रशियाने युक्रेनसोबत सुरू केलेल्या युद्धाला यंदाच्या 24 फेब्रुवारीला तीन वर्षे पूर्ण झाली. 2022 मध्ये हे युद्ध सुरू झालं त्यावेळी अवघ्या दहा दिवसांमध्ये युक्रेनचा पाडाव होईल असे अनेकांनी भाकीत केल्याचे भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन अ. गोखले यांनी सांगितले. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रम गोखले यांनी या युद्धाला झालेल्या तीन वर्षांबाबत तसेच यानंतरच्या घडामोडींवर मार्गदर्शन केले.
या युद्धात अगदी सुरुवातीला तुलनेत अतिशय लहान असणाऱ्या युक्रेनने रशियाच्या नाकी नऊ आणले होते. या युद्धात युक्रेनने ज्या प्रकारे ड्रोन्सचा वापर करून रशियन रणगाड्यांचा विध्वंस केला त्यामुळे सगळे जग आश्चर्यचकित झाले होते.
त्याचवेळी रशियाची मोठ्या प्रमाणात आर्थिक नाकेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे तरी रशिया हे युद्ध थांबवेल असा सगळ्यांचा समज होता. मात्र तसे झाले नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर युक्रेन रशिया युद्धात झालेली हानी प्रचंड प्रमाणात आहे. बायडेन प्रशासन काळात युक्रेनला दिली जाणारी युद्धविषयक मदत यानंतर दिली जाणार नाही असे वक्तव्य करून नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे बायडेन प्रशासन युक्रेनच्या बाजूने तर नवनिर्वाचित ट्रम्प प्रशासन युक्रेनच्या विरोधात असे चित्र सध्या बघायला मिळत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध आपण 24 तासांमध्ये थांबवू असे जरी म्हटले तरी प्रत्यक्षात तसे झालेले नाही. मात्र युद्ध थांबवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून संपूर्ण जग लवकरच एका अत्यंत महत्वाच्या आणि मोठ्या घटनेचे साक्षीदार बनणार असल्याचे गोखले यांनी म्हटले आहे.
एकीकडे या महिन्याच्या अखेरीस ट्रम्प आणि पुतीन यांच्यात बैठक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे युरोपियन देशांमधले 28 नेते याच आठवड्याच्या शेवटी नवी दिल्ली येथे एकत्र येणार आहेत. या बैठकीत त्यांच्यातही युद्धाबाबत चर्चा होण्याची तसेच त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
अर्थात रशिया अमेरिका यांच्यात होणाऱ्या बैठकीत आपल्यालाही सहभागी करून घ्यावे अशी मागणी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केली आहे. मात्र युक्रेनने स्वतःच्या हाताने ही संधी आधीच गमावली असल्याचे मत गोखले यांनी व्यक्त केले आहे. जागतिक बुद्धिबळच्या पटावर युक्रेन हे युरोपियन देशांच्या हातातले एक प्यादे आहे अशीही प्रतिक्रिया गोखले यांनी व्यक्त केली.
एकीकडे या घडामोडी घडत असताना त्यांचा इस्रायल हमास यांच्यातील युद्धविरामावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे नितीन गोखले यांनी स्पष्ट केले.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून रणनीतीचा पूर्ण भाग बघा –
https://youtu.be/pSs9trqh9iU?