युक्रेनने डागलेली दहा क्षेपणास्त्रे पाडल्याचा रशियाचा दावा

0
Russia-Ukraine War

रशियन हवाई दलाची क्रिमीयात कारवाई

दि. १५ मे: युक्रेनने डागलेली आणि ‘आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम’ (एटीएसीएमएस) या नावाने ओळखली जाणारी दहा लांबपल्ल्याची क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा रशियाच्या हवाईदलाने केला आहे. ही क्षेपणास्त्रे रशियन अधिक्रांत क्रीमियात पाडली असून त्याचे अवशेष मानवी वस्तीवर पडल्याचेही रशियाकडून सांगण्यात आले आहे.

‘मंगळवारी रात्री युक्रेनमधून क्रीमियावर डागण्यात आलेली दहा ‘एटीएसीएमएस’ क्षेपणास्त्रे रशियाच्या हवाईदलाच्या हवाईहल्ला प्रतिबंधक यंत्रणेने पाडली. मात्र, या क्षेपणास्त्रांचे अवशेष मानवी वस्तीवर पडले. मात्र, या मुळे कोणतीही पडझड अथवा जीवितहानी झाली नाही,’ असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने टेलिग्राम या मेसेजिंग ॲपवर म्हटले आहे. रशियाने सेवास्तोपोल या क्रिमियन बंदराचे नियंत्रण करण्यासाठी गव्हर्नर म्हणून नियुक्त केलेल्या मिखाईल राझ्वोझहायेव यांनी मात्र क्षेपणास्त्राचे अवशेष मानवी वस्तीवर पडल्यामुळे पडझड झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्राथमिक वृत्तानुसार या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही, असेही त्यांनी टेलिग्राम या मेसेजिंग ॲपवर म्हटले आहे. रशियाने दहा वर्षांपूर्वी युक्रेनच्या ताब्यातील क्रीमियावर हल्ला करून तो प्रदेश रशियाला जोडून घेतला होता. रशियाच्या या कृतीची युक्रेनच्या पाश्चिमात्य मित्रदेशांनी निंदा केली होती. युक्रेनला अमेरिकेने पुरविलेल्या ‘आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम’चा  (एटीएसीएमएस) वापर युक्रेनकडून रशियाविरोधात करण्यात येत आहे, असा दावा रशियाकडून सातत्याने करण्यात येतो. मात्र, या क्षेपणास्त्राचा आपल्याविरुद्ध वापर झाल्याचे पुरावे अद्याप रशियाकडून देण्यात आलेले नाहीत.

रशियाच्या आक्रमणाचा मुकाबला करण्यासाठी ‘आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम’ (एटीएसीएमएस) ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षण यंत्रणा युक्रेनला पुरविण्यास अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या वर्षीच्या एप्रिल महिन्यात मंजुरी दिली होती. त्यामुळे ही क्षेपणास्त्रे व हवाई संरक्षण यंत्रणा युक्रेनच्या सैन्याकडे पोहचली आहे, असा दावा एका अमेरिकी अधिकाऱ्याने केला आहे. युक्रेनकडून हल्ल्यासाठी या क्षेपणास्त्रांबरोबरच, नऊ ड्रोन आणि इतर शस्त्रांचाही वापर करण्यात आला आहे. बेल्गोरोड शहरावर त्यांनी केलेला हा हल्ला परतवून लावण्यात आला आहे. असेच, युक्रेनकडून सोडण्यात आलेली पाच ड्रोन रशियाचा कुर्स्क व तीन ड्रोन ब्र्यान्स्क पाडण्यात आल्याची माहितीही रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाल्याची माहिती बेल्गोरोड प्रांताच्या गव्हर्नरनी दिली आहे. मात्र, या वृत्ताची तातडीने खातरजमा होऊ शकली नाही, युकेनकडूनही याबाबत अद्याप कोणतेही मत प्रदर्शित करण्यात आलेले नाही. बेल्गोरोड हा रशियाचा प्रदेश खार्कीव्ह या युक्रेनच्या प्रदेशाला लागून आहे. खार्कीव्हवर रशियन फौजांचे मोठे हल्ले सुरु असून, त्यांची आगेकूच सरू आहे.

रशिया आणि युकेन यांच्यात फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरु आहे. रशियाने या कारवाईला युद्ध असे न म्हणता विशेष मोहीम असे म्हटले आहे. या युद्धात मानवी वस्ती अथवा नागरिकांना लक्ष्य केले नसल्याचा दावा रशिया आणि युक्रेन दोघांकडूनही केला जात आहे. मात्र, या युद्धात आत्तापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला असून, लाखो नागरिक विस्थापित झाले आहेत. तर, युक्रेनमधील शहरे मातीच्या ढिगाऱ्यात परिवर्तीत झाली आहेत. ‘रशियाकडून आमच्यावर रोज असंख्य हल्ले होत असून, रशियाच्या लष्करी, वाहतूक आणि उर्जा संबंधित पायाभूत सुविधांवर हल्ले करून ती नष्ट करण्याचा व रशियाची युद्धाक्षमता संपवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’असे युक्रेनने म्हटले आहे.

विनय चाटी

(‘रॉयटर्स’च्या ‘इनपुट्स’सह)


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here