रशिया आणि भारतात अतिरिक्त S-400 Missile प्रणालीसाठी चर्चा सुरू- TASS

0

भारत आणि रशिया यांनी, अतिरिक्त S-400 या, ट्रायम्फ लांब पल्ल्याच्या जमीनीवरुन-हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या पुरवठ्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या आहेत, असे मंगळवारी प्रसारित झालेल्या मीडिया अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. ही चर्चा अशावेळी सुरू आहे, जेव्हा नवी दिल्लीवर रशियासोबतचे संरक्षण आमि ऊर्जा संबंध कमी करण्यासाठी अमेरिकेचा दबाव वाढत आहे.

रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी-टेक्निकल कोऑपरेशनचे प्रमुख- दिमित्री शुगायेव यांनी TASS वृत्तसंस्थेला सांगितले की, “दोन्ही देश नवीन पुरवठ्याच्या शक्यतेवर चर्चा करत आहेत. या क्षेत्रात आपले सहकार्य वाढू शकते. नवीन पुरवठ्याबाबत सध्या आपण वाटाघाटीच्या टप्प्यात आहोत.”

भारताने 2018 मध्ये, रशियासोबत पाच S-400 प्रणालींसाठी $5.5 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. आतापर्यंत रशियाने त्यापैकी तीन प्रणालींचा पुरवठा केला आहे, ज्यातील पहिली 2021 मध्ये भारतात आली. उर्वरित दोन प्रणालींचा पुरवठा 2026 आणि 2027 मध्ये होणार आहे. या अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा आधीच भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षम नेटवर्कमध्ये समाविष्ट करण्यात आल्या असून, पठाणकोट, राजस्थान आणि गुजरात येथे त्यांची तैनाती झाल्याचे सांगितले जाते.

S-400 ही, जागतिक स्तरावरील सर्वाधिक प्रगत हवाई संरक्षण प्रणालींपैकी एक आहे, जी 600 किमी अंतरावरचे लक्ष्य शोधू शकते आणि 400 किमी अंतरावरील लक्ष्य नष्ट करू शकते. प्रत्येक प्रणालीमध्ये मल्टीफंक्शनल रडार, मोबाईल लॉन्चर, अँटी-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्र बॅटऱ्या, स्वतंत्र लक्ष्य शोध व निशाना प्रणाली आणि नियंत्रण केंद्राचा समावेश असतो. भारतीय सशस्त्र दलाने, ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानसोबत मे महिन्यात निर्माण झालेल्या तणावाच्यावेळी याच प्रणालीने बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची नोंद केली आहे.

ही नवीन संरक्षणविषयक चर्चा अशावेळी होत आहे, जेव्हा भारत आणि अमेरिकेतील सामरिक संबंधांमध्ये तणाव जाणवत आहे. मागील महिन्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, भारताच्या रशियाकडून सुरू असलेल्या तेल आणि शस्त्रास्त्र खरेदीचा संदर्भ देत, भारतीय आयातींवर 50% आयात शुल्क लावले. 2020 ते 2024 दरम्यान भारताच्या एकूण संरक्षण आयातींपैकी 36% आयात ही रशियाकडून झालेली आहे.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleभारत अमेरिकेसोबत व्यापार करारावर चर्चा करत आहे: पियुष गोयल
Next articleमोदी आणि पुतिन यांच्या फोटोमुळे, चीनच्या Weibo वर चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here