रशियाचे कीव तसेच इतर प्रदेशांवर मोठे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले

0
रविवारी सकाळी रशियाने कीव तसेच इतर प्रदेशांवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला. युद्ध सुरू झाल्यापासून राजधानी कीववर झालेला हा सर्वात मोठा हल्ला असून यामध्ये किमान चार जण ठार तर डझनभर जखमी झाले.

शेजारील पोलंडने दोन आग्नेय शहरांजवळील आपले हवाई क्षेत्र बंद केले आणि धोका टळून जाईपर्यंत त्यांच्या हवाई दलाने जेट विमानांनी या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले.

युक्रेनच्या सैन्याने सांगितले की रशियाने रात्रभर 595 ड्रोन आणि 48 क्षेपणास्त्रे सोडली. तसेच त्यांच्या हवाई संरक्षण दलांनी 568 ड्रोन आणि 43 क्षेपणास्त्रे पाडली. हल्ल्याचे मुख्य लक्ष्य राजधानी कीव होते असे त्यात नमूद केले आहे.

अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की 12 तासांहून अधिक काळ चाललेल्या या हल्ल्यात एका मुलासह चारजण  ठार झाले, त्यापैकी दोन मृत्यू कीव कार्डिओलॉजी क्लिनिकमध्ये झाले.

त्यांनी सांगितले की हल्ल्यात 80 जण जखमी झाले असून कारखाने, निवासी इमारती आणि ऊर्जा निर्मिती केंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले की त्यांनी युक्रेनवर लांब पल्ल्याच्या हवाई आणि समुद्री शस्त्रे तसेच ड्रोन वापरून हवाई क्षेत्रांसह लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी “मोठ्या प्रमाणात” हल्ला केला आहे.

मॉस्कोने नागरिकांना लक्ष्य केल्याचा इन्कार केला आहे. आतापर्यंत युक्रेनविरुद्धच्या युद्धात हजारो लोक मारले गेले आहेत तर निवासी क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

झेलेन्स्की यांचे आंतरराष्ट्रीय भागीदारांना कारवाई करण्याचे आवाहन

झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाला रशियाच्या आक्रमणाला निधी पुरवणाऱ्या ऊर्जा उत्पन्नात कपात करण्यासाठी निर्णायकपणे कारवाई करण्याचे आवाहन केले. युक्रेन आतापर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॉस्कोवर दंडात्मक निर्बंध का लादावेत हे पटवून देण्यात अपयशी ठरले आहे.

“निर्णायक कारवाईच्या वेळाला आता खूप उशीर झाला आहे आणि आम्हाला अमेरिका, युरोप, G7 आणि G20 कडून तीव्र प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे,” असे त्यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर म्हटले आहे.

रात्रीच्या व्हिडिओ भाषणात बोलताना झेलेन्स्की म्हणाले की संयुक्त राष्ट्र महासभेचे सत्र सुरू असताना, रशियाने “प्रत्येक दिवस, प्रत्येक तास युक्रेनवर हल्ला करण्यासाठी वापरला. नीच प्रहार.”

झेलेन्स्की म्हणाले की रशियाच्या ऊर्जा संसाधनांना, विशेषतः त्याच्या टँकर फ्लीटला लक्ष्य करणाऱ्या युरोपने रशियावर पुढील निर्बंध लागू करणे महत्वाचे आहे.

त्यांनी आग्नेय दिशेला असणारे झापोरिझ्झिया या शहरावर रात्री झालेल्या हल्ल्याचे वर्णन “असाधारणपणे भयंकर” असे केले, ज्यामध्ये जवळजवळ 40 जण जखमी झाले.

मोठ्या स्फोटांनी, ड्रोनने आकाशात उडणाऱ्या आवाजांनी कीवला जाग आली. हवाई संरक्षण यंत्रणांची आकाशात एकच गर्दी झाली. सकाळी 9.13 मिनीटांनी  (06.13 GMT) हवाई हल्ल्याचा इशारा संपल्यानंतर, सुमारे सात तासांनी, एका हल्ल्याच्या ठिकाणाहून सकाळच्या आकाशात धूर पसरला.

रॉयटर्सच्या पत्रकारांनी कीवच्या उपनगरातील एका भागाला भेट दिली, जिथे नवीन बांधलेल्या घरांच्या रांगा जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि  उभ्या असलेल्या गाड्यांवर मोठमोठे ढिगारे कोसळले होते.

स्फोटांमुळे खिडक्या फुटल्यानंतर रहिवाशांनी एका अपार्टमेंट ब्लॉकच्या ढिगाऱ्यात आसरा घेतला.

काही लोक घाईघाईने भूमिगत मेट्रो स्टेशनकडे गेले, जिथून त्यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर घडलेल्या घटना बघितल्या.

होणाऱ्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या संरक्षण दलावर मोठा ताण

2025 मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या मर्यादित हवाई संरक्षण यंत्रणेवर ताण आला आहे. झेलेन्स्की यांनी शनिवारी सांगितले की इस्रायलकडून अतिरिक्त पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली तैनात करण्यात आली आहे आणि या शरद ऋतूमध्ये आणखी दोन येण्याची अपेक्षा आहे.

त्यांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी युक्रेनच्या अवकाशाचे रक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांकडे अधिक क्षेपणास्त्रांची मागणी केली आहे, परंतु हवाई संरक्षण प्रणालींची उपलब्धता मर्यादित आहे आण  इतर देश रशियाकडून येणाऱ्या धोक्यांमुळे स्वतःचे संरक्षण बळकट करण्यास उत्सुक आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleविषबाधेची 6 हजार प्रकरणे, मात्र प्रबोवो यांचे मोफत भोजन कार्यक्रमाला समर्थन
Next articleइराणवरील निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या निर्णयाला युरोपियन युनियनचा दुजोरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here