रशियाकडून ओडेसावर क्षेपणास्त्र हल्ला, पाच ठार; ‘हॅरी पॉटर कॅसल’ देखील नष्ट

0
हॅरी पॉटर कॅसल, सौजन्य - एएनआय

रशिया आणि युक्रेन यांच्यात 26 महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू आहे. सध्या ही लढाई संपलेली दिसत नाही. त्यातच रशियाकडून पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे समोर आले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, काळ्या समुद्राच्या ओडेसा बंदर शहरात झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून 30हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात अनेक निवासी इमारतींसह नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आधीही रशियन सीमेपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या युक्रेनच्या खार्किव शहरावर ग्लाइड बॉम्बने हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले. याशिवाय एका बहुमजली निवासी इमारतीचेही नुकसान झाले. युक्रेन दोन वर्षांहून अधिक काळापासून रशियाचे आक्रमण रोखण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे रशियन सैन्याकडून खार्किव आणि ओडेसा या प्रमुख शहरांना लक्ष्य करत नियमितपणे क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा सुरू आहे.

युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने रशियाकडून झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ जारी केला आहे. समुद्रकिनाऱ्यावर एकापाठोपाठ एक बॉम्ब कसे फुटले हे त्यात दिसत आहे. अहवालानुसार, रशियन हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये एक शैक्षणिक संस्था होती, जिचा बोली भाषेतील उल्लेख ‘हॅरी पॉटर कॅसल’ म्हणून केला जात असे कारण या कॅसलमध्येच हॅरी पॉटर सिनेमाच्या विविध भागांचं शूटिंग झालं आहे

अधिकाऱ्यांनी या इमारतीचा बुरुज आणि छत जळत असल्याची छायाचित्रेही शेअर केली आहेत.

हा हल्ला इस्कंदर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जनरल आंद्रे कोस्टिन यांनी सांगितले की क्षेपणास्त्राचे अवशेष आणि धातूचे तुकडे जप्त करण्यात आले आहेत. जखमींमध्ये दोन मुले आणि एका गर्भवती महिलेचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

कॉस्टिन यांनी सांगितले की, सुमारे 20 निवासी इमारती आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे. तर दुसरीकडे, रशियन अधिकाऱ्यांनी क्रिमियामध्ये युक्रेनने केलेला क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला रोखण्यात यश मिळाल्याचा दावा केला.

आराधना जोशी
(एएनआयच्या इनपुट्सह)


Spread the love
Previous articleअत्याधुनिक, चपळ व तंत्रज्ञानस्नेही लष्कर गरजेचे
Next articleतटरक्षकदलाकडून लक्षद्वीप येथे आरोग्य शिबीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here