रशियन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे एकीकडे आर्थिक विकासाला चालना मिळत असतानाच, हवाई प्रवासात होणारी वाढ ही रशियाच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक आव्हान ठरले आहे. रशियाच्या नागरी विमान वाहतूक क्षेत्राची ग्राहकांच्या आर्थिक भरभराटीचा आणि वाढत्या मागणीचा फायदा उचलण्यासाठी अजूनही धडपड सुरू आहे कारण त्यांच्याकडे प्रवासासाठी पुरेशी विमाने उपलब्ध नाहीत.
युद्ध सुरू असूनही रशियन लोक देशांतर्गत सहलीच्या ठिकाणी किंवा “मैत्रीपूर्ण” देशांमध्ये जाऊन पाश्चिमात्य निर्बंधांचे सर्रास उल्लंघन करताना दिसत आहेत कारण त्यांचे या देशांमध्ये अजूनही स्वागत केले जात आहे.
पाश्चात्य देशांच्या आर्थिक निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था डळमळीत होणे आणि युद्ध सामुग्री कमी होण्याइतका अपेक्षित परिणाम झाला नसला तरी विमाने आणि त्याच्या सुट्या भागांचा पुरवठा बंद झाला आहे. ही कमतरता देशांतर्गत उत्पादन भरून काढू शकलेले नाही. परिणामी, वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी रशियाच्या ताफ्यात फारच कमी नवीन विमानांची भर पडली आहे आणि शेजारच्या देशांना रशियातील देशांतर्गत मार्गांवरील हवाई वाहतूक सुरू ठेवण्यासाठी आपल्याला मदत करण्यास सांगण्याची वेळ रशियावर आली आहे.
रशियाने या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आपली आर्थिक लवचिकता दर्शविली असली तरी पाश्चिमात्य विमानांवरील अवलंबित्व संपुष्टात आणण्यातील अडचण ही पाश्चिमात्य प्रभावापासून मुक्त होण्याच्या आणि देशांतर्गत उद्योगांना चालना देण्याच्या रशियाच्या ध्येयमर्यादा अधोरेखित करते. युरोपची बहुतेक हवाई हद्द रशियन वाहतूकीसाठी बंद असल्याने, बहुतांश वाहतूक देशांतर्गत मार्गांवर हलवण्यात आल्याचे रशियाच्या नागरी विमानचालन निरीक्षक रोझावियात्सियाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
एफएसबी सुरक्षा सेवेच्या आकडेवारीनुसार, तुर्की, माजी सोव्हिएत देश आणि यूएईसारख्या ज्या देशांनी रशियावर निर्बंध लादलेले नाहीत अशा देशांकडे आता आंतरराष्ट्रीय प्रवासाची दिशा वळली आहे.
कोविडच्या लाटेपूर्वीच्या तुलनेत इजिप्त, थायलंड आणि चीनमध्ये जाणाऱ्या रशियन प्रवाशांची संख्या वाढली आहे. याउलट, 2019 मध्ये युरोपला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे 1 कोटी होती ती आता काही लाखांवर आल्याचे आकडेवारीवरून दिसून बघायला मिळाले.
ग्राहकांच्या मागणीचा एक महत्त्वाचा मापदंड मानली जाणारी रशियाची किरकोळ विक्री 2022 च्या घसरणीनंतर गेल्या वर्षी जोरदारपणे मोठ्या प्रमाणात सावरली.
अलिकडच्या काही महिन्यांत ती वाढ संथ झाली असली तरी, वाढत्या उत्पन्नामुळे विमान प्रवास, कार आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी वाढत आहे. यात पश्चिमेकडील तिसऱ्या देशांद्वारे आयात केल्या गेलेल्या वस्तूंचा देखील समावेश आहे.
“कालपर्यंत या लोकांचे उत्पन्न तुलनेने कमी होते, आता त्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाल्याने त्यांच्याकडे उत्पन्नातील मोठा भाग शिल्लक राहतो आणि त्यांच्यापैकी अनेकांनी या शिल्लक उत्पन्नाचा संपूर्ण उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी वापर केला आहे,” असे विमानचालन तज्ज्ञ ओलेग पॅन्टेलीव्ह यांनी रॉयटर्सला सांगितले. मात्र, त्या मागणीशी जुळवून घेणे हे हवाई वाहतूक क्षेत्रासाठी एक आव्हान आहे.
रशियाच्या ताफ्यातील जवळपास 80 टक्के विमाने परदेशी बनावटीची आहेत, असे स्विस विमानचालन पुरवठादार सीएच-विमानचालन संस्थेकडून मिळालेल्या आकडेवारीवरून दिसून येते. रशियाच्या 865 विमानांच्या ताफ्यातील 575 किंवा दोन तृतीयांश वाटा एअरबस आणि बोईंग विमानांचा आहे.
मात्र युद्धानंतर या दोनही कंपन्यांनी रशियातून आपली विमाने माघारी बोलवल्यानंतर सुरुवातीला हा देशांतर्गत उद्योगाचा विजय म्हणून त्याकडे बघण्यात आले. “स्पर्धक निघून गेले. काही वर्षांपूर्वी देशांतर्गत विमान वाहतूक उद्योग या परिस्थितीचे केवळ स्वप्नच पाहू शकत होता,” असे रोस्टेक या औद्योगिक समूहाचे प्रमुख सर्गेई चेमेझोव्ह यांनी ऑगस्टमध्ये रॉयटर्सला सांगितले.
रॉस्टेक, ज्याची उपकंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन रशियाच्या जवळजवळ सर्व प्रमुख विमान उत्पादकांवर नियंत्रण ठेवते, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यापासून अजूनही दूरच आहे.
युक्रेनवर आक्रमण करण्यापूर्वीच्या वर्षात रशियाने आपल्या ताफ्यात 54 नवीन व्यावसायिक विमानांचा समावेश केला होता. यामध्ये एअरबसच्या 27, बोईंगच्या तीन आणि 24 रशियन-निर्मित सुखोई सुपरजेट्सचा समावेश आहे. याशिवाय फ्लॅग कॅरियर एरोफ्लोट, एस 7, रेड विंग्स, रोसिया आणि उरल या विमान कंपन्यांच्या विमानांचाही समावेश आहे.
तेव्हापासून गेल्या तीन वर्षांत, रशियाच्या ताफ्यात केवळ 11 नवीन विमानांची भर पडली असून, ती सर्व सुपरजेट्स आहेत.
रोस्टेकने तयार केलेल्या रशियाच्या नवीन एमएस-21 विमानाचे उत्पादन आधीच 2024 मधून 2025 – 26 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. रशियाला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चेमेझोव्हने मान्य केले, मात्र ते निश्चितपणे स्वतःची प्रवासी विमाने तयार करतील असे सांगितले.
एअरबस ए320 निओ इंजिनची दुरुस्ती करू न शकलेल्या रशियन विमान कंपन्यांना त्यांच्या काही एअरबस ताफ्यातून निवृत्त व्हावे लागेल असे वृत्त द कोमर्संट दैनिकाने गेल्या आठवड्यात दिले. रशियाचा सेवाक्षम एअरबस ए320 निओ ताफा लहान झाला असला तरी रशियाच्या व्यावसायिक विमानांपैकी त्यांचा वाटा पाच टक्क्यांहूनही कमी आहे, असे रोसावित्सियाने सांगितले.
रशियन विमान वाहतुकीवरील निर्बंधांमुळे सध्याच्या इंजिनच्या समस्या आणखी गुंतागुंतीच्या झाल्या आहेत, असे रोसावियात्सिया यांनी सांगितले. रॉयटर्सच्या विश्लेषणानुसार, विमान वाहतूक क्षेत्रावर परिणाम झाल्यापासून मॉस्कोने राज्य अनुदान आणि कर्जावर किमान 1.47 कोटी रूबल्स (13 अब्ज अमेरिकन डॉलर्स) खर्च केले आहेत. विशेष म्हणजे, रशिया 2030 पर्यंत हजारांहून अधिक विमाने निर्माण करण्याच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या उद्दिष्टाचा पाठपुरावा करत आहे.
तरीही सध्या रशियाने मध्य आशियाई देशांना काही देशांतर्गत मार्गांवर हवाई वाहतूक सुरू ठेवण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे.
रशियाने भारत आणि चीनकडेही मदत मागितल्याचे एका मुख्य भारतीय व्यावसायिक वृत्तपत्राने म्हटले आहे. व्यापार, तंत्रज्ञान आणि राजकीय मदतीसाठी रशियाचे सध्या चीनवरील अवलंबित्व वाढत आहे.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)