श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळाचे थैमान; 46 जणांचा मृत्यू, भारताचा मदतीचा हात

0
दितवाह चक्रीवादळाचे

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी श्रीलंकलेला दितवाह चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला, ज्यात 46 जणांचा मृत्यू झाला असून, 23 जण अद्याप बेपत्ता आहेत. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, पुढील 12 तासांत हे वादळ बेटावरून पुढे सरकत असताना, अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ दितवाहने गेल्या 24 तासांत बेटावर अक्षरश: थैमान घातले. 300 मिमी (11.8 इंच) पेक्षा अधिक मुसळधार मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात बहुतांशी लोकांचा मृत्यू झाला, ज्यात पूर्वेकडील आणि मध्यवर्ती भागांना याचा सर्वाधिक फटका बसला.

विस्थापन आणि स्थलांतर

आपत्ती व्यवस्थापन केंद्राने त्यांच्या निवेदनात सांगितले की, देशभरात 43,991 लोकांना शाळा आणि इतर सार्वजनिक निवारागृहांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे, ज्यात छतावर अडकलेल्या कुटुंबांचा देखील समावेश आहे.

मुसळधार पाऊस अजूनही सुरूच असल्याने, शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तसेच रेल्वे सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत आणि कोलंबो स्टॉक एक्स्चेंजने ट्रेडिंग थांबवण्याची घोषणा केली आहे.

श्रीलंकेच्या वर्तमानपत्रांनुसार, मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे झाडे आणि वीजेचे खांब कोसळल्यामुळे, देशभरात मोठ्या प्रमाणावर वीज खंडित झाली आहे. डेली मेलने (Daily Mail) दिलेल्या वृत्तानुसार, आज सकाळपर्यंत 65,000 हून अधिक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत, त्यापैकी जवळपास 26,000 ठिकाणचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

डीएमसीचे आपत्कालीन कार्य संचालक ब्रिगेडियर एस. धर्मविक्रमा यांनी रॉयटर्सला सांगितले की, “आम्ही सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागात बचाव कार्य सुरू ठेवले आहे, परंतु भूस्खलनामुळे रस्ते बंद झाल्याने काही गावात पोहचणे कठीण झाले आहे. आम्ही प्रत्येकाला सुरक्षित स्थळी स्थालांतरित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”

भारताकडून मदतीचा हात

परिस्थिती अधिक बिघडल्यास श्रीलंका आपल्या मुख्य विमानतळावरून विमान वाहतूक, भारतातील त्रिवेंद्रम किंवा कोचीन विमानतळाकडे वळवू शकते, असे बंदर आणि नागरी उड्डाण मंत्री अनुरा करुणातिलके यांनी पत्रकारांना सांगितले.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मस्कत, दुबई, नवी दिल्ली आणि बँकॉकहून येणाऱ्या विमानांसह अन्य सहा विमाने कोलंबोच्या बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आधीच वळवण्यात आली आहेत.

डेली मेल या श्रीलंकन वृत्त संस्थेनुसार, चक्रीवादळ दितवाहमुळे हवामान खूपच बिघडले असून, अशा परिस्थित बचाव आणि मदत कार्य सुरू ठेवण्यासाठी, सध्या कोलंबोमध्ये उपस्थित असलेली भारतीय युद्धनौका INS विक्रांतची त्यावरील विमानंसह मदत मिळावी, याकरता श्रीलंकेने विनंती केली असून, भारताने ती मान्य केली आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, दितवाह चक्रीवादळ ही श्रीलंकेतील 2017 नंतरची सर्वात प्राणघातक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यावेळी आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलनामुळे 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि लाखो लोक विस्थापित झाले होते.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleBeyond BrahMos: Jakarta Eyes Broader Defence Industrial Collaboration
Next articleभारत–जर्मनी संबंधांना चालना; पाणबुडी करार लवकरच होण्याची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here