पूर्व युक्रेनमधील गावे ताब्यात घेतल्याचा रशियाचा दावा

0
रशियन सैन्याने पूर्व युक्रेनमधील अनेक गावांवर ताबा मिळवला असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. मात्र हा दावा कीवने एकतर नाकारला आहे किंवा मान्य करण्यास नकार दिला आहे.

 

रशियाच्या पश्चिमेकडील हल्ल्याचे केंद्रबिंदू असलेल्या डोनेस्तक प्रदेशातील चार गावे आता त्यांच्या ताब्यात आहेत, ज्यामध्ये युक्रेनियन ताब्यात असलेल्या स्लोव्हियान्स्क शहराच्या पूर्वेकडील याम्पिलचा समावेश आहे.

 

युक्रेनने गुरुवारी सांगितले होते की रशियन घुसखोरीच्या प्रयत्नांना न जुमानता याम्पिल अद्यापही त्यांच्याच ताब्यात आहे.

 

रशियाचे प्रमुख जनरल स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांनी गुरुवारी सांगितले की त्यांच्या सैन्याने मोठ्या प्रमाणात नष्ट झालेले कुपियान्स्क शहर ताब्यात घेतले आहे. हा दावाही युक्रेनने  नाकारला आहे.

 

शुक्रवारी युक्रेनने सांगितले की रशियन सैन्याने कुपियान्स्कवर सहा हल्ले केले होते, परंतु कुपियान्सकवर कब्जा मिळवला का याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही.

 

रशियन संरक्षण मंत्रालयाच्या शुक्रवारच्या निवेदनात म्हटले आहे की डोनेस्तक प्रदेशातील इतर तीन गावे – स्टॅव्हकी, नोवोसेलिव्का आणि मास्ल्याकिव्का – आता मॉस्कोच्या ताब्यात आहेत, तसेच शेजारच्या डनिप्रोपेट्रोव्हस्क प्रदेशातील एक गावावरही रशियाने ताबा मिळवला आहे.

 

युक्रेनियन जनरल स्टाफच्या संध्याकाळच्या फ्रंटलाइन रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की स्टॅव्हकी आणि नोवोसेलिव्का ही गावे रशियन हल्ल्याखालील भागात होती मात्र तिथल्या प्रादेशिक नुकसानाबद्दल काहीही माहिती पुरवण्यात आली नाही.

 

गेल्या काही महिन्यांपासून बाराशे किमी (775 मैल) आघाडीच्या रेषेवरील लढाई रशियाच्या पोकरोव्स्कच्या लॉजिस्टिक्स सेंटरवरून पुढे नेण्याच्या प्रयत्नांवर केंद्रित आहे.

 

गेरासिमोव्ह यांनी गुरुवारी सांगितले की क्रेमलिनच्या सैन्याने शहराचा 70 टक्के भाग ताब्यात घेतला आहे, हाही दावा युक्रेनच्या सैन्याने फेटाळून लावला.

 

युक्रेनियन जनरल स्टाफने शुक्रवारी सांगितले की रशियन सैन्याने पोकरोव्स्कजवळील भागात 62 हल्ले केले आहेत.

 

दोन्ही बाजूंच्या स्थानांचा आराखडा तयार करण्यासाठी ओपन सोर्स मटेरियल वापरणाऱ्या युक्रेनियन लष्करी ब्लॉग डीपस्टेटने शुक्रवारी म्हटले आहे की रशियन सैन्य दक्षिणेकडून पुढे सरकत असताना पोकरोव्स्कचे केंद्र “हळूहळू शत्रूच्या नियंत्रणाखाली येत आहे.”

 

त्यात असेही म्हटले आहे की रशियन सैन्य पोकरोव्स्कच्या पूर्वेकडील एका गावाकडे आगेकूच करत आहे.

 

डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशांनी बनलेले सर्व डोनबास काबीज करण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून रशियन सैन्य डोनेस्तक प्रदेशातून पश्चिमेकडे हळूहळू वाटचाल करत आहे.

 

झापोरिझ्झिया प्रदेशातही रशियन सैन्याने दक्षिणेकडे प्रगती केली आहे. युक्रेनच्या एकंदर भूभागापैकी सुमारे 19 टक्के भूभाग रशियन सैन्याच्या ताब्यात आहे.

 

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous article‘Applying Technology For Everyday Use, Strong Suit Of i-Tek’
Next articleयुकेने भारतीयांसाठी कायमस्वरूपी वास्तव्याचे नियम अधिक कठोर केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here