लष्कराचे मोठे नुकसान झाल्यानंतर आणि काही सैनिकांना ताब्यात घेऊनही उत्तर कोरिया युक्रेनच्या सैन्याशी लढण्यासाठी रशियाकडे आणखी सैन्य पाठवण्याची तयारी करत असल्याचा संशय दक्षिण कोरियाच्या लष्कराने शुक्रवारी व्यक्त केला.जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफच्या (जेसीएस) निवेदनानुसार, “रशिया-युक्रेन युद्धासाठी सैन्य पाठवून चार महिने उलटून गेले आहेत आणि अनेक जीवितहानी तसेच कैद्यांच्या अटकेची नोंद झाली आहे, त्यामुळे उत्तर कोरिया अतिरिक्त सैन्य तैनात करण्याच्या तयारीला गती देत असल्याचा संशय आहे.”
जेसीएसच्या विश्लेषणात उत्तर कोरिया इतर कोणत्या तयारीची योजना आखत आहे का हे स्पष्ट केले नाही.
उत्तर कोरिया हेरगिरी उपग्रह आणि आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (आयसीबीएम) प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहे, मात्र तात्काळ कोणती कारवाई करण्यात येईल अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीत,” असे जेसीएसने सांगितले.
या महिन्यात युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की रशियाच्या कुर्स्क प्रदेशात दोन उत्तर कोरियाच्या सैनिकांना पकडण्यात आले आहे,
शरद ऋतूत या युद्धात प्रवेश केल्यापासून युक्रेनने प्रथमच उत्तर कोरियाच्या सैनिकांना जिवंत पकडले आहे. युक्रेनियन आणि पाश्चात्य अभ्यासकांच्या मते, प्योंगयांगने रशियाच्या पश्चिम कुर्स्क प्रदेशात मॉस्कोच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी सुमारे 11 हजार सैनिक तैनात केले आहेत. हा प्रदेश युक्रेनने गेल्या वर्षी अचानक केलेल्या हल्ल्यात ताब्यात घेतला होता.
कीवच्या म्हणण्यानुसार 3 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत.
सुरुवातीला, मॉस्को आणि प्योंगयांग या दोघांनीही उत्तर कोरियाचे सैन्य तैनात झाल्याबाबतचे वृत्त फेटाळून लावले. मात्र, ऑक्टोबरमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशियामध्ये उत्तर कोरियाच्या सैनिकांची उपस्थिती नाकारली नाही. उत्तर कोरियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की अशी कोणतीही तैनाती कायदेशीर असेल.
जून 2024 मध्ये पुतीन यांच्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यानंतर हे सहकार्य वाढत आहे. या भेटीदरम्यान उभय नेत्यांनी परस्पर संरक्षण करारासह ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी करार’ वर स्वाक्षऱ्या केल्या.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)