‘शांग्रीला डायलॉग’: दोन वर्षांत प्रथमच समोरासमोर भेट, संवाद सुरु ठेवण्यावर एकमत
दि. ३१ मे: तैवानविरोधात चीनकडून सुरु असलेल्या दबावतंत्रावरून अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन आणि त्यांचे समकक्ष चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांच्यात शुक्रवारी शाब्दिक चकमक उडाली. ‘शांग्रीला डायलॉग’च्या निमित्ताने गेल्या दोन वर्षांत प्रथमच चिनी आणि अमेरिकी संरक्षणमंत्र्यांची समोरासमोर भेट झाली. या वेळी ही घटना घडली. मात्र, उभय देशांतील लष्कराच्या स्तरावर परस्पर संवाद सुरु ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.
सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात येणारी शांग्रीला डायलॉग ही सुरक्षा विषयक शिखर परिषद आशियाती एक अतिशय महत्त्वाची सुरक्षा विषयक परिषद मानली जाते. या परिषदेत सहभागी होण्यासाठी ऑस्टिन आणि जून सिंगापूरला आले आहेत. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर दोघांची भेट झाली. या परिषदेत आज फिलिपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांचे भाषण होणार आहे. या भाषणात त्यांच्याकडून चीनकडून दक्षिण चीन समुद्राबाबत करण्यात येणाऱ्या दाव्याबद्दल वक्तव्य करण्यात येण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील ताणलेले संबंध, तसेच, युक्रेन-रशिया युद्ध, गाझामधील संघर्ष आणि दक्षिण चीन समुद्रातील तणावग्रस्त परिस्थिती याचे सावट शांग्रीला डायलॉगवरही पडण्याची चिन्हे आहेत. त्याचे प्रत्यंतर ऑस्टिन आणि जून यांच्या भेटीत दिसून आले. या भेटीत ऑस्टिन यांनी, तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते यांच्या शपथविधीनंतर आणि त्यापूर्वीही चीनकडून तैवान विरोधात सुरु असलेल्या लष्करी दबावतंत्राचा मुद्दा उपस्थित केला. ‘तैवानच्या खाडीच्या परिसरात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून सुरु असलेल्या चिथावणीखोर कारवायांचा मुद्दा संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी उपस्थित केला. तैवानमधील राजकीय व्यवस्थेत बदल होत आहेत. हे एक नियमित लोकशाही प्रक्रिया आहे. या बदलांचा फायदा उठवून चीनने तैवानच्या विरोधात सैन्यबलाचा वापर करून जबरदस्ती करू नये, असे आवाहनही ऑस्टिन यांनी केले,’ अशी माहिती अमेरिकी हवाईदलाचे मेजर जनरल पॅट्रिक रायडर यांनी दिली. ही बैठक सुमारे ७५ मिनिटे चालली, असेही त्यांनी सांगितले. ‘चीनचे संरक्षणमंत्री जून यांनी अमेरिकेच्या या विधानाला आक्षेप घेतला आणि चीन व तैवानच्या परस्पर संबंधांत अमेरिकेने हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी बजावले,’ अशी माहिती चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते वू क्वीआन यांनी दिली. ‘अमेरिकेने तैवानबाबत घेतलेली भूमिका त्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या विपरीत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे तैवानमधील फुटीरतावादी शक्तींना चुकीचा संदेश जात आहे,’ असे जून यांनी म्हटले आहे. चीन तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते यांना फुटीरतावादी मानतो.
उभय देशांत तैवानवरून खडाजंगी झाली असली, तरी दोन्ही देशांतील लष्कराच्या स्तरावरील संवाद महत्त्वाचा आहे, यावर त्यांच्याकडून भर देण्यात आला. त्याचबरोबर हा संवाद स्रुरू ठेवण्यावरही एकमत झाले, ही या बैठकीतील एक महत्त्वाची उपलब्धी होती, असे एका अमेरिकी अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले. या बैठकीत ऑस्टिन अतिशय ठाम दिसत होते. मात्र, त्याच्या दृष्टीकोन व्यावसायिक वाटत होता. त्यांनी या वेळी चीनच्या आण्विक, अवकाश आणि सायबर क्षेत्रातील कारवायांचा मुद्दाही उपस्थित केला, असेही हा अधिकारी म्हणाला. या वेळी दोन्ही देशांनी रशिया-युक्रेन युद्ध, गाझामधील संघर्ष आदी विषयांवरही चर्चा केली.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)