पाकिस्तानला पुन्हा झटका, सौदीच्या युवराजांनीही दिला भारत-पाकिस्तान चर्चेवर जोर

0
सौदीचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान (उजवीकडे) सोमवारी 8 एप्रिल 2024 रोजी मक्का अल-मुकर्रमाह येथील अल-सफा पॅलेसमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत. (छायाचित्र सौजन्यः सौदी परराष्ट्र मंत्रालय)

इस्लामाबाद- सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची रियाध येथे भेट घेतली. त्यावेळी झालेल्या बैठकीत सौदीच्या युवराजांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील वाढलेला संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आवश्यक असल्याचा पुनरुच्चार केला.

फेब्रुवारीमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर शरीफ यांचा हा पहिलाच परदेश दौरा होता. त्यांनी रविवारी बिन सलमान यांची भेट घेतली.

पाकिस्तानचे परराष्ट्र कार्यालय आणि सौदी सरकारने संयुक्तपणे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि त्यातही विशेषतः जम्मू आणि काश्मीर विवादावर तोडगा काढण्यासाठी चर्चा केली जावी यावर दोन्ही बाजूंनी (सौदी आणि पाकिस्तान) भर दिला, यामुळे या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित व्हायला मदत होईल.

शरीफ आणि बिन सलमान यांनी नियोजित 5 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीच्या पॅकेजला गती देण्याबाबतही चर्चा केली. रोख रकमेची टंचाई असलेल्या पाकिस्तानला आपली चालू खात्यातील तूट भरून काढण्यासाठी या रकमेची नितांत गरज आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला हे संकेत देणेही आवश्यक आहे की पाकिस्तान परदेशी वित्तपुरवठ्यासाठी आवश्यक त्या अटींची पूर्तता पूर्ण करू शकते, जी मागील बेलआउट पॅकेजमधील प्रमुख मागणी होती.

1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून काश्मीरचा वादग्रस्त हिमालयीन प्रदेश आपला असल्याचा दावा केला जात आहे. दोन कट्टर शत्रू असणाऱ्या या शेजारील देशांमध्ये झालेल्या तीनपैकी दोन लढाया याच भागात लढल्या गेल्या आहेत.
2019 मध्ये काश्मीरमध्ये भारतीय लष्करी ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोट हल्ल्यात पाकिस्तानस्थित दहशतवादी असल्याचे आढळून आल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील नेहमीच नाजूक राहिलेले संबंध पार बिघडले आहेत. प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला (एअर स्ट्राइक) केला.

त्यातच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी वक्तव्य केले की, देशात दहशतवादी कारवाया करण्याचा प्रयत्न करून सीमेपलीकडे पळून जाणाऱ्या कोणालाही ठार करण्यासाठी गरज पडली तर भारत पाकिस्तानातही प्रवेश करेल.

परदेशी भूमीवर राहणाऱ्या दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी आखण्यात आलेल्या योजनेचा एक भाग म्हणून भारत सरकारने 2020 पासून पाकिस्तानमध्ये सुमारे 20जणांना ठार केले असा अहवाल ब्रिटनच्या गार्डियन वृत्तपत्राने प्रकाशित केल्याच्या एका दिवसानंतर संरक्षणमंत्री बोलत होते.

पाकिस्तानने जानेवारीत म्हटले होते की, त्यांच्या भूमीवर त्यांच्या दोन नागरिकांच्या हत्येशी भारतीय एजंट्सचा संबंध असल्याचा विश्वासार्ह पुरावा त्यांच्याकडे आहे. मात्र हा खोटा आणि द्वेषपूर्ण प्रचार असल्याचे भारताने म्हटले आहे.

भारताचे सौदी अरेबियासह इतर अरब देशांशी दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ते आणखी मजबूत झाले आहेत. 19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या निवडणुकीत मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर येतील अशी अपेक्षा आहे.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

 


Spread the love
Previous articleInfrastructure Development Transforms Border Village in Asaphila area in Arunachal Pradesh
Next article‘Expect The Unexpected’: Army Chief Gen Manoj Pande Warns Force

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here