोल जमिनीखाली झालेला हा स्फोट नियोजित कामाचा एक भाग होता. अडकलेल्या खाण कामगारांपैकी तीन जणांना वर आणण्यात आले. त्यांची परिस्थिती गंभीर असून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित दोन कामगारांच्या शोधासाठी बचावकार्य सुरू असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
रामानंद सेनगुप्ता