युक्रेनच्या ऊर्जा केंद्रांवर रशियचे हल्ले, लहान मुलीसह सात जणांचा मृत्यू

0

गुरुवारी, रशियाने युक्रेनच्या ऊर्जा केंद्रांवर आणि अन्य ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला, ज्यामुळे देशभरात वीजपुरवठ्यावर निर्बंध लादावे लागले. या हल्ल्यांमध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये एका 7 वर्षीय लहान मुलीचाही समावेश होता, अशी माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पंतप्रधान युलिया स्विरिडेन्को यांनी, मॉस्कोवर आरोप केला की, त्यांनी हिवाळा जवळ येत असताना, युक्रेनच्या जनतेला आणि वीजपुरवठा व्यवस्थेला जाणूनबूजून लक्ष्य केले.

“त्यांचा उद्देश युक्रेनला अंधारात ढकलण्याचा आहे, पण आमचा उद्देश प्रकाश टिकवून ठेवण्याचा आहे,” असे स्विरिडेन्को यांनी टेलिग्राम अ‍ॅपवर म्हटले. “हा दहशतवाद थांबवण्यासाठी आपल्याला अधिक हवाई संरक्षण प्रणाली, कडक निर्बंध आणि आक्रमकावर कमाल दबाव आवश्यक आहे.”

प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, “अग्नेय दिशेला असलेले औद्योगिक शहर झापोरिझ्झियामध्ये, दोन पुरुषांचा मृत्यू झाला आणि मध्य विनित्सिया प्रदेशात झालेल्या हल्ल्यामध्ये 7 वर्षांच्या मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला, जी हल्ल्यामुळे गंभीर जखमी झाली होती.”

प्रादेशिक राज्यपालांनी सांगितले की, “झापोरिझ्झियाच्या दक्षिणेला असलेल्या एका गावावरही नंतर ड्रोन हल्ला झाला, ज्यात एकाचा मृत्यू झाला आणि एकजण जखमी झाला.”

रशियाच्या उत्तरेकडील सीमेजवळ असलेल्या सुमी शहरातील, प्रादेशिक राज्यपालांनी टेलिग्रामवर लिहिले की, “शुक्रवारी पहाटे एका तासात शहरावर 10 रशियन ड्रोन हल्ले झाले. दोन नागरी इमारतींना त्याचा फटका बसला, ज्यात दोन लोक जखमी झाले आणि ऑनलाईन पोस्ट केलेल्या छायाचित्रांमध्ये अनेक अपार्टमेंटला आग लागलेली दिसत होती.”

नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप, रशियाने फेटाळला

राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की, यांनी रात्रीच्यावेळी प्रदर्शित केलेल्या त्यांच्या व्हिडिओ संदेशात सांगितले की, “पूर्व डोनेत्स्क प्रदेशातील स्लोव्हीयान्स्क येथील थर्मल पॉवर प्लांटवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात, दोन लोकांचा मृत्यू झाला आणि काहीजण जखमी झाले.”

डोनेत्स्क प्रदेशातील अभियोक्त्यांनी सांगितले की, “क्रामातोर्स्क शहरातील निवासस्थानांवर झालेल्या रशियन हल्ल्यांमध्ये, एकाचा मृत्यू झाला आणि तीन जखमी झाले.”

स्लोव्हीयान्स्क आणि क्रामातोर्स्क ही शहरे, डोनेत्स्क प्रदेशातून हळूहळू पश्चिमेकडे सरकणाऱ्या रशियन सैन्याच्या भविष्यातील महत्त्वाच्या लक्ष्यांपैकी मानली जातात.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “त्यांच्या दलांनी युक्रेनच्या लष्करी-औद्योगिक संकुलातील सुविधांवर रात्रीच्यावेळी हल्ला केला.”

मॉस्कोने नागरिकांना लक्ष्य केल्याचा आरोप फेटाळला असून, त्यांचे हे हल्ले म्हणजे युक्रेनकडून रशियाच्या पायाभूत सुविधांवर झालेल्या हल्ल्यांचे प्रत्युत्तर असल्याचे सांगितले.

युक्रेनने, जवळपास चार वर्षांपासून सुरू असलेल्या रशियाच्या आक्रमणाला तोंड देताना, लष्करी आणि तेलाच्या ठिकाणांवर नियमितपणे ड्रोन हल्ले केले आहेत.

झेलेन्स्की यांनी सांगितले की, “रशियाने या हल्ल्यांमध्ये 650 पेक्षा अधिक ड्रोन आणि 50 क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली, ज्यापैकी बहुतेक ड्रोन निष्क्रिय करण्यात आली आणि दोन-तृतीयांश क्षेपणास्त्रे पाडण्यात आली..”

हवाई दलाने सांगितले की, “हवाई संरक्षण युनिट्सनी 592 ड्रोन आणि 31 क्षेपणास्त्रे पाडली.”

वीजपुरवठ्यावर निर्बंध

‘या हल्ल्यांमध्ये मध्य, पश्चिम आणि आग्नेय प्रदेशांतील ऊर्जा केंद्रांना मोठा फटका बसला,’ असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारने किरकोळ आणि औद्योगिक ग्राहकांसाठी, देशभरातील वीजपुरवठ्यावर मर्यादा लागू करण्याची घोषणा केली. काही प्रदेशांमध्ये पाणीपुरवठा आणि उष्णतेची सेवाही विस्कळीत झाली आहे.

प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘पश्चिम लव्हीव प्रदेशातील दोन ऊर्जा केंद्रांचे नुकसान झाले.’ युक्रेनमधील सर्वात मोठी खासगी ऊर्जा कंपनी DTEK ने सांगितले की, ‘अनेक प्रदेशांमधील त्यांच्या थर्मल पॉवर स्टेशनवर हल्ले झाले.’

“हा हल्ला म्हणजे, या हिवाळ्यात वीजपुरवठा सुरू ठेवण्याच्या आमच्या प्रयत्नांवर गंभीर आघात आहे,” असे DTEK चे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅक्सिम टिमचेंको यांनी सांगितले. ते म्हणाले की, “गेल्या दोन महिन्यांतील हल्ल्यांच्या तीव्रतेवरून स्पष्ट होते की, रशिया युक्रेनच्या संपूर्ण ऊर्जा प्रणालीचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करत आहे.”

झापोरिझ्झियावर झालेल्या हल्ल्यांमध्ये, जखमी झालेल्या 17 लोकांपैकी 6 मुले होती, असे स्थानिक राज्यपालांनी सांगितले. तर, विनित्सिया प्रदेशात 4 लोक जखमी झाल्याचे, तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कीवमध्ये संपूर्ण रात्रभर हवाई हल्ल्याचे सायरन वाजत राहिले, ज्यामुळे नागरिकांनी भूमिगत मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतला.

“हे हल्ले जीवघेणे आहेत. आम्ही शक्य तितके लपण्याचा आणि स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे 39 वर्षीय नागरिक विक्टोरिया यांनी सांगितले. त्या एका सहा वर्षांच्या मुलाची आई आहेत.

“या हल्ल्यांमुळे खूप ताण निर्माण झाला आहे. जेव्हा मध्यरात्री आम्ही आमच्या लहान मुलाला अचानक जागे करतो, तेव्हा तो खूप रडतो, हे सगळे का आणि कशासाठी सुरू आहे ते त्याला कळत नाही.” 

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleHigher Defence Management In The Current Context
Next articleव्यापार चर्चेनंतर शी जिनपिंग यांनी, APEC शिखर परिषदेत नेतृत्व केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here