द.कोरिया : महाभियोग मतदानापूर्वी राष्ट्राध्यक्षांचा माफीनामा

0
यून
7 डिसेंबर 2024 रोजी दक्षिण कोरियाच्या सेऊल येथील रेल्वे स्थानकावर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल राष्ट्राला उद्देशून भाषण करताना, एक व्यक्ती त्याचे प्रसारण पाहत आहे. (रॉयटर्स/किम सू-ह्योन)

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी  या आठवड्यात लष्करी कायदा लागू करण्याच्या आपल्या प्रयत्नांबद्दल शनिवारी माफी मागितली. दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान त्यांनी कमरेतून झुकत देशवासियांची माफी मागितली.
नियोजित महाभियोगाच्या मतदानाच्या काही तास आधी हे माफीनाट्य पार पडले. “मी खूप दिलगीर आहे आणि ज्यांना धक्का बसला आहे त्यांची मी प्रामाणिकपणे माफी मागू इच्छितो”, असे यून म्हणाले.
नैराश्यातून उद्भवलेल्या आपल्या या निर्णयासाठीची कायदेशीर आणि राजकीय जबाबदारी टाळण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाही, असे दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी सांगितले.
बुधवारी पहाटे मार्शल लॉ ऑर्डर रद्द केल्यानंतर गोंधळलेल्या राष्ट्राध्यक्षांचे हे पहिले सार्वजनिक भाषण होते. यून यांनी अवघ्या सहा तासांच्या आत आपलाच आधीचा आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली. संसदेने लष्करी आणि पोलिसांच्या घेरावांचे उल्लंघन करून आदेशाच्या विरोधात मतदान केल्यानंतर त्यांनी असा निर्णय जाहीर केले.
दक्षिण कोरियाच्या सत्ताधारी पक्षाचे नेते हान डोंग-हून यांनी यून यांच्या भाषणानंतर सांगितले की अध्यक्ष आता सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्याच्या मनस्थितीत नाहीत. हान म्हणाले की, राष्ट्राध्यक्षांचा राजीनामा आता अपरिहार्य आहे. शुक्रवारी, हान म्हणाले की यून हे देशासाठी धोकादायक असून आणि त्यांना सत्तेवरून हटवण्याची गरज आहे.
त्यांच्याच पीपल्स पॉवर पार्टीच्या (पीपीपी) सदस्यांनी महाभियोगाच्या औपचारिक विरोधाला पुन्हा दुजोरा दिला असला तरी यामुळे यून यांच्यावर राजीनामा देण्यासाठीचा दबाव वाढला आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या यून यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या प्रस्तावावर खासदार शनिवारी मतदान करणार आहेत.
‘राज्यविरोधी शक्तींचे’ उच्चाटन करण्यासाठी आणि अडथळा आणणाऱ्या राजकीय विरोधकांवर मात करण्यासाठी लष्कराला व्यापक आणीबाणीचे अधिकार दिल्यानंतर यून यांनी मंगळवारी रात्री उशिरा देशात मार्शल लॉ लागू करत असल्याचे सांगून सगळ्यांनाच धक्का दिला.
सत्ताधारी पीपीपीच्या काही सदस्यांनी मतदानापूर्वी यून यांना राजीनामा देण्याची विनंती केली. 2016 साली तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पार्क ग्यून-हे यांच्यावर झालेल्या महाभियोगाची पुनरावृत्ती व्हायला नको, असे या सदस्यांचे म्हणणे होते.
पदाचा उपयोग करून काही निर्णायांबाबत आपला प्रभाव टाकण्याच्या घोटाळ्यावरून नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. अनेक महिनांच्या कॅन्डल मार्चनंतर अध्यक्ष गुएन-हे यांनी पद सोडले.
तिच्या पतनामुळे पक्षाचा उद्रेक झाला आणि अध्यक्षीय तसेच सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उदारमतवाद्यांचा विजय झाला.
त्याच निदर्शनांची आठवण करून देणारी दृश्ये शुक्रवारी परत एकदा बघायला मिळाली. मेणबत्त्या हातात घेऊन हजारो निदर्शक शुक्रवारी रात्री संसदेबाहेर यून यांच्यावरील महाभियोगाच्या मागणीसाठी जमले.
मतदानाच्या आधी शनिवारी आणखी निदर्शने अपेक्षित आहेत. सरकारी वकील, पोलीस आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसाठीच्या भ्रष्टाचार तपास कार्यालयाने यून आणि मार्शल लॉच्या अदेशात सामील असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articlePakistan: इम्रान खानकडून ‘सविनय कायदेभंग आंदोलनाची’ धमकी
Next articleUkraine Makes Drone With 700 KM Range, Can Hit Targets Deep Inside Russia

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here