संपादकीय टिप्पणी
सर्व सशस्त्र दलांसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण हे सर्वात महागड्या उपक्रमांपैकी एक आहे. आधुनिक काळात दारुगोळ्याच्या प्रचंड किमतींमुळे तसेंच शांततेच्या काळात प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष दारुगोळा वापरण्यावर अनेकदा निर्बंध येतात. त्यामुळे वेळेची बचत आणि मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करून, सैन्य दलांची कौशल्ये इच्छित स्तरावर वाढवण्यासाठी ‘सिम्युलेटर’ हा उत्तम पर्याय उपलब्ध आहे.
रक्तरंजित मार्गावरून मृत्यूच्या भयाणतेकडे जाणाऱ्या सध्याच्या दोन युद्धांनी (युक्रेन आणि हमास) रणनीतीकार आणि लष्करी अधिकारी यांना जसे अनेक धडे शिकवले आहेत, तसेच आणखी मूलभूत सत्य अधोरेखित केलं आहे. ते म्हणजे, सैन्यासाठी रसद पुरवठा होणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्व दारुगोळा आणि इंधनाला आहे. या गोष्टी युद्धावर मोठा परिणाम करतात. ही गोष्ट वाल्दिमिर झेलेन्स्की किंवा हमास आणि इस्रायली कमांडर्सच्या वाढत्या तणावाला कारणीभूत ठरली आहे.
दारुगोळ्याचा पुरवठा हे एक दुष्टचक्र आहे. युद्धाचा भडका उडालेला असताना, प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी तोफा आणि क्षेपणास्त्रांचा सतत मारा करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या गोष्टींची उपलब्धता हळूहळू कमी होत जाते. जास्तीत जास्त सैनिकांना आघाडीवर पाठवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते. प्रशिक्षणासाठी देखील अधिकाधिक दारूगोळा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
युद्धासाठी जास्तीत जास्त दारूगोळा वाचवायचा असेल तर, शांततेच्या काळातील प्रशिक्षणादरम्यान होणारा खर्च कमी व्हायला हवा, पण त्याचबरोबर प्रशिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. ही आवश्यकता सिम्युलेशनवर आधारित प्रशिक्षण चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकते.
सिम्युलेशन पुढीलप्रमाणे काम करू शकेल –
- आज आपल्या देशात उपलब्ध असलेले तंत्रज्ञान विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृती तयार करण्यास सक्षम आहे. जे मूळ लढाऊ उपकरणांची तंतोतंत प्रतिकृती बनवेल
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी तसंच डायमेन्शनल डिस्प्ले, कंप्युटेशन, मशीन लर्निंग तसंच यासारख्या इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून, एक ‘इमर्सिव्ह इफेक्ट’ तयार करू शकतात; जिथे एखाद्या प्रशिक्षणार्थीला आपण प्रत्यक्ष लढाऊ उपकरणे चालवत आहे, असा अनुभव मिळेल.
- असे प्लॅटफॉर्म रिकॉइल, शॉक, जर्क, प्लॅटफॉर्म व्हायब्रेशन, स्मोक आणि फ्लॅश अशा सर्व प्रभावांसह सिम्युलेटेड फायरसाठी अमर्याद संधी प्रदान करू शकतात आणि हे सर्व शून्य खर्चासह.
तंत्रज्ञानाच्या मदतीने वास्तवातील युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी गोळीबाराच्या अनुभवांना खालील युद्धसदृश्यता तयार करता येईल.
- भूभाग, हवामान, वातावरण आणि वेळ या घटकांच्या मदतीने वास्तववादी रणांगणाचे वातावरण तयार करणे.
- कोणत्याही तात्कालिक धोक्यांपेक्षा प्रतिस्पर्ध्यांकडून निर्माण होणाऱ्या हवाई आणि जमिनीवरील धोक्याचे चित्रण करणे.
- एकतर्फी प्रशिक्षणाऐवजी तगड्या प्रतिस्पर्ध्यांकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना परतवून लावणे, ही एक चांगली संधी उपलब्ध होऊ शकते.
सिम्युलेशनवर आधारित प्रशिक्षणामुळे लढाईत आवश्यक असलेल्या प्रत्यक्ष दारूगोळ्याची बचत तर होतेच याशिवाय इतर अनेक फायदे होतात. यात पुढील गोष्टींचा समावेश होतो –
- प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या वेळेत आणि खर्चात होणारी बचत चकीत करणारी आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या कॉस्ट बेनिफिट अभ्यासात असे दिसून आले आहे की, अशा प्रशिक्षणामुळे वापरात असलेल्या शस्त्रांच्या खर्चात 20 पट किंवा त्याहून अधिक बचत होऊ शकते.
- TERIच्या एका स्वतंत्र अभ्यासात असे दिसले आहे की, इतर सर्व फायद्यांबरोबरच सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षण हे (गोळीबारासाठी दारूगोळ्याचा थेट वापर टाळणे) शेकडो टन GHGचे (ग्रीन हाऊस गॅस) उत्सर्जन टाळून, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सहाय्यभूत ठरते.
- याचा आपल्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमीवर वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा अशा प्रशिक्षणासाठी दैनंदिन वापर करण्यावर मर्यादा येतात. त्यामुळे त्यांची झीज आणि इतर नुकसान टाळता येऊ शकते.
- प्रशिक्षणासाठी प्रत्यक्ष उपलब्ध करण्यात येणाऱ्या दारुगोळ्याचे प्रमाण कमी असते, त्यातच अत्याधुनिक सामग्रीमुळे पारंपरिक दारुगोळ्याच्या पुरवठ्यावर मर्यादा येत चालल्या आहेत, त्यामुळे परिपूर्ण असे कौशल्य प्रशिक्षण देता येत नाही. अशावेळी सिम्युलेटर प्रशिक्षणामुळे ही कमतरता भरून निघेल. दारुगोळ्याचा कमीत कमी वापर करून प्राप्त केलेल्या कौशल्य क्षमतांचे चुकीचे मूल्यांकन झाले असेल तर ते देखील हे उपलब्ध प्रशिक्षण भरून काढते.
- प्रशिक्षणार्थींच्या कौशल्यांचे डिजिटल आणि वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी – जे कॉम्बॅट रेडिनेस स्कोअर किंवा CRS म्हणून ओळखले जाते – आधुनिक लढाऊ प्रशिक्षण उपायांची क्षमता तितकीच महत्त्वाची आहे.
- युझर डिफाइंड पॅरिमीटरवर आधारित असणारे हे मूल्यांकन कमांडरला सैन्याची क्षमता ओळखून कौशल्यावर आधारित कामांची विभागणी अचूकपणे करायला मदत करते.
आतापर्यंत आलेल्या बातम्यांनुसार, रशिया-युक्रेन युद्ध मोठ्या प्रमाणात पारंपरिक पद्धतीने लढले जात असले तरी, दोन्ही बाजूंचे सैन्य सिम्युलेटर-आधारित प्रशिक्षणावर जास्त अवलंबून आहे. विशेषतः, युद्धाच्या काळात सैन्यात दाखल होण्यासाठी नवीन सैनिकांना अशा प्रकारचे प्रशिक्षण घेणे उपयुक्त ठरते.
दुसरीकडे, इस्रायल हा एक सुस्थापित सिम्युलेटर निर्माता आहे, जो युद्धाशी निगडीत अनेक क्षेत्रांमध्ये सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षणाचा अवलंब करत आहे. मात्र हमासबद्दल फारशी माहिती नाही. बहुधा, ते त्यांच्या सैनिकांना विविध आकस्मिक परिस्थितींला सामोरे जाण्यासाठी सिम्युलेशनद्वारे काही प्रमाणात प्रशिक्षित करत असावेत.
आपल्याकडेही, अग्निवीरांना त्यांच्या संबंधित युनिटमध्ये सामील होण्यासाठी कमीत कमी वेळेत (आणि खर्चात) तयार करण्यासाठी सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षण एक उत्तम वरदान ठरू शकते.
वर वर्णन केलेल्या तंत्रज्ञानाचा संपूर्ण स्पेक्ट्रम ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत स्वदेशातच साकारला गेला आहे ही, अभिमानास्पद गोष्ट आहे.
परिणामी, देशाच्या संरक्षण मंत्रालयाने सशस्त्र दलांसाठी सिम्युलेटर्सच्या फ्रेमवर्कवर आधारित धोरण सप्टेंबर 2021मध्ये जाहीर केले, यात आश्चर्य नाही. किफायतशीर, कार्यक्षम, सुरक्षित, वेगवान आणि स्मार्ट प्रशिक्षण साध्य करण्यासाठी लष्करी क्षेत्रांमध्ये सिम्युलेशन आधारित प्रशिक्षण लागू करण्याच्या दृष्टीकोनावर आधारित हे धोरण आहे. हे धोरण एक चौकट तयार करून सिम्युलेटरचे अधिक वर्धित आणि विकसित रुप तयार करत आहे, जे तीनही सैन्यदले आणि भारतीय तटरक्षक दल यांच्यासाठी उपयुक्त ठरेल.
आज तंत्रज्ञान जे देऊ शकते त्याचा पुरेपूर वापर कसा करावा, हे जगाभरातील लष्कराने लक्षात घेणे आवश्यक आहे, तर भारतीय सैन्याने निर्धारित धोरणाची जलद अंमलबजावणी करण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत.
लेफ्टनंट जनरल (डॉ) व्ही. के. सक्सेना (निवृत्त)
(अनुवाद : आराधना जोशी)