रशियाच्या दक्षिणेकडील कुर्स्क प्रदेशात झालेल्या लढाईमध्ये, रशियन आणि उत्तर कोरियाच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले आहे, असा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शनिवारी केला.
युक्रेनियन तसेच पाश्चात्य मूल्यांकने असे सांगतात की, ‘कुर्स्क प्रदेशामध्ये उत्तर कोरियाचे सुमारे 11 हजार सैनिक तैनात आहेत, जिथे ऑगस्टमध्ये युक्रेनियन सैन्याने मोठ्या प्रमाणात सीमापार घुसखोरी केल्यानंतर, बराच मोठा भूभाग व्यापला होता.
एका व्हिडीओ संदेशामध्ये, झेलेन्स्की यांनी, शीर्ष युक्रेनियन कमांडर- ओलेक्झांडर सिर्स्की यांच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, ”युक्रेनियन सीमेपासून फार दूर असलेल्या माखनोव्का गावाजवळ लढाया झाल्या होत्या. गेल्या २ दिवसांमध्ये कुर्स्क प्रदेशातील माखनोव्का या फक्त एका गावाजवळ झालेल्या लढाईत, रशियन सैन्याने उत्तर कोरियाच्या पायदळ सैनिकांचा आणि रशियन पॅराट्रूप्सचा एक बटालियन गमावला. याठिकाणी दोन्ही सैन्यांचे मोठे नुकसान झाले.”
राष्ट्रपतींनी अद्याप याविषयी कोणताही विशिष्ट तपशील दिलेला नसला, तरी प्रत्येक बटालियनचा आकार हा भिन्न असतो आणि साधारणत: एका बटालियनमध्ये शेकडो सैनिकांचा समावेश असतो.
दरम्यान, रॉयटर्सला राष्ट्रपतींच्या वतीने सांगितलेल्या या गोष्टीची स्वतंत्रपणे पडताळणी करता आलेली नाही.
झेलेन्स्की यांनी मागील आठवड्यात, कुर्स्क क्षेत्रातील उत्तर कोरियाच्या मोठ्या नुकसानीची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, ‘त्यांच्या सैन्याचे रशियन सैन्याद्वारे पुरेसे संरक्षण केले जात नव्हते, ज्यांच्यासोबत ते लढत होते.’
ते पुढे म्हणाले की, ‘उत्तर कोरियाचे लोक कैद होऊ नयेत, म्हणून अत्यंत कठोर पावले उचलत आहेत. वेळप्रंसगी काही घटनांमध्ये त्यांच्या स्वत:च्याच सैन्याला त्यांनी गोळ्या घातल्या आहेत.’
आपल्या ताज्या टिप्पण्यांमध्ये, झेलेन्स्की यांनी असेही म्हटले, की ”पोकरोव्स्क शहराजवळील 1,000-किमी लांबीच्या (620-मैल) संपूर्ण फ्रंट लाइनवर, अतिभयंकर लढाया झाल्या होत्या.”
“रशियन सैन्याने त्यांच्या स्वत:च्या सैनिकांचा या हल्ल्यांध्ये मोठ्या संख्येने बळी दिला आहे”, असेही त्यांनी सांगितले.
युक्रेनच्या एका लष्करी प्रवक्त्याने यापूर्वी सांगितले आहे की, ”पोकरोव्स्क हे कायमच ‘सर्वात ज्वलंत’ क्षेत्र राहिले आहे. ज्यामध्ये रशियन सैनिकांनी शहराजवळ नवीन हल्ले सुरू केले आहेत, जेणेकरून ते दक्षिणेकडून शहर bypass करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि युक्रेनच्या सैन्याला पुरवठा मार्ग कापण्याचा त्यांचा उद्देश आहे.”
युक्रेनच्या एकेकाळच्या पोलाद उद्योगाला, कोकिंग कोळशाचा पुरवठा करणाऱ्या एकमेव खाणीचे तळ, अशी पोकरोव्स्क शहराची ओळख होती. या शहराची युद्धपूर्व लोकसंख्या सुमारे 60 हजार इतकी होती. मात्र युक्रेनच्या अंदाजानुसार, आता त्यापैकी 11 हजार इतकीच लोकसंख्या तिथे शिल्लक आहे.
(रॉयटर्सच्या इनपुटसह)