वाढत्या हिंसाचारामुळे दक्षिण सुदानमधील आरोग्याचे संकट अधिक भीषण

0
दक्षिण सुदान

मेडिसीन्स सान्स फ्रन्टियर्स (MSF) च्या एका नवीन अहवालानुसार, दक्षिण सुदानमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेला हिंसाचार आणि घटत चाललेला निधी यामुळे आधीच डळमळीत झालेल्या येथील आरोग्य सेवांवर विपरीत परिणाम होत आहे. परिणामी, दक्षिण सुदानला 2018 मधील शांतता करारानंतरच्या सर्वात गंभीर सुरक्षा समस्येचा आणि बिघडत्या मानवतावादी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

MSF ने त्यांच्या ‘लेफ्ट बिहाइंड इन क्रायसिस: एस्कलेटिंग व्हायोलन्स अँड हेल्थकेअर कोलॅप्स इन साऊथ सुदान’ या अहवालात – आरोग्य सुविधांवरील हल्ल्यांमध्ये झालेली मोठी वाढ, औषधांची व्यापक टंचाई आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वाढती कमतरता यांची नोंद केली आहे. आंतरराष्ट्रीय लक्ष इतरत्र वळल्यामुळे मानवतावादी प्रतिसाद कमकुवत होत असल्याचा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

या अहवालात नमूद केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, जानेवारीपासून 3,20,000 हून अधिक लोक विस्थापित झाले असून, किमान 2,000 लोक मारले गेले आहेत. MSF च्या म्हणण्यानुसार, या वर्षात मध्य इक्वेटोरिया, जोंगलेई आणि अप्पर नाईल राज्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या सुविधांवर आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या आठ हल्ल्यांची त्यांनी नोंद केली आहे.

3 डिसेंबर रोजी, पिएरी येथील MSF सुविधेवर हवाई हल्ला झाला, त्यानंतर त्याचदिवशी लँकिन येथे काही अतिरिक्त हल्ले झाले. दक्षिण सुदानमधील MSF च्या क्षेत्रीय कामकाजाच्या प्रमुख डॉ. सिग्रिड लॅमबर्ग म्हणाल्या की, “अत्यावश्यक सेवांच्या ऱ्हासामुळे दररोज लोकांचे जीव जात आहेत. येथील अनेक आरोग्य सुविधा एकतर कार्यान्वित नाहीत किंवा त्यांच्याकडे संसाधनांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे, तसेत टाळता येऊ शकणाऱ्या आणि उपचार करण्यायोग्य आजारांमुळे रुग्ण दगावत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी येथील प्रत्यक्ष परिस्थिती बिघडत असल्याची माहिती दिली असून, काही दवाखान्यांना औषधे खरेदी करण्यासाठी रुग्णांनाच स्थानिक बाजारात पाठवावे लागत आहे, जिथे अनेकदा ती औषधे उपलब्धही नसतात. विशेषतः लहान मुलांमध्ये मलेरियाचे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. दक्षिण सुदानमध्ये सलग दुसऱ्या वर्षी, मलेरियाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढललेला असताना, मलेरियाच्या औषधांचा देशव्यापी तुटवडा निर्माण झाला आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान, MSF ने गंभीर स्वरूपातील मलेरियामुळे रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या 6,680 रुग्णांवर उपचार केले.

मानवतावादी निधी सातत्याने कमी होत असतानाही, पूरस्थिती आणि कॉलरासह विविध रोगांच्या साथीमुळे हे संकट अधिकच वाढले आहे. ‘हेल्थ सेक्टर ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्ट’, जो 2024 मध्ये सरकारच्या प्राथमिक आरोग्य सेवा वितरण कार्यक्रमाच्या रूपात सुरू करण्यात आला होता, त्याचा उद्देश दहा राज्यांमधील 1,158 सुविधांना आधार देण्याचा होता. MSF नुसार, सध्या केवळ 816 सुविधांनाच मदत मिळत असून, त्यापैकी अनेक ठिकाणांवर पुरेसा औषधसाठा किंवा कर्मचाऱ्यांसाठी नियमित वेतन मिळत नसूनही, काम अखंडपणे सुरू आहे.

MSF ने अत्यावश्यक औषधे, वैद्यकीय पुरवठा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर वितरित करण्याची मागणी केली आहे. तसेच, सध्याच्या 1.3 टक्के निधीच्या तुलनेत, राष्ट्रीय अर्थसंकल्पातील 15% निधी हा आरोग्य क्षेत्रासाठी राखून ठेवण्याच्या ‘अबुजा घोषणेनुसार’ (अबुजा- आफ्रिकेतील सार्वजनिक आरोग्याशी संबंधित महत्त्वाचा राजकीय आणि आर्थिक संकल्प) आरोग्य खर्चात वाढ करावी, अशी विनंती केली आहे.

या अहवालात, आंतरराष्ट्रीय समर्थनात होत असलेली घट देखील अधोरेखित करण्यात आली आहे, तसेच जागतिक भागीदारांना आपली बांधिलकी नव्याने दृढ करण्याचे आवाहन केले आहे. औषध पुरवठा पूर्ववत करण्यासाठी, सुरक्षित मानवतावादी प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी आणि आरोग्य सुविधांचे हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी दक्षिण सुदानचे सरकार, जागतिक आरोग्य संघटना (WHO), युनिसेफ (UNICEF) आणि मदतकर्त्या देशांच्या सरकारांनी एकत्रित कार्यवाही करावी, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे. नवीन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पाठिंब्याशिवाय नागरिकांचा त्रास असाच सुरूच राहील, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.

मूळ लेखिका- ऐश्वर्या पारिख

+ posts
Previous articleयूएई आणि सौदी अरेबियाला मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याचे चीनचे आवाहन
Next articleचीनमध्ये आता मोफत बाळंतपण; सरकार उचलणार प्रसूतीचा पूर्ण खर्च

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here