दक्षिण कोरियाने सीमेवर बसविविलेल्या भोंग्याना उत्तर कोरियाचे भोंग्याने प्रत्युत्तर
दि. १० जून: परस्परांच्या देशांत प्रचारकी पत्रके आणि कचरा भरलेल्या फुग्यांतून कचरा टाकून झाल्यानंतर दक्षिण आणि उत्तर कोरियादरम्यान आता भोंगायुद्ध (लाऊडस्पीकर) सुरु झाले आहे. रविवारी दक्षिण कोरियाने सीमेवर भोंगे बसवून त्याद्वारे प्रसारण करीत कचऱ्याचे फुगे टाकणे थांबविण्याचा इशारा उत्तर कोरियाला दिला होता. त्यावर याचे वाईट परिणाम दक्षिण कोरियाला भोगावे लागतील, असा इशारा उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग यांनी दिला होता. त्यानुसार उत्तर कोरियानेही आता सीमेवर प्रचारकी भोंगे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर आणि दक्षिण कोरियात २०१८मध्ये झालेल्या लष्करी करारानंतर उभय देशांकडून सीमेवरील लष्करी कारवाया थांबविण्यात आल्या होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वी उत्तर कोरियाने हा करार एकतर्फी संपुष्टात आणला आणि त्यानंतर दक्षिण कोरियात कचऱ्याने भरलेले फुगे पाठविण्यास प्रारंभ केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरियाने उभय देशांदरम्यान असलेल्या सीमारेषेवर पुन्हा लष्करी कारवाया सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. तरीही शनिवारी उत्तर कोरियाने कचऱ्याने भरलेले ३३० फुगे दक्षिण कोरियात पाठविले होते. त्यामुळे दक्षिण कोरियाने सीमेवर मोठे भोंगे बसवून त्यावरून लोकशाही, भांडवली अर्थव्यवस्थेचे फायदे अशी माहिती आणि ‘के-पॉप’ ऐकविणे सुरु केले. हे प्रसारण उत्तर कोरियात सुमारे २० किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू जात आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाच्या भागात पत्रकेही टाकण्यात आली. दक्षिण कोरियाच्या या प्रत्युत्तरामुळे संतप्त झालेली किम यो जोंग यांनी दक्षिण कोरियाला परिणामास तयार राहण्याचा इशारा दिला होता. किम यो जोंग या उत्तर कोरियात अत्यंत प्रभावशाली मानल्या जातात. ‘रिपब्लिक ऑफ कोरिया’ने (दक्षिण कोरिया) त्यांचे हे उद्योग थांबविले नाहीत, तर डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’कडून (उत्तर कोरिया) याचे प्रत्युत्तर देण्यात येईल,’ असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानुसार उत्तर कोरियाकडूनही प्रचारकी थाटाची माहिती देणारे भोंगे सीमेवर बसविण्यात येत आहेत. दरम्यान, सोमवारीही उत्तर कोरियाकडून ३१० फुगे पाठविण्यात आले. त्यापैकी ५० फुगे दक्षिण कोरियाच्या सीमेवर पडले, असे दक्षिण कोरियाच्या लष्करी सूत्रांनी म्हटले आहे.
‘दक्षिण कोरियाला उत्तर कोरियाबरोबर कोणताही लष्करी तणाव नको आहे आणि किम यांच्या सत्तेला आव्हान देणारी कोणतीही बाहेरील माहिती उत्तरेत पोहोचू नये, अशी उतार कोरियाची इच्छा आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील ही परिस्थिती धोकादायक आहे,’ असे कोरियाविषयक अभ्यासक लेईफ एरिक यांनी म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील युनायटेड नेशन कमांडने, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि उत्तर कोरियाकडून सोडण्यात आलेल्या फुग्यांची तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती दिली आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)