Serbia: सत्ताधारी पक्षाचे समर्थक आणि विरोधकांमधील संघर्ष आटोक्यात

0

बुधवारी संध्याकाळी, सर्बियाच्या नोवी साद शहरात, सत्ताधारी सर्बियन प्रोग्रेसिव्ह पार्टी (SNS) च्या समर्थकांनी, सरकारविरोधी आंदोलकांवर फटाके आणि आगीचे गोळे फेकले. त्यामुळे संघर्ष थांबवण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली. ही घटना, सर्बियामध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील मोठी घटना मानली जात आहे.

नोव्हेंबर 2024 मध्ये, नोवी सादमधील नव्याने बांधलेल्या रेल्वे स्थानकाचे छप्पर कोसळून 16 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या दैनंदिन आंदोलनांमुळे, राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्हूचिच आणि त्यांच्या SNS पक्षाच्या लोकप्रियतेला मोठा धक्का बसला आहे.

बुधवारी रात्रीच्या पत्रकार परिषदेत, व्हूचिच यांच्यासोबत गृहमंत्री इव्हिका डॅचिच उपस्थित होते. व्हूचिच यांनी सांगितले की, “नोवी साद शहरातील हिंसाचारात, 16 पोलीस आणि सुमारे 60 SNS समर्थक जखमी झाले आहेत.” त्यांनी अनामिक विदेशी शक्तींवर दंगल घडवून आणल्याचा आरोप केला असून, अटकेची घोषणा केली.

“परकीय शक्तींनी निर्माण केलेल्या भयानक परिस्थितीवर आज आम्ही नियंत्रण मिळवले आहे. ज्यांनी कायदा तोडला आहे त्या सर्वांना अटक केली जाईल.” असे व्हूचिच म्हणाले.

खाजगी N1 टीव्हीने दाखवलेल्या व्हिडिओमध्ये दिसते आहे की, SNS पक्षाच्या कार्यालयाजवळून आंदोलकांवर फटाके आणि ज्वालागोळे फेकले जात होते. तसेच, रक्ताळलेल्या चेहऱ्यांनी काही जखमी आंदोलक म्हणत होते की- ‘व्हूचिचच्या समर्थकांनी काठ्या आणि लाठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.’

“मूव्ह-चेंज” या विरोधी चळवळीने आरोप केला की, या संघर्षासाठी व्हूचिच यांचेच समर्थकच जबाबदार आहेत.

“आतषबाजीच्या फटाक्यांनी लोकांवर हल्ला करणे, म्हणजे त्यांच्या जिवंत राहण्याच्या आणि आंदोलन करण्याच्या अधिकाराचा भंग आहे,” असे या चळवळीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

बेलग्रेडमध्ये आंदोलकांना अडवले

राजधानी बेलग्रेडमध्ये, दंगानियंत्रक पोलीस दलाने आंदोलनकर्त्यांना संसदेजवळील उद्यान परिसरात जाण्यापासून रोखले. व्हूचिचचे समर्थक त्याठिकाणी मार्चपासून तळ ठोकून आहेत.

बेलग्रेडमधील इतर भागांतही, आंदोलकांनी SNS कार्यालयाजवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची पोलिसांशी झटापट झाली.

देशभरातील आंदोलकांचे म्हणणे आहे की, “नोवी सादच्या छत कोसळण्यामागे भ्रष्टाचार कारणीभूत आहे, आणि त्यांनी तातडीच्या निवडणुकांची मागणी केली आहे, ज्यायोगे व्हूचिच आणि त्यांचा पक्ष, तब्बल 13 वर्षांनंतर सत्तेतून बाजूला जाईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.”

विद्यार्थी, विरोधी पक्ष आणि भ्रष्टाचारविरोधी संस्थांनी व्हूचिच आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर संघटित गुन्हेगारीशी संबंध, विरोधकांवर हिंसाचार, आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणल्याचे आरोप केले आहेत, जे आरोप व्हूचिच यांनी फेटाळले आहेत.

बुधवारी संध्याकाळी, विद्यार्थ्यांनी सर्व प्रमुख शहरांमधील SNS कार्यालयांपुढे आंदोलन करण्याचे आवाहन केले. यामध्ये बेलग्रेड, नोवी साद, क्रागुजेव्हॅक, काकाक, आणि नीस यांचा समावेश होता. हे आवाहन, मंगळवारी व्रबस शहरात आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यांनंतर करण्यात आले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleलैंगिक हिंसाचारावरून संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांचा इस्रायल, रशियाला इशारा
Next articleपाकिस्तानी पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी सज्ज असलेली भारताची ASW भिंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here