चीनच्या सहकार्याने रशिया अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा विचार करत असल्याचे रशियाच्या रोस्कोस्मोस या अंतराळ संस्थेचे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी म्हटले असल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
2022 मध्ये रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या बोरिसोव्ह यांनी मंगळवारी दावा केला की, चंद्राच्या आण्विक विकासासाठी आवश्यक तंत्रज्ञान जवळपास तयार असून, रशिया आणि चीन यावर एकत्र काम करतील आणि मॉस्को “आण्विक अंतराळ ऊर्जे’ वरील आपले कौशल्यपूर्ण योगदान द्यायला तयार असल्याचे सांगितले.
सोचीच्या जागतिक युवा महोत्सवात बोलताना बोरिसोव्ह म्हणाले, “आज आम्ही गांभीर्याने एका प्रकल्पावर विचार करत आहोत – ज्यात 2033 – 2035 पर्यंत आमच्या चीनी सहकाऱ्यांसोबत चंद्राच्या पृष्ठभागावर वीज युनिट वितरित करणे आणि स्थापित करणे शक्य होऊ शकेल.
बोरिसोव्ह पुढे म्हणाले की, चंद्रावर स्थायिक होण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा पुरवण्यासाठी अणुऊर्जा हा एकमेव व्यवहार्य पर्याय आहे कारण सौर ऊर्जा पुरेशी ठरणार नाही.
अध्यक्ष पुतीन यांनी मात्र त्यांचा अंतराळात अण्वस्त्रे ठेवण्याचा कोणताही विचार नसल्याचे याआधीच स्पष्ट केले आहे.
युक्रेनविषयी पाश्चिमात्य देशांची चिंता वाढलेली असतानाच ही बातमी पुढे आली आहे. पाश्चात्त्य विश्लेषकांच्या मते रशिया युक्रेन यांच्यातील युद्धात रशियाने अलीकडेच वरचष्मा मिळवला आहे.
एका बाजूला अमेरिका तर दुसऱ्या बाजूला रशिया आणि चीन यांच्यात अंतराळाच्या आण्विक शस्त्रीकरणावरून शाब्दिक युद्ध वाढले आहे.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या स्पेस कमांडचे प्रमुख जनरल स्टीफन व्हाइटिंग यांनी अमेरिकन सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी 2030 पर्यंत “जागतिक दर्जाची” अंतराळ शक्ती बनेल आणि असे झाल्यामुळे अंतराळात अमेरिकेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जाईल असा दावा केला होता.
“चीन आपली लष्करी जागा आणि प्रतिक्षेत्र क्षमता श्वास रोखायला लावणाऱ्या गतीने वाढवत आहे, जेणेकरून अमेरिकन आणि मित्र राष्ट्रांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आवश्यक असणारी अंतराळ क्षमता नाकारता येईल,” असेही ते म्हणाले.
“चीनच्या अंतराळ आणि काउंटरस्पेस प्रणालींमुळे, त्यांनी अमेरिका आणि संलग्न सैन्यावर भूपृष्ठीय आणि अंतराळ कक्षेत लक्ष ठेवण्याची, त्यांचा मागोवा घेण्याची आणि लक्ष्य करण्याची त्यांची क्षमता अविश्वसनीयरित्या वाढवली आहे.”
मात्र याला प्रत्युत्तर देताना चीनने सांगितले की, ते “अंतराळाचा शांततापूर्ण वापर” करण्यासाठी वचनबद्ध आहे.
अमेरिका, रशिया आणि चीन यांनी स्वाक्षरी केलेल्या 1967च्या अंतराळ करारानुसार बाह्य अंतराळात अण्वस्त्रांच्या वापरावर बंदी घातलेली आहे.
मात्र, अलीकडे रशियन अंतराळ कार्यक्रमामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. अमेरिकन उपग्रहांना लक्ष्य करण्यासाठी अंतराळ-आधारित आण्विक शस्त्रास्त्रांच्या संदर्भात रशिया काम करत असल्याचे अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांनी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना याआधीच कळवले असल्याचे वृत्त 15 फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्क टाइम्सने दिले होते. याचा अर्थ रशिया या करारातून बाहेर पडण्याची तयारी करत असल्याचा त्यांना संशय आहे.
मात्र गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवरून रशियाकडून सध्यातरी अशी शस्त्रे तैनात करण्यात येणार नसल्याने तो “तातडीचा धोका” मानण्यात येऊ नये असा निष्कर्ष अमेरिकेने काढला आहे.
अश्विन अहमद