भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी रशियाने नवा आराखडा आखला

0

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी दौऱ्यापूर्वी, रशियाने ऊर्जा, संरक्षण, व्यापार आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रांमध्ये भारतासोबतचे सहकार्य वाढवण्याची योजना आखली आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रेस सचिव, दिमित्री पेस्कोव्ह यांनी नवी दिल्लीत स्पुतनिकद्वारे आयोजित केलेल्या व्हर्च्युअल माध्यम संवादादरम्यान, मॉस्कोच्या प्राधान्यक्रमांचा सविस्तर आराखडा सादर केला.

पेस्कोव्ह म्हणाले की, “भारत-रशिया द्विपक्षीय संबंध हे पारंपारिक राजनैतिक चौकटीपलीकडचे आहेत. हे संबंध परस्पर समज, भागीदारी आणि जागतिक घडामोडींविषयी परस्पर दृष्टीकोन या सखोल ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित आहेत, जे कायद्याच्या अधिष्ठानावर आणि एकमेकांचे हित साधण्याच्या विचारावर अवलंबून आहेत.

ऊर्जा व्यापाराविषयी बोलताना, रशियाचे वर्णन भारतासाठी एका प्रमुख पुरवठादार म्हणून केले. “हा व्यापार भारतासाठी अत्यंत लाभदायक असून, परस्पर फायद्याचा आहे,” असे म्हणत, त्यांनी कुडनकुलम प्रकल्पासह अणुऊर्जा क्षेत्रातील सहकार्याकडे लक्ष वेधले. “रशिया लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्स उत्पादनामधअये भारताला सहकार्य करण्यास तयार आहे, कारण आम्हाला त्या क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“संरक्षण सहकार्य हे कायमच या भागीदारीचा केंद्रबिंदू राहिले आहे. हे केवळ ब्रह्मोस क्षेपणास्त्रांपुरते मर्यादित नाही, तर उच्च तंत्रज्ञान आणि कौशल्यांचे आदानप्रदान आहे,” असे पेस्कोव्ह म्हणाले. त्यांनी Su-57 हे “जगातील सर्वोत्तम विमान” असल्याचा रशियाचा दावा पुन्हा अधोरेखित केला आणि S-400 प्रणाली ही सध्याच्या भागीदारीतील एक महत्वाचा भाग असल्याची पुष्टी केली. भारतीय लष्करात मूळ रशियन बनवावटीच्या 36% प्रणालींचा समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.

व्यापार सहकार्याबद्दल बोलताना पेस्कोव्ह म्हणाले की, “द्विपक्षीय व्यापाराचे प्रमाण 63 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे आणि 2030 पर्यंत ते 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.” त्यांनी पुढे जोडले की, “जवळजवळ सर्व व्यवहार आता स्थानिक चलनांमध्ये केले जातात, ज्यामुळे हे संबंध बाह्य दबावांपासून सुरक्षित राहतात.” व्यापारी असमतोलाबाबतच्या भारताच्या चिंताही त्यांनी यावेळी मान्य केल्या आणि रशियाची भारतातून होणारी आयात वाढवण्याच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी, पुतीन यांच्या भेटीपूर्वी आयातदारांची एक बैठक आयोजित केली जाईल, असे सांगितले.

युक्रेनवर टिप्पणी करताना पेस्कोव्ह म्हणाले की, “मॉस्को भारताच्या भूमिकेचे कौतुक करतो. शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या भारताच्या तयारीची आम्ही प्रशंसा करतो.” संवादाशिवाय युरोप रशियाची भूमिका समजू शकणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

त्यांनी कामगार गतिशीलतेच्या चर्चांना “अत्यंत महत्त्वाचा विषय” म्हणून संबोधले आणि अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर रशिया आणि भारताला घनिष्ठ समन्वयाची गरज असल्याचे सांगितले. चीनबद्दल बोलताना, त्यांनी बीजिंगचे वर्णन “विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदार” असे केले, आणि भारत तयार दर्शवेल तितक्या प्रमाणात, त्रिपक्षीय समन्वय पुढे नेण्यास मॉस्को तयार असल्याचे सांगितले.

पेस्कोव्ह यांनी असा निष्कर्ष काढला की, रशिया-भारत संबंधांचे “भविष्य अतिशय उज्वल आहे” आणि हे संबंध ऐतिहासिकदृष्ट्या मजबूत आणि लवचिक असल्याचे ते म्हणाले.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleलढाऊ विमानांसाठीच्या हायस्पीड एस्केप प्रणालीची DRDO द्वारे यशस्वी चाचणी
Next articleआर्यभट्ट ते गगनयान: भारत-रशिया अंतराळ सहकार्याचे यशस्वी अर्धशतक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here