रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचा दावा
दि. १७ मे: युक्रेनच्या प्रदेशातून रशियावर डागण्यात आलेली १०२ ड्रोन पाडण्यात आल्याचा दावा रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणा आणि संरक्षण मंत्रालयाने केला आहे. त्याचबरोबर गुरुवारी रात्री युक्रेनच्या सहा बोटीही जप्त करण्यात आल्या असून या बोटींवर चालकदलातील एकही कर्मचारी आढळला नाही, अशी माहितीही संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. दरम्यान, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असलेला रशियातील तुअप्से येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले असल्याचेही रशियाच्या क्रस्नोदर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रशिया आणि युक्रेनदरम्यानचे युद्ध दिवसेंदिवस अधिकच संहारक होत आहे. रशियाच्या आक्रमणाला युक्रेनकडूनही आक्रमक प्रत्युत्तर देण्यात येत आहे. चिनी तंत्रज्ञानाच्या मदतीने इराणने उत्पादित केलेले ड्रोन युक्रेनकडून रशियावरील हल्ल्यासाठी वापरण्यात येत आहेत. रशियातील महत्त्वाच्या बंदरांवर, तसेच महामार्ग, लष्करीतळ, तेलशुद्धीकरण प्रकल्प, विद्युत उत्पादन प्रकल्प अशा महत्त्वाच्या लक्ष्यांवर युक्रेनकडून हल्ले करण्यात येत आहेत. रशियाने युक्रेनच्या खार्केव्हच्या सीमाभागात मोठी सैन्य जमवाजमव केली असून, या सीमेवरून युक्रेनमध्ये घुसण्याचा रशियन सैन्याचा विचार आहे. त्यामुळे या आघाडीवर सध्या तुंबळ युद्ध सुरू आहे.
युक्रेनने रशियाच्या तुअप्से येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य करण्याबरोबरच सेवास्तोपोल येथील वीजनिर्मिती उपकेंद्रालाही काल लक्ष्य केले.या हल्ल्यात या केंद्राचे मोठे नुकसान झाले असले, तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, अशी माहिती सेवास्तोपोलचे गव्हर्नर मिखाईल राझ्वोझ्हेव यांनी दिली आहे. या हल्ल्यामुळे नुकसान झाले असले, तरी विद्युत पुरवठा पूर्ण बंद पडलेला नाही. काही प्रमाणात तो बंद ठेवण्यात आला आहे. मात्र, या हल्ल्यामुळे अधिक नुकसान होऊ नये यासाठी बालवाड्या, शाळा आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या माध्यमिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, युक्रेनने रशियाच्या दक्षिणेला असलेल्या बेल्गोरोड शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात ओक्त्याब्रस्क्य खेड्यातील एका महिलेसह तिच्या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचे या भागाचे गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लाद्कोव यांनी सांगितले. ही महिला आपला पती आही मुलासह जात असताना युक्रेनने डागलेले ड्रोन त्याच्या मोटारीवर आदळले, या हल्ल्यात हे तिघेही गंभीर जखमी झाले. महिला व मुलाचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी असले, तरी बचावले आहेत, असे ते म्हणाले.
विनय चाटी
(‘रॉयटर्स’च्या ‘इनपुट्स’सह)