दहशतवादी हल्ल्याचा संभाव्य धोका लक्षात घेता इस्रायली नागरिकांनी त्वरित दक्षिण श्रीलंकेतील काही पर्यटन क्षेत्रांमधून बाहेर पडण्याचे आवाहन इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने बुधवारी केले.
परिषदेने सांगितले की हा इशारा अरुगम खाडी क्षेत्राशी आणि श्रीलंकेच्या दक्षिण तसेच पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटन स्थळांशी संबंधित आहे आणि “हाती आलेल्या माहितीनुसार पर्यटन क्षेत्र आणि समुद्रकिनारे यांच्यावर लक्ष केंद्रित केलेल्या संभाव्य दहशतवादी हल्ल्यांमुळे” ही परिस्थिती उद्भवली आहे.
‘खात्रीशीर माहिती’
सुरक्षा परिषदेने धोक्याचे नेमके स्वरूप स्पष्ट केलेले नसले तरी श्रीलंकेच्या उर्वरित भागातील इस्रायलींना सावध राहण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोठ्या कार्यक्रमांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
“इस्रायली सुरक्षा आस्थापना … श्रीलंकेतील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात आहे आणि घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,” असे त्यात नमूद केले आहे.
श्रीलंकेतील अमेरिकन दूतावासाने “अरुगम खाडी क्षेत्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळांना लक्ष्य करणाऱ्या हल्ल्यासंदर्भात विश्वासार्ह माहिती” मिळाली असल्याचे सांगत एक सुरक्षा अलर्ट जारी केला आहे.
“पुढील सूचना मिळेपर्यंत नागरिकांनी अरुगम खाडी क्षेत्र टाळावे असे आवाहन अमेरिकन दूतावासाकडून करण्यात आले आहे,” असे जरी निवेदनात म्हटले असले तरी बाकी कोणताही तपशील दिलेला नाही.
जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील प्रवाशांना “पर्यटन स्थळांवरील संभाव्य हल्ल्यांचा धोका लक्षात” घेऊन ती ठिकाणे टाळण्याचे किंवा शक्य तितक्या लवकर तिथून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.
श्रीलंकेत हाय अलर्ट
या भागातील पोलिस सुरक्षा वाढवण्यात आली असून संबंधित अधिकारी हाय अलर्टवर आहेत, असे पोलिस प्रवक्ते निहाल थलदुवा यांनी कोलंबो येथून प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे.
“सर्फिंगसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने इस्रायली पर्यटक इथे आकर्षित झाले आहेत. ते सुरक्षित राहतील यासाठी आम्ही काम करत आहोत,” असे थलदुवा म्हणाले.
समुद्रकिनारे, चहाचे मळे आणि ऐतिहासिक मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेला श्रीलंका गंभीर आर्थिक संकटातून सावरल्यामुळे पर्यटकांमध्ये पुन्हा वाढ होत आहे.
सरकारी आकडेवारीनुसार या वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत, 1.5 दशलक्ष पर्यटक श्रीलंकेत आले, ज्यात 20 हजार 515 इस्रायली पर्यटकांचा समावेश आहे.
ऐश्वर्या पारीख
(रॉयटर्स)